कोल्हापूरातील जरगनगरमध्ये तरुणाचा गोळ्या झाडून खून

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 मे 2018

कोल्हापूर - जरगनगर येथे मध्यरात्री एकच्या सुमारास डोक्‍यात गोळी झाडून एका तरुणाचा खून करण्यात आला. प्रतीक प्रकाश पोवार (वय ३०, द्वारकानगर दत्त मंदिराजवळ पाचगाव रोड, जरगनगर) असे त्याचे नाव आहे

कोल्हापूर - जरगनगर येथे मध्यरात्री एकच्या सुमारास डोक्‍यात गोळी झाडून एका तरुणाचा खून करण्यात आला. प्रतीक प्रकाश पोवार (वय ३०, द्वारकानगर दत्त मंदिराजवळ पाचगाव रोड, जरगनगर) असे त्याचे नाव आहे. जरगनगर नाका ले आऊट क्रमांक चारच्या मुख्य रस्त्यावर हा प्रकार घडला. करवीर पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिलीप जाधव यांच्यासह पथक घटनास्थळी दाखल झाले. तेथे पोलिसांना पुंगळी सापडली. प्रतीकची मोटारसायकल तेथेच पडली होती. तपास आणि पंचनामा रात्री उशिरापर्यंत सुरू होता.

श्री. जाधव यांनी घटनास्थळी असलेल्या दोन तरुणांकडून माहिती घेतली. त्यांनी पोलिसांना सांगितले, की प्रतीकच्या डोक्‍यात साधारण एक फुटावरून गोळ्या झाडल्या आहेत. श्री. जाधव यांनी त्या दोघांना ताब्यात घेऊन करवीर पोलिस ठाण्याकडे रवाना केले. प्रतीकला कोणी मारले, याचीही माहिती त्यांनी पोलिसांना दिली आहे. घटनास्थळी स्ट्रायकिंग फोर्स मागवला होता.

घटनास्थळावरून आणि पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी जरगनगरकडून पाचगाव रस्त्याकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर रात्री अकराच्या सुमारास प्रतीक आणि त्याचे काही मित्र कट्ट्यावर बोलत बसले होते. यावेळी तेथे प्रतीकचा मित्र आला. त्या दोघात वाद झाला. गळपट्टी धरण्यापर्यंत प्रकरण पोहोचले. त्यानंतर तो निघून गेला. यानंतरही प्रतीक मित्रासोबत तेथेच कट्ट्यावर बसून होता. थोड्याच वेळात तो गेलेला मित्र परत तेथे आला. त्यांच्यात पुन्हा वाद झाला. तुला आता सोडणार नाही, अशी धमकी दिली. त्यानंतर प्रतीक आणि त्याचे मित्र तेथेच गप्पा मारत उभा राहिले. थोड्या वेळाने तो तरुण पुन्हा तेथे आला. त्याने थेट प्रतीकच्या डोक्‍याला रिव्हॉल्व्हर लावली आणि गोळ्या झाडल्या. त्यानंतर तो प्रतीकच्या मित्रालाही घेऊन पळून गेला आहे. मारणाऱ्याच्या अंगावर टी शर्ट आणि बर्म्युडा होता. त्याने बर्म्युडाच्या खिशातून रिव्हॉल्व्हर काढल्याचे घटनास्थळावर असलेल्या दोन तरुणांनी सांगितले.

निरीक्षक जाधव आणि त्यांच्या डी.बी. पथकाने तातडीने प्रतीकच्या विरोधकांची माहिती घेतली. संशयितास शोधण्यासाठी पाचगाव, कळंबा आणि हॉकी स्टेडियमकडे तीन पथके रवाना केली. हा प्रकार समजल्यानंतर रात्री दीड-दोनच्या सुमारास प्रतीकचे काही मित्र घटनास्थळी आले. त्यांनी आक्रोश केला. प्रतीकचे विरोधक कोण, गोळी घालणारे कोण, याची माहितीही त्यांनी पोलिसांना दिली. 

रात्री उशिरा मृतदेह सीपीआरमध्ये हलविण्यात आला. तेथे डॉक्‍टरांनी शवविच्छेदनानंतर सविस्तर अहवाल दिला जाईल, असे सांगितले. त्यामुळे प्रतीकच्या डोक्‍यात नेमक्‍या किती गोळ्या झाडल्या याची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. मात्र घटनास्थळी मिळालेल्या पुंगळीमुळे रिव्हॉल्व्हरमधून गोळ्या घातल्याचे स्पष्ट झाल्याचे उपअधीक्षक सूरज गुरव यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

राजकारणातून खून...
राजकारणाशी संबंधित कारणावरून हा खून झाल्याचे घटनास्थळी बोलले जात होते. प्रतीकचा खून सरनाईक नावाच्या तरुणाने केला असल्याची प्राथमिक माहिती मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले. या सरनाईकवर इचलकरंजीमध्ये गुन्हा दाखल आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

सागरचे अपहरण...
संशयित हल्लेखोराने घटनास्थळी असलेल्या सागरचे त्याचीच दुचाकी घेऊन अपहरण केले. सागर आणि हल्लेखोर नेमके कोठे गेले आहेत, याची माहिती मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले. 

‘रणजित’शी संबंध
रणजित नावाच्या एक गॅंगस्टरच्या टोळीतील तरुणाने वर्चस्व आणि राजकरणातून हा खून केल्याची माहिती रात्री दोनच्या सुमारास पोलिसांना मिळाली आहे. त्यामुळे पोलिसांनी रात्रीतच रणजितचा शोध सुरू केला होता. तोच खुनामागे असल्याचे संदर्भही मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले.

पांढरी गाडी विनानंबर प्लेट..
घटनास्थळी मृत प्रतीकची स्टायलिस्ट दुचाकी पोलिसांना मिळून आली आहे. तीही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. घटनास्थळी पंचनामा करताना पोलिसांना एक पुुंगळीही मिळाली आहे. घटनेचे गांभीर्य पाहून रात्री दीडच्या सुमारास करवीर विभागाचे उपअधीक्षक सूरज गुरव घटनास्थळी दाखल झाले.

Web Title: Kolhapur News Murder in Jaragnagar