तुडये येथे अखेर ‘बाटली आडवी’

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 जानेवारी 2018

चंदगड - तुडये (ता. चंदगड) येथे दारूबंदीसाठी घेण्यात आलेल्या मतदानात महिलांनी ‘बाटली आडवी’ करून दारूबंदी केली. यासाठी आज मतदान झाले. एक हजार ६०४ पैकी एक हजार २४१ महिलांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यापैकी आडव्या बाटलीसाठी एक हजार २१, तर उभ्या बाटलीसाठी फक्त १४८ महिलांनी मतदान केले. ७२ मते अवैध ठरली. ​

चंदगड - तुडये (ता. चंदगड) येथे दारूबंदीसाठी घेण्यात आलेल्या मतदानात महिलांनी ‘बाटली आडवी’ करून दारूबंदी केली. यासाठी आज मतदान झाले. एक हजार ६०४ पैकी एक हजार २४१ महिलांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यापैकी आडव्या बाटलीसाठी एक हजार २१, तर उभ्या बाटलीसाठी फक्त १४८ महिलांनी मतदान केले. ७२ मते अवैध ठरली. नायब तहसीलदार डी. एम. नांगरे यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले.

तुडयेत मध्यवस्तीत पी. टी. गुरव (हॉटेल गुरुप्रसाद), एम. डी. हुलजी (हॉटेल वसंत), लक्ष्मण सातेरी (हॉटेल श्रद्धा); तर दयानंद कृष्णा मोहिमे यांची कंट्री लिकर व बिअर शॉपी अशी पाच दुकाने आहेत. येथे मद्यपींचा त्रास होत असल्याने महिलांनी सहा महिन्यांपूर्वी चंदगड तहसीलदार व जिल्हाधिकाऱ्यांकडे दारूबंदी व दुकाने बंद करावीत, अशी मागणी केली होती. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक घेऊन दारूबंदी करावी, असा आदेश चंदगड तहसीलदारांना दिला. या पार्श्‍वभूमीवर आज मतदान झाले.

सकाळी सहाला मराठी शाळेत दोन केंद्रांवर मतदानास सुरवात झाली. मतपत्रकांद्वारे मतदान झाले. रात्री आठला निवडणूक अधिकारी श्री. नांगरे यांनी निकाल जाहीर करताच समर्थक महिला व युवकांनी फटाक्‍यांची आतषबाजी करून आनंद साजरा केला. मंडल अधिकारी संजय राजगोळी, तलाठी शरद नाकाडी, ग्रामसेवक यांनी सहायक निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले.शारदा बसरीकट्टी, अनिता पाटील, सिंधू हुलजी, चांगुणा मोहिते, कस्तुरी झाजरी, भुजंग पाटील, हणमंत पाटील, तंटामुक्त अध्यक्ष नंदकुमार पाटील, सभापती जगन्नाथ हुलजी, सरपंच शिवाजी कांबळे, उपसरपंच मधुकर पाटील, संस्थांचे पदाधिकारी, महिला बचतगट, युवक मंडळांनी घेतलेल्या प्रयत्नांमुळेच दारूबंदी यशस्वी झाली.

Web Title: Kolhapur News no wine shop in Tudaye