निवृत्तीच्या दिवशी लाच घेताना अटक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 जून 2018

कोल्हापूर - निवृत्तीच्या दिवशी दीड हजाराची लाच घेणाऱ्या वन विभागातील लेखापालास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज रंगेहाथ पकडले. सदाशिव ज्ञानदेव सातपुते (वय ५८, मूळ रा. मिणचे खुर्द, भुदरगड, सध्या रा. अष्टेकरनगर, लाईन बाजार) असे त्या संशयिताचे नाव आहे. ताराबाई पार्क येथील उपवनसंरक्षक कार्यालयात दुपारी ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिस उपअधीक्षक गिरीश गोडे यांनी सांगितले. 

बांदिवडे (ता. पन्हाळा) येथील अनिल पांडुरंग गवळी जमीन खरेदी-विक्रीचे काम करतात. त्यांच्याकडून शेंबवणे (ता. शाहूवाडी) येथील श्रीमती सीताबाई पानकर या मौजे गावडी (ता. शाहूवाडी) येथील ११८ एकर जमीन खरेदी करणार होत्या. खरेदीपूर्वी ही जमीन ‘इको सेन्सेटिव्ह झोन’खाली आरक्षित आहे काय, याची खात्री त्यांना करून घ्यायची होती. याबाबतचा दाखला मिळावा, यासाठी गवळी यांनी ताराबाई पार्क येथील उपवनसंरक्षक कार्यालयात अर्ज केला होता. हे काम लेखापाल सदाशिव सातपुते याच्याकडे होते. पण तो हा दाखला देण्यास टाळाटाळ करत होता. अखेर गवळी यांनी त्याची भेट घेतली. त्यावेळी त्याने दाखल्यासाठी पाच हजार रुपये घेतो, पण तुम्ही दोन हजार रुपये लाच द्या, अशी मागणी केली. अखेरीस तडजोडीनंतर ही रक्कम दीड हजार रुपये इतकी ठरली. याची तक्रार गवळी यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे आज केली. 

ताराबाई पार्क येथील उपसंरक्षक कार्यालयात सापळा रचला. ठरल्याप्रमाणे गवळी दुपारी लाच देण्यासाठी कार्यालयात गेले. त्यांच्याकडून लाचेची रक्कम स्वीकारून दाखला देण्याचा प्रयत्न करणाऱ्या लेखापाल सातपुते याला पोलिसांनी रंगेहाथ पकडले. ही कारवाई पोलिस निरीक्षक मारुती पाटील, कर्मचारी श्रीधर सावंत, शरद पोरे, रुपेश माने, नवनाथ कदम, विष्णू गुरव आदींनी केली. रात्री त्याच्या घराची झडती विभागाने घेतली.  

Web Title: Kolhapur News one arrested in bribe case