चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 मे 2018

कोल्हापूर - चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा गळा दाबून खून केल्याची घटना उचगाव येथील जानकीनगरात घडली आहे. विद्या शिवाजी ठोंबरे असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. खून करून पतीनेही आत्महत्येचा प्रयत्न केला.

गांधीनगर - पहिल्या पत्नीच्या खुनाच्या गुन्ह्यातून निर्दोष झालेल्या रिक्षा चालकाने आज चारित्र्याच्या  संशयावरून दुसऱ्या पत्नीचा गळा दाबून खून केला. नंतर स्वतः आत्महत्येचा प्रयत्न केला. उचगाव (ता. करवीर) येथे हा प्रकार घडला. या घटनेत सौ. विद्या शिवाजी ठोंबरे (वय २२, रा.  जानकीनगर, उचगाव) यांचा मृत्यू झाला. 

शिवाजी प्रभाकर ठोंबरे (४० वर्षे, मूळ रा. सावंत गल्ली, बाळूमामा मंदिरजवळ, उचगाव, सध्या रा. खबाले मंगल कार्यालय, जानकीनगर, उचगाव) असे हल्लेखोराचे नाव आहे. 
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी - ठोंबरे जानकीनगर येथे दुसरी पत्नी विद्यासोबत राहात होता. तो सतत तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्यावरून त्यांच्यात वारंवार भांडणे व्हायची. त्यातून तो विद्याला मारहाण करायचा.

पतीच्या मारहाणीला कंटाळून विद्याने माहेरी सांगितले होते. त्यानंतर तिचा भाऊ प्रकाश दत्ता धायगुडे (२४, रा. अहिल्यानगर, कुर्डूवाडी, ता. माढा, जि. सोलापूर) विद्याला माहेरी नेण्यासाठी आला होता. पहाटे चारच्या रेल्वेने विद्या भावासोबत जाणार होती. त्यामुळे ती पहाटे तीन वाजता उठली. तिने आवराआवर केली. शिवाजीने तिला चहा करण्यास सांगितले. चहा करताना पती-पत्नीमध्ये पुन्हा भांडण झाले.

त्यानंतर शिवाजीने प्रकाशला बाहेर थांबण्यास सांगितले. घराला आतून कुलूप लावले आणि त्याने विद्याला पुन्हा मारहाण सुरू केली. विद्याचा आरडाओरडा ऐकून तिचा भाऊ प्रकाशने घराच्या खिडकीची काच फोडून दाजी मारू नका, अशी विनंती शिवाजीला केली; परंतु शिवाजीने काही न ऐकता विद्याच्या छातीवर बसून तिचा गळा दाबून खून केला. विद्या मृत झाल्याची खात्री झाल्यानंतर शिवाजीने घरातील विळती घेतली आणि हाताची शिर कापून घेतली. त्यानंतर स्वतःच्या गळ्यावर कापून घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे शिवाजीच्या हातातून आणि गळ्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊ लागला. 

प्रकाशने आरडाओरडा करून शेजारील लोकांना उठविले. या सर्वांनी घराचा दरवाजा मोडून काढला. त्यानंतर त्यांनी पोलिसांना बोलावून घेतले. याबाबतची फिर्याद भाऊ प्रकाश धायगुडे याने दिली आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी सूरज गुरव, सहायक निरीक्षक सुशांत चव्हाण, उपनिरीक्षक सोमनाथ पांचाळ यांनी भेट देऊन पाहणी केली. जखमी शिवाजीला सीपीआरमध्ये दाखल केले आहे. 

पहिल्या पत्नीच्या खुनातून निर्दोष
चार वर्षांपूर्वी पहिली पत्नी सुलभा हिच्या चारित्र्यावरही शिवाजी वारंवार संशय घ्यायचा. या संशयामधूनच त्याने तिचा डोक्‍यात सिलिंडर घालून खून केल्याचा त्याच्यावर आरोप होता. या गुन्ह्यातून तो निर्दोष सुटला होता. आज शिवाजीच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सहायक पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण तपास करत आहेत.

Web Title: Kolhapur News Murder Incidence in Uchgaon