जड पावलांनी त्यांनी सोडले कोल्हापूर

सुधाकर काशीद
मंगळवार, 12 जून 2018

कोल्हापूर - हे दोघे नायजेरियाचे. फुटबॉलच्या निमित्ताने पाटाकडील तरुण मंडळाच्या संपर्कात आले. मंगळवार पेठेत तालमीच्या तिसऱ्या मजल्यावरच राहिले. फुटबॉलचे मैदान त्यांनी गाजवले. तालमीला सलग पाच स्पर्धा जिंकून देण्यासाठी दोघे जीव ओतून खेळले. मैदानावर जसे ते खेळले तसे बघता बघता तालमीच्या परिसरातही ते रमून गेले.

कोल्हापूर - हे दोघे नायजेरियाचे. फुटबॉलच्या निमित्ताने पाटाकडील तरुण मंडळाच्या संपर्कात आले. मंगळवार पेठेत तालमीच्या तिसऱ्या मजल्यावरच राहिले. फुटबॉलचे मैदान त्यांनी गाजवले. तालमीला सलग पाच स्पर्धा जिंकून देण्यासाठी दोघे जीव ओतून खेळले. मैदानावर जसे ते खेळले तसे बघता बघता तालमीच्या परिसरातही ते रमून गेले. त्यांना मराठी भाषेचा गंध नाही आणि इथल्या बहुतेकांचे इंग्रजी भाषेशी कधी जुळले नाही. तरीही त्यांचे संवादाशिवाय मंगळवार पेठेशी नाते जुळले. काल ते त्यांच्या मायदेशी परत निघाले आणि त्यांच्या निरोपाला परिसरातले सारे बाया बापडे जमा झाले.

अबॉए एकीम, इथोह डेव्हिड अशी या खेळाडूंची मूळ नावे; पण अबॉए येथे ओला नावाने ओळखला जाऊ लागला. दोघे नायजेरियातील फुटबॉलपटू. कोल्हापुरात एखाद्या फुटबॉल संघाकडून दोन परदेशी खेळाडूंना खेळविण्याची मान्यता असल्याने पीटीएम संघाने या दोघांना आपल्या संघाकडून निवडले. त्यांना प्रत्येकी सव्वा लाख रुपये व राहण्या-जेवणाची व्यवस्था करण्यात आली. दोघे तालमीच्या तिसऱ्या मजल्यावर राहू लागले. दररोज सकाळी न चुकता सरावासाठी येऊ लागले.

इथले खेळाडू व त्यांच्यात सूर जमण्यास काही दिवस गेले. बघता बघता ते ‘पिव्वर पीटीएम’वाले झाले. ओला फॉरवर्डला खेळायचा. एकावेळी प्रतिस्पर्धी संघाचे तीन-तीन खेळाडू त्याला घेरायचे; पण तो एकटा पुरून उरायचा. पीटीएमचे इतर सर्व खेळाडू व या दोघांचा सूर इतका जमला, की केएसए लीग, राजेश, अटल, महापौर व सतेज अशा सलग पाच चषकांवर पीटीएमचाच शिक्का बसला. 

फुटबॉल मॅच व सरावानंतरच्या या वेळेत ओला व डेव्हिड हे लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांत मिसळून गेले. लहान मुलांना खिसा भरून चॉकलेट वाटत राहिले. मैदानावर त्यांनी कधी आगाऊपणा केला नाही. कधी वाद केला नाही. शांतपणे पण ताकदीने ते खेळत गेले आणि कोल्हापूरच्या फुटबॉल विश्‍वाचेही ते लाडके झाले. 

त्यांच्या व्हिसाची मुदत संपत आल्याने काल त्यांनी नायजेरियाला परत जाण्याचा निर्णय घेतला. त्यांना निरोप देण्यासाठी सगळा परिसर फुलला. ‘नमष्कार, नमष्कार आमी जातो,’ असे म्हणत ते घराघरांत गेले. ज्येष्ठांच्या पाया पडले. फोटो काढून घेतले. त्यांच्याबरोबर सेल्फी काढून घेण्यासाठी तर झुंबड उडाली. माता-भगिणींनी त्यांची ओवाळणी केली आणि अक्षरश: डबडबलेल्या डोळ्यांनी ओला व डेव्हिडने तालमीची पायरी उतरली. कोल्हापूरकर एखाद्या खेळाडूला, एखाद्या कलाकाराला त्याचा देश, त्याचा धर्म, त्याची जात-पात न पाहता आपलेसे कसे करतात, याची प्रचिती त्यांना आली. 

Web Title: Kolhapur News Nigerian Football player special