‘श्रीमंतीकडे वाटचाल’ अडखळली तरतुदींमध्ये

Kolhapur-Municipal
Kolhapur-Municipal

कोल्हापूर - महापालिका प्रशासनाने सादर केलेल्या अंदाजपत्रकात जमेच्या बाजूने ३७ कोटी ३९ लाखांची वाढ सुचवत आणि कोणतीही करवाढ नसलेले २०१७-१८ चे सुधारित व २०१८-१९ चे नवे अंदाजपत्रक आज महापालिका सभेत सादर झाले. स्थायी समिती सभापती आशीष ढवळे यांनी सभाध्यक्ष महापौर स्वाती यवलुजे यांच्याकडे ते सादर केले. ‘परिवर्तनाच्या समृद्धीतून... श्रीमंतीकडे वाटचाल करणारे महानगर’ असे अंदाजपत्रकास नाव दिले असले तरी प्रत्यक्षात श्रीमंतीकडे वाटचाल करण्यासारखी तरतूद अंदाजपत्रकात काही दिसत नाही.

प्रशासनाने स्थायी समितीला सादर केलेले अंदाजपत्रक ११५९ कोटींचे होते. त्यात महसुली जमेच्या बाजूने ४४६ कोटी अपेक्षित धरले होते. स्थायी समितीने यात ३७ कोटी ३९ लाखांची वाढ सुचवत ११९६ कोटी ४५ लाखांचे सुधारित अंदाजपत्रक सादर केले. महसुलीमध्ये स्थायीने १३ कोटी ७५ लाख व भांडवलीत १८ कोटी ४४ लाख वाढ सुचविली. विशेष प्रकल्पामध्ये ४ कोटी ८० लाख वाढ अशी एकूण ३७ कोटी ३९ लाखाची वाढ आहे. 

अंदाजपत्रकातील ठळक प्रकल्प 
महापालिकेच्या आज सादर झालेल्या अंदाजपत्रकात विविध प्रकल्पाचा उल्लेख आहे. त्यासाठीची तरतूदही निश्‍चित केली आहे. 

अमृत अभियान अंतर्गत मलनिस्सारण योजनेच्या ७२.४७ कोटीच्या प्रशासकीय मंजुरी झालेल्या योजनेतून शहरातील दुधाळी झोनमधील ११३ किलोमीटरचे ड्रेनेज लाईनचे काम करण्यात येणार आहे. कसबा बावडा, दुधाळी नाला येथे मलशुद्धीकरण केंद्र बांधण्यात येणार आहे. सीपीआर, जुना बुधवार, रमणमळा, राजहंस प्रेस, लक्षतीर्थ, रंकाळा तलावावरील काही नाल्यावरील फायटोरिड पद्धतीचे सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारण्यात येणार आहे.

सध्या सुरू असलेल्या थेट पाईपलाईन योजनेअंतर्गत शहरात उंच टाक्‍या भरण्यासाठी फिडर मेन्स गुरुत्वनलिका, दाबनलिका, शीर्षकामी पूर्ण करण्यात येणार आहे. पाणी पुरवठा व्यवस्थेचे जीआयसी मॅपिंग व हायड्रोलिक मॉडेलिंगची कामे पूर्ण करून घेतली आहे. त्यानुसार ११४.८१ कोटी रकमेच्या प्रकल्प अहवालास शासनाची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.

अमृत अभियान अंतर्गत उद्यान विकास प्रकल्पातील अर्धवट राहिलेली कामे पूर्ण करून घेण्यात येणार आहेत.

श्री महालक्ष्मी मंदिर व परिसर आराखड्याच्या कामाला प्राधान्य. अंबाबाई मंदिर ते बिंदू चौक आणि भवानी मंडप मार्ग मॉडेल पादचारी मार्ग करण्यात येणार आहे. मार्गावर भाविकांना सर्व प्रकारच्या सुविधा देण्यात येतील. 

शहर विकासाच्यादृष्टीने ५० मीटर उंचीच्या इमारतीस परवानगी देणे क्रमप्राप्त आहे. अग्निशमन दलाकडे सध्या २१ मीटरपर्यंतच अग्निशमन सेवा पुरविण्याची क्षमता आहे. हे लक्षात घेता अग्निशमन ताफ्यात ५५ मीटर टर्न टेबल लॅडर वाहन उपलब्ध करून देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत.

मंगेशकरनगर येथे बहुउद्देशीय क्रीडा सभागृह उभारण्यात येणार आहे. खेलो इंडिया योजनेअंतर्गत त्याला निधी आणण्यात येईल. यात योजनेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार बॅडमिंटन कोर्ट, बॉक्‍सिंग रिंग, प्रेक्षकगृह बैठक व्यवस्था, फुटबॉल, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल आदी खेळासाठी ॲस्ट्रो टर्फ असणार आहे. विकास आराखड्यातील सर्व प्रभागातील क्रीडांगणांचा विकास करण्याचा मानस.

सध्याची महापालिकेची इमारत अपुरी पडत आहे. नवी प्रशासकीय इमारत बांधण्यात येणार आहे. त्यासाठी ६५ कोटी खर्च अपेक्षित आहे. अंदाजपत्रकात २ कोटींची तरतूद केली आहे. त्याचप्रमाणे नवीन भव्य नाट्यगृह उभारण्यात येणार आहे.

सेफ सिटी, केशवराव भोसले नाट्यगृह परिसर विकास, प्रधानमंत्री आवास योजना, शासनाचे विविध अनुदान, घनकचरा व्यवस्थापन, ई गव्हर्नन्स, स्मार्ट सुविधा, मध्यवर्ती बस स्थानकावर बहुमजली पार्किंग, गाडीअड्डा येथे भक्‍त निवास, कोंबडी बाजार येथे व्यापारी संकुल, डीपी रोड विकसित करणे, रंकाळा संवर्धन आदी अंदाजपत्रकाचे वैशिष्ट्य आहे.

स्थायी समितीमधील मानापमान बजेटच्या निमित्ताने रंगले...
स्थायी समितीमध्ये सत्ताधारी आघाडीच्या उमेदवाराच्या झालेल्या पराभवावरून सदस्यांमध्ये स्थायी समितीत सुरू असलेली धुसफूस आणि मानापमानाचे राजकारण आज महापालिका सभेत अंदाजपत्रकाच्या निमित्ताने चव्हाट्यावर आले. अंदाजपत्रक सादर करण्यासाठी जाताना सभापती आणि स्थायी समितीचे सर्व सदस्य महापौरांकडे जात असतात. मात्र यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य जागेवरच बसून राहिले. त्यांना बोलाविण्याचा प्रयत्न केला; मात्र दीपा मगदूम यांनी सदस्यांना निरोप नसल्याचे सांगून अंदाजपत्रक सादर करण्यासाठी जाण्याचे टाळले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com