कोल्हापूरात फलकांसाठी ‘एनओसी’ सक्तीची

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 जानेवारी 2018

कोल्हापूर - ज्यांना अद्याप मिसुरडे फुटले नाही, त्यांच्या वाढदिवसाचे फलक शहरातील चौकाचौकांत-कोपऱ्यांवर उभे राहत आहेत. शहराचे विद्रुपीकरण वाढत आहे. फलकांच्या माध्यमातून वादाचे प्रसंग उद्‌भवत आहेत. इर्षेतून तणाव निर्माण होत आहेत.

कोल्हापूर - ज्यांना अद्याप मिसुरडे फुटले नाही, त्यांच्या वाढदिवसाचे फलक शहरातील चौकाचौकांत-कोपऱ्यांवर उभे राहत आहेत. शहराचे विद्रुपीकरण वाढत आहे. फलकांच्या माध्यमातून वादाचे प्रसंग उद्‌भवत आहेत. इर्षेतून तणाव निर्माण होत आहेत. हे टाळण्यासाठी येथून पुढे वाढदिवसाचे डिजिटल फलक उभारताना पोलिसांचा ना हरकत दाखला (एनओसी) घ्यावा लागणार आहे.

पोलिस उपअधीक्षकांनी डिजिटल प्रिंटिंग करणाऱ्यांसह होर्डिंग असोसिएशनच्या सर्व सदस्यांना आज ‘पोलिसांचा दाखला असल्याशिवाय अनधिकृत आणि अधिकृत होर्डिंगवर वाढदिवसाचे फलक उभे करू नये’, अशा नोटिसा पाठविल्या. साधारण १५० नोटिसा आज पाठविण्यात आल्या आहेत. नोटिशीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल.

शहरातील अनधिकृत डिजिटल फलकांनी होणारे विद्रुपीकरण थांबविण्यासाठी आता पोलिसांनीच पुढाकार घेतला. त्यातूनच शहरातील डिजिटल प्रिंटिंग ऑणि होर्डिंग असोसिएशनला पोलिसांची ‘एनओसी’ घेतल्याशिवाय वाढदिवसाचे फलक उभे करू नयेत, असा इशारा दिला. यामुळे येथून पुढे वाढदिवसाचे फलक उभारण्यासाठी पोलिसांची परवानगी आवश्‍यकच राहणार आहे. शहरात चौकांतील पथदीपांचा आधार घेऊन वाढदिवसाचे, शुभेच्छांचे फलक उभारण्यात येत असल्याचे दिसून येते. कोपऱ्या-कोपऱ्याला चौका-चौकांत दोन-चार दिवसांसाठी फलक उभारले जातात. यातून वर्चस्वाची इर्षा वाढून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होतो.

... तर गुन्हे दाखल करणार
सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण कायद्याच्या कलम तीन, चार आणि सात अन्वये पोलिसांकडून गुन्हे दाखल केले जाणार आहेत. फलकांवर ज्यांची छबी असेल, त्यांचाही यात समावेश असेल. त्याप्रमाणे तो फलक उभा करणे, त्याचे डिजिटल प्रिंटिंग करणे यांच्यावरही गुन्हे दाखल केले जाणार आहेत. बॉम्बे पोलिस ॲक्‍ट १४० नुसार ही कारवाई केली जाईल. १८८ कलमांनुसारही कारवाई केली जाणार आहे. 

डिजिटल प्रिंटिंग करणाऱ्या शहरातील १०० प्रिंटरना नोटिसा पाठविण्यात आल्या. होर्डिंग असोसिएशनच्या सदस्यांनाही नोटिसा पाठविल्या. वाढदिवसाचे फलक जाहिरात होर्डिंगवर लावण्यापूर्वी पोलिसांचा दाखला पाहावा. प्रिंटिंग करण्यापूर्वीही नोटीस पाहावी, आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर थेट कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला. अशा ठिकाणी कोणाच्याही दबावाला बळी न पडता कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.
- डॉ. प्रशांत अमृतकर,
शहर पोलिस उपअधीक्षक

Web Title: Kolhapur News NOC compulsion for Digital