पाच हजारांवर विद्यार्थ्यांच्या घरी नाही शौचालय

सुनील पाटील
बुधवार, 4 एप्रिल 2018

कोल्हापूर - राष्ट्रीय स्वच्छ भारत अभियानात ‘स्वच्छता दर्पण’ पुरस्कार मिळालेल्या कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शाळेत चौथी ते आठवीत शिकणाऱ्या पाच हजार ८८७ विद्यार्थ्यांच्या घरी शौचालय नाही. तीन हजार ५३८ विद्यार्थ्यांनी शाळेत स्वच्छतागृह स्वच्छ नसल्याचे मत दिले. सधन कोल्हापुरातही अद्याप हजारो विद्यार्थांना उघड्यावर किंवा पर्यायी ठिकाणी शौचालयास जावे लागत असल्याचे समोर आले.

कोल्हापूर - राष्ट्रीय स्वच्छ भारत अभियानात ‘स्वच्छता दर्पण’ पुरस्कार मिळालेल्या कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शाळेत चौथी ते आठवीत शिकणाऱ्या पाच हजार ८८७ विद्यार्थ्यांच्या घरी शौचालय नाही. तीन हजार ५३८ विद्यार्थ्यांनी शाळेत स्वच्छतागृह स्वच्छ नसल्याचे मत दिले. सधन कोल्हापुरातही अद्याप हजारो विद्यार्थांना उघड्यावर किंवा पर्यायी ठिकाणी शौचालयास जावे लागत असल्याचे समोर आले.

जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागातर्फे गांधी जयंतीनिमित्त २ ऑक्‍टोबर २०१७ ला विद्यार्थांच्या वैयक्तिक स्वच्छतेबाबत आठ प्रश्‍नांवर मतदान घेण्यात आले. मतदानात जिल्ह्यातील ८२ हजार १५५ विद्यार्थ्यांनी मतदानाचा हक्क बजावला. स्वत:बाबत प्रश्‍न असणाऱ्या मतपत्रिकेतून व्यक्त मतांतून धक्कादायक माहिती समोर आली. 

जिल्ह्यात २००२ पासून सुरू असलेल्या ‘स्वच्छता ही सेवा’ या अभियानांतर्गत ‘स्वच्छता मतदान २०१७’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला होता. गांधी जयंतीदिनीच बालसभेत जिल्ह्यातील चौथी ते आठवीतील ८९ हजार १७१ विद्यार्थ्यांपैकी तब्बल ८२ हजार १५५ म्हणजे ९२ टक्के विद्यार्थ्यांनी स्वच्छतेबाबत विचारलेल्या प्रश्‍नावर मतदान केले.

ज्या-त्या शाळांत मतदान घेतले. जिल्ह्यातील एकूण ८२ हजार १५५ विद्यार्थ्यांपैकी पाच हजार ८८७ विद्यार्थ्यांना  स्वत:चे शौचालय नाही. तर, तीन हजार ५३८ विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेतील शौचालय स्वच्छ नसल्याचे मत दिले (खासगी शाळांतही हीच परिस्थिती आहे). एकीकडे सांडपाणी व्यवस्थापनासाठी कोट्यवधीचा निधी खर्च केला जात असल्याचे सांगितले जाते. मात्र, याच चौथी ते आठवीत शिकणाऱ्या १४ हजार ७५२ विद्यार्थ्यांनी त्यांच्या घरातील सांडपाणी रस्त्यावर किंवा उघड्यावरच सोडत असल्याचे सांगितले.

लहान वा मोठे असो, सर्वांनीच जेवणापूर्वी साबणाने हात धुवावेत, यासाठी शासन हात धुवा यांसारखे उपक्रम राबवत आहे. तरीही, जिल्ह्यातील एक हजार ७२४ विद्यार्थी जेवणापूर्वी हात धुवत नाहीत. शाळेत स्वच्छतेचे धडे घ्यायचे; पण प्रत्यक्षात मात्र या सुविधेकडे दुर्लक्ष करायचे, असे चित्र आहे. 

स्वच्छता मतदानातून विद्यार्थ्यांनी शौचालयाबाबत दिलेल्या माहितीचा आधार घेऊन याच महिन्यात (एप्रिल) १५० शौचालये मंजूर केली जातील. नरेगा योजनेतून १०० शौचालयांना मंजुरी देता येईल. ज्या शाळांत शौचालये अस्वच्छ आहेत, त्यासाठी ज्या-त्या ग्रामपंचायतीला सूचना देऊन ही शौचालये स्वच्छ करण्यावर भर दिला जाईल.
 - डॉ. कुणाल खेमणार, 

मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

Web Title: Kolhapur News No toilet in 5 thousand students house