दूध उत्पादकांचे ३२०० कोटींचे नुकसान

सदानंद पाटील
गुरुवार, 19 जुलै 2018

राज्यात गायीच्या दुधाचे उत्पादन १ ते सव्वा कोटी लिटरच्या घरात आहे. प्रतिलिटर दुधासाठी येणारा उत्पादन खर्च व प्रत्यक्ष मिळणारा दर यात १० ते १७ रुपयांचा फरक आहे. हा फरक सरासरी १२ रुपयांचा धरला तरी नउ महिन्यात दूध उत्पादकांना सुमारे ३२०० कोटींचा फटका बसला आहे

कोल्हापूर - वर्षभरापासून गायीच्या दुधाचे उत्पादन करणारे शेतकरी अडचणीत आहेत. मागील आठ-नऊ महिन्यांत दूध उत्पादकांची वाट चांगलीच काटेरी बनली आहे. राज्यात गायीच्या दुधाचे उत्पादन १ ते सव्वा कोटी लिटरच्या घरात आहे. प्रतिलिटर दुधासाठी येणारा उत्पादन खर्च व प्रत्यक्ष मिळणारा दर यात १० ते १७ रुपयांचा फरक आहे. हा फरक सरासरी १२ रुपयांचा धरला तरी नउ महिन्यात दूध उत्पादकांना सुमारे ३२०० कोटींचा फटका बसला आहे.

संघांचे नुकसान भरून देण्यासाठी अनुदान व सवलतींचा वर्षाव करणाऱ्या शासनाला उत्पादकांच्या नुकसानीचा मात्र विसर पडल्याचे चित्र आहे. वर्षभरात दूध पावडरचे पडलेले दर, नवीन पावडरची निर्मिती न होणे यामुळे बाजारात गाईच्या अतिरिक्‍त दुधाचा प्रश्‍न निर्माण झाला. अतिरिक्‍त दुधामुळे दुधाचे दर कोसळले असल्याचे सांगून सहकारी व खासगी दूध संघांनी नगण्य किमतीला दुधाची खरेदी सुरू केली आहे. गाईच्या एक लिटर दुधाचा दर जो २७ रुपये होता तो सहकारी संघात १७ तर खासगी संघात १५ रुपये खाली आला आहे.

सद्यस्थितीत १ लिटर दुधाचे उत्पादन घेण्यासाठी ३५ ते ४० रुपयांचा खर्च येत आहे. यात जनावरांची ओली-सुकी वैरण, औषधपाणी, जनावरांचा गोटा, उत्पादन खर्चात जनावरांच्या खरेदी रक्‍कमेचे व्याज, त्याचा भाकड काळ वजा करुन दुग्ध काळ याचाही आता विचार होणे गरजेचे आहे. विचारात घेतला तर तो १ लिटर उत्पादनाचा खर्च लिटरला ३५ रुपये इतका आहे. म्हणजेच एक लिटर दूध  उत्पादनाचा खर्च व मिळणार दर यात तब्बल१५ रुपयांचे नुकसान शेतकऱ्यांना सोसावे लागत आहे. त्यातूनच दुधाला हमीभावाची मागणी पुढे येवू लागली आहे. साखरेप्रमाणेच दुधाचा दर  निश्‍चित करण्याची मागणी कळीचा मुददा ठरणार आहे.

दूध उत्पादक गेले आठ ते नऊ महिने तोटा सहन करत आहेत. हजारो कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. नुकसानीची जबाबदारी शासन घेत नाही. मात्र त्यांना संघाच्या शिल्लक दूध पावडरची काळची आहे. संघ जो नफा कमावतात त्याचा हिस्सा शासनाला देत नाहीत. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांच्या नुकसानीची जबाबदारी घेतली पाहिजे.
- अजित नवले,
सरचिटणीस, राज्य किसान सभा

Web Title: Kolhapur News Milk rate issue