समाजाला ध्येयवादी शिक्षकांची गरज - नागनाथ कोत्तापल्ले

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 मार्च 2018

कोल्हापूर - प्राचार्य प्रकाश कुंभार यांच्यासारख्या निष्ठावंत, ध्येयवादी शिक्षकांची आज समाजाला गरज आहे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ कोत्तापल्ले यांनी येथे व्यक्त केले.

कोल्हापूर - प्राचार्य प्रकाश कुंभार यांच्यासारख्या निष्ठावंत, ध्येयवादी शिक्षकांची आज समाजाला गरज आहे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ कोत्तापल्ले यांनी येथे व्यक्त केले.

प्राचार्य डॉ. प्रकाश कुंभार गौरव समारंभ समितीतर्फे आयोजित प्राचार्य डॉ. कुंभार यांचा गौरव ग्रंथ आणि ‘दलित चळवळ काही विचार व दिशा’ या ग्रंथाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी रजनीताई मगदूम होत्या. मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष उत्तम कांबळे, नॅकचे सल्लागार डॉ. जगन्नाथ पाटील यांच्या उपस्थितीत शाहू स्मारक भवन येथे कार्यक्रम झाला.

श्री. कोत्तापल्ले म्हणाले, ‘‘कोणताही प्रश्‍न हा ध्येयधोरणाशी संबंधित असतो. शिक्षण क्षेत्रात अराजकता माजण्याइतपत वाईट परिस्थिती असल्याचे नॅकचे सल्लागार जगन्नाथ पाटील यांनी सांगितल्याचा संदर्भ देत कोत्तापल्ले यांनी समाजात आजवर कितीतरी निष्ठावंत व ध्येयवादी शिक्षक होते. ते गेले कोठे? याचा संबंध आर्थिक धोरणाशी आहे. यांत्रिकीकरण वाढले की, बेरोजगारी वाढते. त्याचे परिणाम समाजाला भोगावे लागतात. भारतीय ग्रामीण व्यवस्थेत सर्व समाज हे उद्योगातून निर्माण झाले होते. पण हे औद्योगिकीकरण नव्या यांत्रिकी व्यवस्थेने बंद पाडले.’’

श्री. कांबळे म्हणाले, ‘‘समाजात शिक्षकांची संख्या खूप आहे. पण जे शिक्षणाच्या प्रवाहातच नाही, अथवा शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडण्याची ज्यांना भीती आहे, अशा श्रमिक विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात ढकलण्याचे काम करणारा डॉ. कुंभार यांच्यासारखा माणूस हा केवळ शिक्षक नाही, तर तो खऱ्या अर्थाने समाजशिक्षक आहे. अशा समाजशिक्षकाची आजच्या समाजाला खूप गरज आहे.  

श्री. पाटील म्हणाले, ‘‘शिक्षणाचा दर्जा खालावला आहे. समाजाने याचा खऱ्या अर्थाने विचार करायला हवा. तमिळनाडू, कर्नाटकसारख्या राज्यात कुलगुरूसारख्या नियुक्‍त्यांसाठी घोडेबाजार होत आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात अराजकता माजेल, अशी स्थिती आहे.’’

माजी महापौर मारुतराव कातवरे, रजनीताई मगदूम, अरुण लाड यांची भाषणे झाली. डॉ. कुंभार यांना मानपत्र प्रदान करण्यात आले. डॉ. शिवकुमार सोनाळकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. कुंभार व  सौ. ज्योती कुंभार यांचा सत्कार झाला. ताज मुल्लाणी यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: Kolhapur News Naganth Kotapalle comment