चंद्रकांतदादा, रक्तदाब वाढू देऊ नका! - आमदार हसन मुश्रीफ

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 एप्रिल 2018

कोल्हापूर - राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मंत्री, पालकमंत्री चंद्रकांत पाटील अलीकडे लवकर रागावतात. त्यांच्यावर आरोप केले की अस्वस्थ का होतात? असा सवाल करतानाच त्यांनी तब्येतीची काळजी घ्यावी, रक्तदाब वाढू देऊ नये, असा उपहासात्मक सल्ला आमदार हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत दिला.

कोल्हापूर - राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मंत्री, पालकमंत्री चंद्रकांत पाटील अलीकडे लवकर रागावतात. त्यांच्यावर आरोप केले की अस्वस्थ का होतात? असा सवाल करतानाच त्यांनी तब्येतीची काळजी घ्यावी, रक्तदाब वाढू देऊ नये, असा उपहासात्मक सल्ला आमदार हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत दिला. आम्ही त्यांचे शत्रू नाही आणि सगळीच माणसे पैशाने विकत घेता येत नाहीत, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

दरम्यान, शेतकरी संघाची जागा जिल्हा बॅंकेने थकीत कर्जापोटी जप्त केली होती. निविदा काढूनच जागेची विक्री केली. सुरुवातीला भाजपचे खासदार संजय काकडे यांनी ही जागा घेतली. नंतर श्री. काकडे यांनी ही जागा संजय डी. पाटील यांना विकली. हा व्यवहार करताना जागेवरील अर्बन लॅंड सीलिंगची अट होती ती रद्द केली. त्याचबरोबर अकृषक कराची रक्कमही बॅंकेने भरली. जिल्हाधिकारी व ‘यूएलसी’चे प्राधिकृत अधिकारी यांच्या परवानगीनंतरच हा व्यवहार पूर्ण केला. या जागेवर कोणतेही आरक्षण नव्हते, असा खुलासाही श्री. मुश्रीफ यांनी केला.

श्री. मुश्रीफ म्हणाले, ‘‘तावडे हॉटेल परिसरातील जागा पालिकेची असल्याचा निर्णय न्यायालयाने दिल्यानंतर पदाधिकाऱ्यांनी ही जागा ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्यात अडथळा आल्यानंतर आरोप-प्रत्यारोप झाले; पण त्यातून एवढा राग पालकमंत्र्यांना येण्याचे कारण नव्हते. भावी मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्र त्यांच्याकडे पाहतो. अशा स्थितीत राक्षस जागा झाला, शेपटीवर पाय ठेवला, मुंगीला डिवचले ही भाषा त्यांना शोभत नाही. भावी मुख्यमंत्र्यांकडे सहनशीलता हवी.’’

दादा, माझ्याअगोदर मुख्यमंत्री...
जिल्ह्याला महसूल व सार्वजनिक बांधकाम खाते पहिल्यांदा मिळाले आहे. जिल्ह्यात लवकरात लवकर मुख्यमंत्री कोण होणार असतील तर ते दादा होणार. मीही होणार; पण त्यांच्यानंतर होणार आहे; पण ते इतके रागावले का, हे कळाले नाही. अस्वस्थही झाले होते. महिनाभरात तीन वेळा त्यांची ही परिस्थिती मी बघितल्याचे श्री. मुश्रीफ यांनी सांगितले.

...तर ते आमचे कौतुकच

श्री. पाटील यांनी पालिका आयुक्तांकडे हॉटेल सयाजी, वॉटर पार्क, रुक्‍मिणीनगर डीपी रोड आदी माहिती मागवली आहे. मीही आज आयुक्तांना ही माहिती ताबडतोब देण्यास सांगितले आहे. ही माहिती मिळाल्यानंतर तेही माझ्यासह आमदार सतेज पाटील यांचे कौतुकच करतील. २० वर्षांत आम्ही एकही आरक्षण उठवले नाही. मी दहा नंबरचा आणि सतेज पाटील २० नंबरचे मंत्री असून आम्ही १५०० कोटींचा निधी शहरासाठी आणला आहे.

प्रदर्शन केले की चर्चा होणारच...
माणूस अचानक मोठा होताना त्याची चर्चाही होतच राहणार. संपत्तीचे प्रदर्शन कमी केले तर चर्चा होणार नाही. व्हिक्‍टर पॅलेस, शालिनी पॅलेस या मालमत्ता श्री. पाटील यांनी विकत घेतल्याची चर्चा त्यामुळेच होते. लोकांच्या तोंडाला आपण हात लावू शकत नाही. कितीही पैसा आला तरी वागणे, बोलणे साधेच हवे. त्यांच्याविषयी सहानुभूती वाटते म्हणूनच मी हे बोलतो, असेही श्री. मुश्रीफ म्हणाले.

Web Title: Kolhapur News MLA Hasan Mushrif