नेट बॅंकिंगद्वारे सव्वा कोटींना गंडा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 सप्टेंबर 2017

कोल्हापूर - कंपनीच्या युजर आयडीसह पासवर्ड हॅक करून नेट बॅंकिंगद्वारे ‘युनिक ऑटोमोबाइल्स इंडिया’ कंपनीची तब्बल सव्वा कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या फसवणुकीत बनावट आधार कार्ड, खोट्या पत्त्याचा वापर केल्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबतची फिर्याद कंपनीचे लेखा व्यवस्थापक शक्ती जयसिंगराव घाटगे (वय ३६, रा. राजोपाध्येनगर) यांनी दिली. 

कोल्हापूर - कंपनीच्या युजर आयडीसह पासवर्ड हॅक करून नेट बॅंकिंगद्वारे ‘युनिक ऑटोमोबाइल्स इंडिया’ कंपनीची तब्बल सव्वा कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या फसवणुकीत बनावट आधार कार्ड, खोट्या पत्त्याचा वापर केल्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबतची फिर्याद कंपनीचे लेखा व्यवस्थापक शक्ती जयसिंगराव घाटगे (वय ३६, रा. राजोपाध्येनगर) यांनी दिली. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जुना पुणे-बंगळूर महामार्गावरील लक्ष्मीनगरातील एम. एम. चेंबर्समध्ये युनिक ऑटोमोबाइल्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे. या कंपनीमध्ये शक्ती जयसिंगराव घाटगे हे लेखा व्यवस्थापक म्हणून काम करतात. त्यांच्या कंपनीत पूर्वी सुशांत दयानंद तुरंबेकर काम करत होता. कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना मोबाईल दिले आहेत. त्या मोबाईलआधारे ते कंपनीचा ऑनलाईन व्यवहार करतात. त्या व्यवहारांसंबंधी ओटीपी (वन टाईम पासवर्ड) त्यांच्या मोबाईलवर येतो. ऑनलाईन व्यवहारासाठी तो कर्मचाऱ्यांकडून वापरला जातो.

व्यवस्थापक घाटगे हे ९७६३७२७२०७ या क्रमांकाचा मोबाईल कंपनीच्या कामासाठी वापरत होते. १८ सप्टेंबरला त्यांचा मोबाईल अचानक बंद पडला. त्यांनी याबाबतची चौकशी कंपनीकडे केली. त्या वेळी हा मोबाईल वाई (जि. सातारा) येथे सुशांत दयानंद तुरंबेकर याच्या नावाने सुरू असल्याचे सांगण्यात आले. मोबाईल नंबरच्या आधारे नेट बॅंकिंगद्वारे काही व्यवहार झाले आहेत का? याची माहिती घाटगे यांनी तत्काळ घेतली. त्या वेळी कंपनीच्या बॅंक खात्यावरील १ कोटी २४ लाख ६० हजारांची रक्कम काढल्याचे त्यांच्या लक्षात आले. ती माहिती त्यांनी वरिष्ठांना दिली. त्यानंतर याबाबतचा लेखी तक्रार अर्ज शाहूपुरी पोलिस ठाण्यात दिला. प्राथमिक चौकशीनंतर शाहूपुरी पोलिस ठाण्यात आज युनिक ऑटोमोबाइल्स्‌ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची फसवणूक झाल्याची फिर्याद दिली. 

कंपनीच्या युजर आयडीसह पासवर्ड हॅक करून नेट बॅंकिंगचा व्यवहार करून ही फसवणूक केली आहे. व्यवस्थापक घाटगे यांच्या नावाचा मोबाईल क्रमांक रिइश्‍यू करण्यासाठी सुशांत तुरंबेकर याने बनावट आधार कार्ड आणि कंपनीच्या बनावट कागदपत्रांचा वापर केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तपासात आधार कार्ड व कागदपत्रे वाई (सातारा) येथून देण्यात आली. रिइश्‍यू करून प्राप्त झालेल्या मोबाईलवरून ऑनलाईन व्यवहारासाठी लागणारा युजर आयडी व पासवर्ड हॅक करण्यात आला.

त्यानंतर कंपनीच्या खात्यावरील १ कोटी २४ लाख ६० हजारांची रक्कम आर.टी.जी.एस.द्वारे १२ खात्यांवर वर्ग करून ही फसवणूक केल्याचे तपासात पुढे आले आहे. ज्या खात्यावर ही रक्कम वर्ग झाली, त्याचे क्रमांक पोलिसांना मिळाले आहेत. त्या खाते क्रमांकाचा शोध सायबर सेलच्या मदतीने घेतला जात आहे. ही फसवणूक सुशांत तुरंबेकर अगर त्याच्या नावाचा वापर करून भामट्याने अथवा ओळखीच्या व्यक्तीने केली असण्याचीही शक्‍यता गृहीत धरून पुढील तपास सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनी सांगितले. 

पाळेमुळे खणावी लागणार
ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. सव्वा कोटी रुपयांचा गंडा घालणाऱ्यांचा शोध घेण्याचे आव्हान आता पोलिसांसमोर आहे. फसवणूक करणाऱ्यांची पाळेमुळे खोलात शिरून पोलिसांना शोधून काढावी लागणार आहेत. ऑनलाईन व्यवहारामुळे त्यांना देशाबाहेर जाऊनही तपास करावा लागण्याची शक्‍यता आहे.

 

Web Title: kolhapur news net banking Fraud