तीन खासदारांसह पालकमंत्र्यांची येत्या पंधरा दिवसांत बैठक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 ऑक्टोबर 2017

कोल्हापूर -  पर्यायी शिवाजी पुलाचे काम पुरातत्त्व कायद्यात बदल झाल्यानंतरच होऊ शकते. त्यासाठी दिल्लीदरबारी पाठपुरावा करण्यासाठी पालकमंत्र्यांसह जिल्ह्यातील तीनही खासदारांची बैठक येत्या पंधरा दिवसांत घेण्याचा निर्णय आज झाला.

कोल्हापूर -  पर्यायी शिवाजी पुलाचे काम पुरातत्त्व कायद्यात बदल झाल्यानंतरच होऊ शकते. त्यासाठी दिल्लीदरबारी पाठपुरावा करण्यासाठी पालकमंत्र्यांसह जिल्ह्यातील तीनही खासदारांची बैठक येत्या पंधरा दिवसांत घेण्याचा निर्णय आज झाला. पर्यायी शिवाजी पूल सर्वपक्षीय कृती समिती आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रांगणात झालेल्या बैठकीचे हे फलित आहे. सुमारे दोन तासांहून अधिक वेळ चर्चा सुरू होती. 

पर्यायी शिवाजी पुलाचे काम सहा वर्षे रखडले आहे. सर्वपक्षीय कृती समितीने आंदोलन करून हा विषय जिवंत ठेवला. तातडीने पर्यायी शिवाजी पुलाचे काम झाले पाहिजे, यासह कोणाच्या तक्रारीमुळे काम थांबले हा विषय अधिक गाजला. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पर्यावरणवाद्यांची नावे सांगण्यात आली. अखेर याचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी आजची बैठक झाली. 

बैठकीत राष्ट्रीय महामार्ग विकास कार्यालयातील कार्यकारी अभियंता व्ही. आर. कोंडेकर, महापालिकेचे शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, भारतीय पुरातत्त्व विभागाचे संरक्षक सहायक विजय चव्हाण आणि कृती समितीचे निमंत्रक आर. के. पोवार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

पर्यायी पुलाचे काम का थांबले, याबाबत अधिकाऱ्यांनी बैठकीत बोलावे, कार्यकर्त्यांच्या प्रश्‍नांना उत्तरे द्यावीत, अशी मागणी पोवार यांनी केल्यावर बैठकीस सुरुवात झाली. श्री. कांडगावे यांनी महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाशी झालेल्या पत्रव्यवहारातून माहिती दिली. उपअभियंता संपत आबदार यांनी पत्रव्यवहार वाचण्यास सुरुवात केली. महापालिकेतील वृक्ष प्राधिकरण विभागाच्या बैठकीत पुलाला अडथळे असणारी वृक्षतोड आणि पाण्याची टाकी याबाबत गायकवाड यांना हस्तक्षेप केला होता, हे स्पष्ट झाले. त्यानंतर पुरातत्त्व विभागाकडे पाठपुरावा सुरू झाला; तेव्हा खोदाईचे काम होऊ शकत नसल्याचे पुरातत्त्व विभागाकडून सांगण्यात आले. 

यावर उदय गायकवाड म्हणाले, ‘‘आमचा पर्यायी शिवाजी पुलाला विरोध नाही; मात्र पुरातत्त्वच्या अपडेट यादीत पाण्याची टाकी आहे. ती पर्यायी ठिकाणी बांधून त्यावर संदर्भ लिहावा, एक वृक्ष तोडल्यास दहा वृक्ष लागवड करणे अशा मुद्द्यांवर हा निर्णय होऊ शकत होता. मात्र काम सुरू झाल्यावर झाडे तोडावीत, असा माझा आग्रह होता. वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत मी तो आग्रह धरला होता. मात्र तत्कालीन आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांना अध्यक्ष म्हणून विशेष अधिकार होते. त्या माझ्या विरोधात निर्णय देऊ शकत होत्या. नऊ सदस्यांपैकी तीन अशासकीय सदस्य आहेत. त्यामुळे उर्वरित अधिकाऱ्यांनी निर्णय घेणे अपेक्षित होते. असे घडलेले नाही. त्यामुळे माझे नाव पुढे करून शासकीय अधिकारी बदनामी करतात. मुळात त्यांनी पुलासाठीची मंजुरी मिळण्यापूर्वीच उत्खननाची परवानगी का घेतली नाही? तत्कालीन आयुक्तांनी सार्वजनिक हित म्हणून हा निर्णय घेणे अपेक्षित होते.’’

श्री. कांडगावे यांनी कायद्याच्या कक्षेत राहूनच काम करावे लागते, त्यामुळे काम सुरू होऊ शकत नसल्याचे स्पष्ट केले. यानंतर पुरातत्त्व विभागाचे विजय चव्हाण म्हणाले, ‘‘मी पदभार घेतल्यावर महिन्यात पुलाचे सर्वेक्षण पूर्ण केले आहे. त्यामुळेच आज फाईल मुंबईतून दिल्लीपर्यंत पोहोचली आहे. पुरातत्त्व विभागाच्या कायद्यात बदल होत नाही, तोपर्यंत येथे काम पूर्ण होऊ शकत नाही.’’ त्यामुळे दिल्ली दरबारी प्रयत्न करणे अपेक्षित असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

अखेर पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार राजू शेट्टी, धनंजय महाडिक आणि संभाजीराजे छत्रपती, संबंधित सर्व अधिकारी आणि कृती समितीची संयुक्त बैठक येत्या पंधरा दिवसांत घेण्याचा निर्णय पोवार यांनी जाहीर केला. त्यांनी वेगवेगळे पर्याय सुचविण्याचेही आवाहन केले. वसंतराव मुळीक, चंद्रकांत यादव, बाबा पार्टे, संभाजी जगदाळे, नामदेव गावडे, दिलीप पवार, सतीश कांबळे, प्रसाद जाधव, अजित सासणे, अशोक पोवार, गणी आजगेकर, ॲड. पंडितराव सडोलीकर, श्रीकांत भोसले, राम चंदाणी, किसन कल्याणकर, जयकुमार शिंदे, लाला गायकवाड, महादेव पाटील, किशोर घाटगे, सचिन तोडकर, विजय करजगार, रमेश तनवाणी, अवधूत पाटील यांच्यासह सुमारे पन्नास कार्यकर्ते उपस्थित होते.

दरम्यान, पर्यायी शिवाजी पुलाचे काम होत नसल्याबद्दल दोन नोव्हेंबरला अकरा वाजता अर्धवट बांधकाम असलेल्या पुलावर अर्धमुंडण आंदोलन करणार असल्याचे छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे फिरोज खान यांनी येथे जाहीर केले. निषेध म्हणून आंदोलन असून कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभागी व्हावे, असेही आवाहन त्यांनी केले.

गायकवाड-पोवार यांच्यात वाद
गायकवाड आणि पोवार यांच्यात बैठकीत काही मुद्द्यांवर वाद झाला. शाब्दिक बाचाबाची झाली. या वेळी बैठकीत तणाव वाढला. पोलिसांनीही तातडीने बंदोबस्त वाढवला. अखेर सर्वच मुद्द्यांचे खंडण झाल्यावर मीही आंदोलक असल्याचे गायकवाड यांनी जाहीर केले. पोवार यांनी ही गैरसमजातून अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली होती असे सांगून वादावर पडदा टाकला.

 

Web Title: Kolhapur News New Shivaji Bridge work issue