मुश्रीफ-महाडिक वादावर मुत्सद्दी मौन

मुश्रीफ-महाडिक वादावर मुत्सद्दी मौन

कोल्हापूर - दोन दिवसांच्या दौऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोकसभेच्या उमेदवारीबाबत कोणतेही स्पष्ट संकेत तर दिले नाहीच; पण त्यांच्याच उपस्थितीत राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ व काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी खासदार धनंजय महाडिक यांना आपला विरोध असल्याचे जाहीर केल्याने लोकसभा उमेदवारीचा गुंता कायम राहिला; मात्र यावर पवारांनी मुत्सद्दी मौन पाळले.

तथापि या दौऱ्याचे फलित पाहता आगामी राजकारणाचे काही संकेत जरूर मिळाले. श्री. पवार यांच्या भूमिकेमागे काही आडाखे या दौऱ्यात स्पष्ट होऊ शकले नाहीत. त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्‍वभूमीवर मुश्रीफ आणि महाडिक मतभेदाची दरी अधिकच खोलवर गेली होती. लोकसभेच्या रिंगणात आपण स्वत: उतरणार, असा शड्डू मुश्रीफांनी मारला होता.

या दोघांच्या वादाच्या पार्श्‍वभूमीवर पवार मध्यस्थी करतील आणि काही तरी राजकीय तोडगा काढतील, अशी अपेक्षा होती. पण या विषयाला त्यांनी बगल दिली. 

सदाशिवराव मंडलिक स्मृती पुरस्काराचे वितरण व राजर्षी शाहू गव्हर्मेंट सर्व्हंटस्‌ बॅंकेच्या शतक महोत्सवी सांगता समारंभासाठी श्री. पवार दोन दिवसांपासून कोल्हापुरात होते.

मंडलिक स्मृती पुरस्कार म्हणजे सर्वपक्षीय नेत्यांची मांदियाळीच होती. याच कार्यक्रमात श्री. पवार उमेदवारीबाबतचे संकेत देतील, असे वाटत होते. पण त्यांनी स्पष्ट संकेत न देता माझ्या मनातले माझ्या कार्यकर्त्यांना कळते, असे सांगितले.

मग श्री. मुश्रीफ यांनी महाडिक यांना थेट केलेला विरोध हा त्याचाच भाग होता का? हा प्रश्‍न आहे. त्याचबरोबर परिवर्तनासाठी जे जे येतील, त्यांना सोबत घेऊ, असे श्री. पवार म्हणाले. या परिवर्तनात प्रा. संजय मंडलिक आले तर त्यांना घेऊ, असे त्यांना म्हणायचे होते का? 

काल (ता. १०)च्या कार्यक्रमात (कै.) मंडलिक यांचे अपुरे स्वप्न पूर्ण करण्यासाठी परमेश्‍वराने ताकद द्यावी, असे श्री. मुश्रीफ म्हणाले. श्री. पाटील यांनी हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी व्यासपीठावरील सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले. त्यातून या दोघांनी प्रा. मंडलिक यांचेच ‘प्रमोशन’ करण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे पक्षाचे विद्यमान खासदार धनंजय महाडिक यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. 

श्री. महाडिक यांच्या घरी श्री. पवार यांच्याबरोबर बरीचशी ‘टी डिप्लोमसी’ रंगली. श्री. महाडिक यांनी हॉटेलवर श्री. पवार यांची भेट घेतली, त्या वेळी पक्षाचे कोणीही त्यांच्याबरोबर नव्हते. याउलट हॉटेलवर व घरीही त्यांच्याबरोबर भारतीय जनता पक्ष-ताराराणी आघाडीचे नगरसेवक दिसले. यातून त्यांनी हे सर्वजण माझ्याबरोबर आहेत, हे दाखविण्याचा प्रयत्न केला.

एकूणच पवार यांच्या दौऱ्यावर नजर टाकली तर त्यात खासदार महाडिक एका बाजूला तर राष्ट्रवादी एका बाजूला असे चित्र दिसले. त्यामुळे तेही पक्षाची उमेदवारी घेतील का, याविषयी संदिग्धता आहे. पुढे जाऊन पक्षाची उमेदवारी घेतली तर अडचणीचे ठरू शकते, हेही त्यांच्या वर्तणुकीवरून दिसले. पक्षाचे मावळेच सोबत नसतील तर ‘राष्ट्रवादी’कडून श्री. महाडिक लढतील का?

श्री. मुश्रीफ असो किंवा सतेज पाटील हे मनाने श्री. महाडिक यांच्याबरोबर नसतील तर त्याचा विचारही श्री. पवार यांना करावा लागणार आहे. दुसरीकडे गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी प्रा. मंडलिक हेच शिवसेनेचे लोकसभेचे उमेदवार असल्याचे श्री. पवार यांच्यासमोरच जाहीर करून टाकले. पण प्रा. मंडलिक यांचा कल हा ‘राष्ट्रवादी’कडेच असल्याचे श्री. पवार यांच्या दौऱ्यात दिसून आले.

मुश्रीफ-सतेज जोडीबरोबर मंडलिक
‘राष्ट्रवादी’ची उमेदवारी असेल तर मुश्रीफ-सतेज जोडीसह काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील व इतरांचीही मदत होईल, याचा अंदाज मंडलिक यांना आहे व त्यातून विजय दृष्टिक्षेपात येऊ शकतो, हेही त्यांना माहीत आहे. त्यातूनच प्रा. मंडलिक यांनी ‘राष्ट्रवादी’बरोबरच मुश्रीफ-सतेज यांची गेल्या काही दिवसांपासून साथ सोडलेली नाही. लोकसभेला अजून वर्षभराचा अवधी आहे. तोपर्यंत पुलाखालून बरेच पाणी जाईल. त्या वेळी राजकीय परिस्थिती काय असेल, त्यावर उमेदवार निश्‍चित होईल. तोपर्यंत मात्र हा गुंता कायम राहणार आहे. 

‘स्वाभिमानी’बरोबर जुळवून घेण्याचे संकेत
मंडलिक स्मृती पुरस्कार वितरण कार्यक्रमात खासदार शेट्टी यांनी व्यासपीठावर येताच पवार यांच्याशी हस्तांदोलन केले. यानंतर पवार यांनी आपल्या भाषणात खासदार शेट्टी यांनी गेली दहा वर्षे आपल्यावर खूप प्रेम केल्याचा चिमटा काढला. पण त्यांची आंदोलने योग्यच असतात. त्यामुळे सरकारवर दबाव राहत असल्याचे नमूद केले. यावरून भविष्यात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीत ‘स्वाभिमानी’लाही सहभागी केले जाऊ शकत असल्याचे संकेत मिळाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com