घरात घुसून चुलत भावाचा गोळ्या घालून निर्घृण खून

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 जानेवारी 2018

कोतोली-कोल्हापूर - पन्हाळा तालुक्‍यातील चव्हाणवाडी पैकी चिखलकरवाडी येथे शेतजमिनीच्या वादातून गोळ्या घालून चुलत भावाचा खून करण्यात आला. आज रात्री हा थरारक प्रकार घडला. या वेळी गोळी लागून मृताची पत्नीही गंभीर जखमी झाली. या प्रकारानंतर गावात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

कोतोली-कोल्हापूर - पन्हाळा तालुक्‍यातील चव्हाणवाडी पैकी चिखलकरवाडी येथे शेतजमिनीच्या वादातून गोळ्या घालून चुलत भावाचा खून करण्यात आला. आज रात्री हा थरारक प्रकार घडला. या वेळी गोळी लागून मृताची पत्नीही गंभीर जखमी झाली. या प्रकारानंतर गावात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

याबाबत घटनास्थळ आणि पोलिसांतून मिळालेली माहिती अशी - चिखलकरवाडी येथे सदाशिव महादेव नायकवडे व हिंदूराव यशवंत नायकवडे यांची एकत्रित चार एकर जांभळीचे वावर नावाची जमीन आहे. या जमिनीवरून या दोन चुलत भावांमध्ये वारंवार भांडणे होत होती. आज सकाळीही दोन्ही कुटुंबांमध्ये किरकोळ वाद झाला.

याबाबत पन्हाळा पोलिसांत तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, ती दाखल करून घेतली नाही. रात्री पुन्हा या दोन्ही कुटुंबांमध्ये कडाक्‍याचे भांडण झाले. त्या वेळी हिंदूराव नायकवडे याने सदाशिव नायकवडे यांच्या दारात जाऊन प्रथम हवेत गोळीबार केला. त्यानंतर शशिकांत हिंदूराव नायकवडेने कुऱ्हाडीने दरवाजा तोडून दोघेही घरात घुसले. त्यानंतर हिंदूरावने सदाशिव नायकवडे (वय ५०) व त्यांची पत्नी शशिकला ऊर्फ आक्काताई नायकवडे यांच्यावर गोळीबार केला. यात सदाशिव नायकवडे यांच्या पोटात गोळी लागली; तर आक्काताई यांच्या मांडीला गोळी लागून त्या जखमी झाल्या. सदाशिव नायकवडे यांना गंभीर अवस्थेत कोल्हापुरातील ‘सीपीआर’मध्ये दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण असून, पोलिसांनी तेथे बंदोबस्त ठेवला आहे.

घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी साडेअकराच्या सुमारास ‘सीपीआर’मध्ये भेट दिली. जखमी आक्काताई नायकवडे यांच्या प्रकृतीची विचारपूस डॉक्‍टरांकडे 
केली. जखमीबरोबर मोजकेच नातेवाईक होते. घटना पन्हाळा तालुक्‍यात घडली असली, तरी त्याचे पडसाद ‘सीपीआर’मध्ये उमटू नयेत, म्हणून तातडीने लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक तानाजी सावंत यांनी ‘सीपीआर’मध्ये बंदोबस्त ठेवला. शाहूवाडी पोलिस उपनिरीक्षक आर. आर. पाटील यांनी जखमी व मृताच्या नातेवाईकांशी ‘सीपीआर’मध्ये भेट घेऊन ते पुन्हा घटनास्थळाकडे रवाना झाले. 

गावात तणावपूर्ण शांतता
गोळीबाराची घटना रात्री साडेआठच्या सुमारास घडली असतानाही तेथे तातडीने पोलिस किंवा अन्य कोणीही पोचले नव्हते. गोळीबाराच्या प्रकारानंतर गावातील नागरिकांनी दारे बंद करून घेतली. त्यामुळे गावातील वातावरण तणावपूर्ण बनले. त्यानंतर मृत सदाशिव नायकवडे यांचा मुलगा अनिकेत याने स्वतः खासगी मोटार बोलावून आई-वडिलांना ‘सीपीआर’मध्ये दाखल केले. 

पोलिस चौकीची आवश्‍यकता
कोतोलीपासून घटनास्थळ साधारण दहा किलोमीटर अंतरावर आहे. घटनास्थळ पन्हाळा पोलिस ठाण्याच्या अखत्यारित येते. पोलिस घटनास्थळी पोचायला तास-दीड तासाहूनही अधिक वेळ लागला. त्यांनाही माहिती देण्यास गावकरी पुढे आले नाहीत. पोलिस ठाण्यापासून हे गाव खूप लांब असल्याने या परिसरात एखादी पोलिस चौकी असण्याची आवश्‍यकता आहे.

Web Title: Kolhapur News Murder in Panahala taluka