कोल्हापूर महापाैर पदासाठी काउंटडाउन

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 मे 2018

कोल्हापूर - महापौरपदासाठी काँग्रेसकडून शोभा बोंद्रे, भारतीय जनता पक्ष-ताराराणी आघाडीकडून जयश्री जाधव यांची नावे आघाडीवर असल्याचे समजते. आयत्यावेळी या नावात बदलही होऊ शकतो. काँग्रेसकडून उमा बनछोडे, जयश्री चव्हाण, निलोफर आजरेकर, इंदुमती माने, दीपा मगदूम यांचीही नावे चर्चेत आहेत. भाजप-ताराराणी आघाडीकडून स्मिता माने, रूपाराणी निकम, तेजस्विनी इंगवले, उमा इंगळे, भाग्यश्री शेटके, सविता भालकर याही इच्छुक आहेत.

कोल्हापूर - महापौरपदासाठी काँग्रेसकडून शोभा बोंद्रे, भारतीय जनता पक्ष-ताराराणी आघाडीकडून जयश्री जाधव यांची नावे आघाडीवर असल्याचे समजते. आयत्यावेळी या नावात बदलही होऊ शकतो. काँग्रेसकडून उमा बनछोडे, जयश्री चव्हाण, निलोफर आजरेकर, इंदुमती माने, दीपा मगदूम यांचीही नावे चर्चेत आहेत. भाजप-ताराराणी आघाडीकडून स्मिता माने, रूपाराणी निकम, तेजस्विनी इंगवले, उमा इंगळे, भाग्यश्री शेटके, सविता भालकर याही इच्छुक आहेत.

दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे भावी राजकारण पाहता काँग्रेसकडून बोंद्रे व भाजप-ताराराणी आघाडीकडून जयश्री जाधव यांची नावे तूर्तास तरी अधिक चर्चेत आहेत. इंद्रजित बोंद्रे यांचा पूर्वीचा मतदारसंघ दक्षिणमध्ये मोडतो. शोभा बोंद्रे शिवाजी पेठेतील चंद्रेश्‍वर प्रभागातून विजयी झाल्या; तर इंद्रजितचा प्रभाव उपनगरात आहे.

उद्योजक चंद्रकांत जाधव गेल्या निवडणुकीपासून भाजपमध्ये सक्रिय झाले. जयश्री जाधव या कमळाच्या चिन्हावर  निवडून आल्या आहेत. भाजपला कोणत्याही परिस्थितीत महापौरपद हवे आहे. त्यामुळे जाधव यांच्या नावाची येथे अधिक चर्चा आहे. महापौरपदासाठी कोण किती देणार, याची सध्या चर्चा सुरू आहे. त्यात कितपत तथ्य आहे, हे नजीकच्या काळात स्पष्ट होईल. काही सदस्यांची नाराजी दूर करण्यासाठी जे निकष आहेत, त्यात दोन्ही उमेदवार पात्र ठरतात.

गेल्या वेळी उमा बनछोडे यांना महापौरपद न मिळाल्याने त्या नाराज झाल्या होत्या. दीपा मगदूम यांचीही अशीच अवस्था झाली. नेतेमंडळी एखादे पद देताना त्यांच्या मतदारसंघांचा विचार करतात. महापौरपद काँग्रेसच्या वाट्याला सहा महिने येणार असले तरी त्यास पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचे कंगोरे आहेत. जयश्री चव्हाण आणि चव्हाण कुटुंबीय सुरुवातीपासून आमदार पाटील यांच्या पाठीशी राहिले आहे. त्याही पदासाठी दमदार दावेदार आहेत. निलोफर आजरेकर या अपक्ष उमेदवार असल्या तरी त्याही काँग्रेसच्या पाठीशी ठाम राहिल्या आहेत.

पै-पाहुण्यांच्या राजकारणात भाजप-ताराराणी आघाडीकडून स्मिता माने यांचे नाव पुढे येऊ शकते. रूपाराणी निकम याही अभ्यासू सदस्या आहेत. उमा इंगळे याही महाडिक गटाशी कट्टर 
मानल्या जातात. भाग्यश्री शेटके, सविता भालकर यांच्याही नावांचा विचार होऊ शकतो.

अजूनही महापौर निवडीचा कार्यक्रम जाहीर झालेला नाही. दोन्ही आघाड्यांना सदस्य फुटण्याची अधिक भीती आहे. या पार्श्‍वभूमीवर महापौरपदासाठी ज्यांची नावे पुढे आहेत, त्यांच्या नावात आयत्या वेळी बदलही होऊ शकतो. 

दरम्यान शिवसेनेचे सर्व सदस्य हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसारच मतदान करतील. कोणीही आर्थिक किंवा पदासाठी गद्दारी करणार नाहीत, असा विश्‍वास आमदार राजेश क्षीरसागर यांनी दाखविला आहे.

बॅगा भरण्याचे आदेश
सोमवारी (ता. १४) महापालिकेची सर्वसाधारण सभा होत आहे. महापौरांची मुदत मंगळवारी (ता. १५) संपत आहे. सभा झाल्यानंतर सहलीसाठी बॅगा भरण्याचे आदेश काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांना दिल्याचे समजते. २५ मेच्या दरम्यान महापौर निवड होईल. भाजप-ताराराणी आघाडीनेही सदस्यांना सहलीवर पाठविण्याची तयारी केली आहे. दोन्ही आघाड्या सदस्य फुटू नयेत, यासाठी प्रयत्नशील आहेत. पैशांच्या राजकारणात नीतिमत्ता, निष्ठा बाजूला पडत असल्याने कोणत्या वेळी काय होईल, याचा अंदाज नेत्यांना येत नसल्याचे चित्र आहे.

Web Title: Kolhapur News Municipal Mayor Election