गडहिंग्लज तालुक्यात आगीत महिलेचा मृत्यू

अजित माद्याळे
गुरुवार, 7 डिसेंबर 2017

गडहिंग्लज - गिजवणे (ता. गडहिंग्लज) येथील सुतार गल्लीतील घराला आग लागून एका महिलेचा मृत्यू झाला. पुष्पा पांडूरंग जाधव (वय 40) असे मृत महिलेचे नाव आहे. आज सकाळी दहाच्या सुमारास ही घटना घडली. या आगीत घराचेही मोठे नुकसान झाले असून घरातील संपूर्ण संसार साहित्य जळून खाक झाले आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

गडहिंग्लज - गिजवणे (ता. गडहिंग्लज) येथील सुतार गल्लीतील घराला आग लागून एका महिलेचा मृत्यू झाला. पुष्पा पांडूरंग जाधव (वय 40) असे मृत महिलेचे नाव आहे. आज सकाळी दहाच्या सुमारास ही घटना घडली. या आगीत घराचेही मोठे नुकसान झाले असून घरातील संपूर्ण संसार साहित्य जळून खाक झाले आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

सौ. जाधव यांचे पती पांडूरंग सेंट्रींगचे काम करतात. आज सकाळी नेहमीप्रमाणे ते कामावर गेले. साडेनऊच्या सुमारास दोन्ही मुले शाळेला गेली. त्यानंतर पुष्पा एकटीच घरी होती. दरम्यान साडेदहाच्या सुमारास घरातून धूर येवू लागला. आगीच्या ज्वाळा बाहेर पडू लागल्या. यामुळे शेजारच्या नागरिकांनी पांडूरंगला मोबाईलवरून त्याची कल्पना दिली. इतक्‍यात दोन्हीकडील दरवाजाला आतून कडील असल्याने शेजारच्या तरूणांनी घरावर चढून खापऱ्या काढल्या. आग आटोक्यात आणण्याची धडपड सुरू केली. पालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण केले. गॅस सिलेंडर टाकीही तत्काळ बाजूला करून घराच्या मागे सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आली. 

तीन खोलीच्या घरामध्ये मधल्या खोलीत कॉटजवळच पुष्पा जळालेल्या अवस्थेत दिसल्या. कॉटवर गुंडाळून ठेवलेली गादीही जळून खाक झाली होती. शंभर टक्के भाजल्याने जागेवरच त्यांचा मृत्यू झाला होता. आगीत पूर्ण जळाल्याने पुष्पाचा मृतदेह भाजून काळे ठिक्कर पडले होते. केवळ हाडांचा सांगाडाच शिल्लक होता. चुलीवर करीत असलेला स्वयंपाकही अर्धवट अवस्थेत होता. मळलेले चपातीचे पीठ तसेच होते.  खाद्य तेलाचा डबा चुलीजवळ उघडाच होता. दुधाचे भांडेही जैसे थे होते. स्वयंपाकाचे साहित्य तसेच पडलेले होते. आगीचे नेमके कारण दुपारपर्यंतही समजलेले नव्हते. सुरूवातीला गॅस गळतीमुळे आग लागल्याची चर्चा होती. परंतु सिलेंडरची टाकी सुरक्षित असल्याने ती शक्‍यता पोलिसांनी नाकारली. 

दरम्यान, जेथे आगीची सुरूवात झाली त्या मधल्या खोलीचे छप्परही जळाले होते. तेथूनच खापऱ्या काढून अग्निशमन दलाने पाण्याद्वारे आगीवर नियंत्रण मिळविले. या आगीत घराचे मोठे नुकसान झाले. आगीने तिन्ही खोल्या व्यापल्याने संसार साहित्य जळून खाक झाले होते.

पुष्पाचे माहेर आजरा तालुक्‍यातील भादवण हे आहे. चौदा वर्षापूर्वी पुष्पाचा विवाह पांडूरंगशी झाला. या दाम्पत्याला दोन मुले आहेत. पांडूरंगचे आई-वडील स्वतंत्र राहतात. 

Web Title: Kolhapur News one women dead in a fire incidence