दडलेल्या पर्यटनाची होणार आडवाटेने सफर...

सुधाकर काशीद
मंगळवार, 30 जानेवारी 2018

कोल्हापूर जिल्ह्यात नेहमीच्या पर्यटनाऐवजी आडवाटेलाच खूप चांगले पर्यटन दडले आहे आणि हे दडलेले पर्यटन सर्वांच्या नजरेस यावे म्हणून ‘आडवाटेचे पर्यटन’ ही संकल्पना कोल्हापुरात राबवली जाणार आहे.

कोल्हापूर - जिल्ह्यातील पर्यटन म्हटले की, आंबा, दाजीपूर, गगनबावडा, आंबोली, रांगणा, विशाळगड, पन्हाळा या ठिकाणावरच आपण आणि बाहेरचाही पर्यटक जातो. कारण कोल्हापूरचा तेवढाच भौगोलिक इतिहास आपण लहानपणापासून वाचत आलेलो असतो. परंतु कोल्हापूर जिल्ह्यात नेहमीच्या पर्यटनाऐवजी आडवाटेलाच खूप चांगले पर्यटन दडले आहे आणि हे दडलेले पर्यटन सर्वांच्या नजरेस यावे म्हणून ‘आडवाटेचे पर्यटन’ ही संकल्पना कोल्हापुरात राबवली जाणार आहे.

सुरुवातीच्या टप्प्यात पहिल्यांदा कोल्हापुरातीलच लोकांना या आडवाटेचे दर्शन व्हावे, यासाठी लोकांना या ठिकाणावर कसे न्यायचे याचे नियोजन करण्याचे काम चालू आहे. साधारण एप्रिल-मे मध्ये या आडवाडेच्या पर्यटनाला सुरुवात होईल.
कोल्हापूरचा भौगोलिक इतिहास खूप वैविध्याने भरलेला आहे. शहरापासून पश्‍चिमेला साधारण ६५ ते ७० किलोमीटरवर घाट व जंगलाचा परिसर आहे. आंबा, फोंडा, भुईबावडा, करूळ, तिलारी, आंबोली हे कोकणाला जोडणारे घाट आहेत. हिरवागार आणि कणखर, राकट सह्याद्री याच परिसरात हिरवाईत दडला आहे. वन्य प्राण्यांचे अस्तित्व ताजे व नित्याचे आहे; पण पर्यटकांचा ओघ त्यापैकी ठरावीक भागातच आहे. इतर ठिकाणी दडलेल्या निसर्गस्थळांचे दर्शनही ठरावीक निसर्गप्रेमी व त्या त्या परिसरातील रहिवासी वगळता कोणी घेतलेले नाही. आपला निसर्गाचा ठेवा आपल्यालाच माहिती नसल्याने आपण तिकडे जात नाही, ही परिस्थिती आहे.

पडसाळीतील पठारे...

या पार्श्‍वभूमीवर ‘आडवाटेचे पर्यटन’ हा उपक्रम खूप वेगळा ठरणार आहे. उदाहरणच द्यायचं झालं तर पन्हाळा तालुक्‍यातील पडसाळी या जिल्ह्याच्या टोकाच्या भागात कावणाईचा सडा, ससे टेंभीचा सडा, वळताईचा सडा अशी निसर्गाने परिपूर्ण भरलेली पठारे आहेत. त्या भागातल्या रहिवाशांची ये-जा, भन्नाट वारे वगळता त्या भागात दुसरे काहीही नाही. तिथली जैवविविधता कास पठारासारखीच आहे. आपल्या परिसरातील ही वैविध्ये लोकांच्या नजरेत यावीत, यासाठी हे आडवाटेचे पर्यटन आहे. 

गगनबावड्यातील वीरगळी (दगडी शिल्प) 

गगनबावडा परिसरात अशा काही वीरगळी (दगडी शिल्प) उघड्यावर आहेत की, त्याचा संदर्भ सहाव्या, सातव्या शतकापर्यंत जातो. पळसंब्याची एकपाषाणी मंदिरे म्हणजे एका मोठ्या दगडात खोदून तयार केलेल्या चार ते पाच मंदिरांचा समूह आहे. चक्रेश्‍वरवाडीतील शिल्पकृती तर अचंबित करणाऱ्या आहेत. सोनवडे घाटाजवळ गडनदीचा धबधबा म्हणजे निसर्गाची अद्‌भुत देणगी आहे.

कोल्हापुरातील लोक पर्यटनासाठी बाहेर जातात; पण त्यांनाच कोल्हापूरचे हे वैभव पाहता यावे, त्यानंतर ते बाहेरच्या पर्यटकांपर्यंत पोहोचावे, याच हेतूने हे आयोजन केले आहे. जाणकार कोल्हापूरकरांना या स्थळावर कसे न्यायचे, हे निश्‍चित झाले की पुढचे नियोजन होणार आहे.

भौगोलिक, ऐतिहासिक वारसा समोर आणणार
जिल्हा प्रशासन, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, गड-किल्ले अभ्यासक डॉ. अमर अडके, प्रमोद पाटील, उदय गायकवाड, अनिल चौगुले यांची यासंदर्भात प्राथमिक तयारी सुरू आहे. डॉ. अडके, प्रमोद पाटील यांनी साधारण ८३ ठिकाणे निश्‍चित केली आहेत. कोल्हापूरचा केवळ भौगोलिक नव्हे; तर ऐतिहासिक वारसाही लोकांसमोर आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

Web Title: Kolhapur News New Tourism spots in district