शाहू महाराज यांना भारतरत्न द्यावा यासाठी लोकचळवळ उभारणार - महाडिक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 जुलै 2018

कोल्हापूर - राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा, यासाठी लोकचळवळ उभारणार असल्याची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली. कावळा नाका येथील त्यांच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

कोल्हापूर - राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा, यासाठी लोकचळवळ उभारणार असल्याची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली. कावळा नाका येथील त्यांच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

खासदार महाडिक म्हणाले, ‘‘पुरोगामी विचारांचे प्रणेते आणि समतेचे पुरस्कर्ते राजर्षी शाहू महाराज यांनी दूरदृष्टीने आणि लोककल्याणकारी राज्यकारभार केला. त्यामुळेच ते लोकराजा ठरले. कोल्हापूरच्या जडणघडणीत, प्रगतीत राजर्षी शाहूंचा सिंहाचा वाटा आहे. शिक्षण, शेती, सिंचन, उद्योग, कला, क्रीडा अशा आदी क्षेत्राला महाराजांनी न्याय दिला. चालना दिली.

अस्पृश्‍यता निवारण, सर्वांना शिक्षण, समता-बंधूता याबद्दल शाहू महाराजांनी कृतिशील योगदान दिले, अशा या लोकराजाला ‘भारतरत्न’ किताब मिळावा, यासाठी कोल्हापूरसह राज्यात आणि देशभर चळवळ उभारली जाणार आहे. यासाठी २५ ऑगस्टपर्यंत धनंजय महाडिक यांच्या नावावर कोल्हापूर येथील ताराराणी चौकातील २११३, ई वॉर्ड, राजेश मोटर्ससमोर असणाऱ्या कार्यालयात पत्र पाठविण्याचे आवाहन महाडिक 
यांनी केले आहे. 

शाहू महाराज यांना ‘भारतरत्न’ किताब द्यावा, अशी विनंती करणारे पत्र, ई-मेल देण्याचे आवाहन केले आहे. ही पत्रे व ई-मेल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली जातील.  

दरम्यान, जिल्ह्यातील सेवाभावी संस्था, संघटना, विकास संस्था, दूध संस्था, बॅंका, पतसंस्था, उद्योग, बचत गट, डॉक्‍टर, इंजिनिअर्स, वैयक्तिक, संस्था, आर्किटेक्‍ट, शिक्षक संघटना, शाळा, खासगी शाळा, विविध समाज संघटना, व्यावसायिकांच्या संघटना यांनी पत्र व ठराव देण्याचे आवाहनही खासदार महाडिक यांनी केले आहे. dhananjaymahadik@hotmail.com या मेलवरही आपली मागणी करता येणार आहे. 

सर्व खासदारांना ‘शाहू चरित्र देणार’
देशातील सर्व खासदारांना इंग्रजीमधील ‘शाहू चरित्र’ देऊन त्यांच्याकडून ठराव किंवा पत्र घेतले जाणार आहे. प्रत्येक राज्यातील आमदारांना याबाबत आवाहन करून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही तसा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवावा, अशी  मागणी करणार असल्याचे खासदार महाडिक यांनी सांगितले.

Web Title: Kolhapur News MP Dhananjay Mahadik Press