रेल्वे स्टेशन सजले कोल्हापुरी परंपरांनी...

सुधाकर काशीद
शनिवार, 13 जानेवारी 2018

कोल्हापूर - रेल्वे स्टेशनच्या भिंती म्हणजे रखडलेले रंग, पानाच्या पिचकाऱ्या, पोस्टर्स, युनियनच्या घोषणा, किंबहुना रेल्वे स्थानक म्हणजे असेच वातावरण असणार हे ठरून गेलेले. परंतु, कोल्हापूर रेल्वे स्थानक या पारंपरिक वातावरणाची कात झटकत आहे. या स्थानकाच्या भिंतींवर कोल्हापूरच्या तरुण कलाकारांची कला साकारत आहे. नवे रूप, नवा चेहरा घेऊन या भिंती समोर येत असून, दळवीज आर्ट व इतर तरुण कलाकारांनी रेल्वे स्थानकाची भिंत बघत बसावी अशी देखणी केली. कोल्हापूरची सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक परंपरा त्यांनी भिंतींवर साकारली आहे.

वास्तविक, रेल्वे प्रशासन म्हणजे ठरलेल्या पठडीतच सगळा कारभार; पण कृष्णात पाटील हे मराठमोळे व्यक्तिमत्त्व रेल्वेच्या उपमहाव्यवस्थापक पदावर रुजू झाले आणि त्यांनी रेल्वेचे पारंपरिक प्रशासन व नव्या वाटचालीतले नवे बदल याची सांगड घालत रेल्वे स्थानकाचे स्वरूपच बदलायचे ठरवले. यासाठी फार मोठा स्वतंत्र निधी नसतानाही त्यांनी यासाठी मार्ग काढला. स्थानिक कलावंतांशी त्यांनी संपर्क साधला. रेल्वे स्थानकाच्या भल्या मोठ्या भिंती म्हणजेच कॅनव्हास समजून त्यावर कला साकारण्याचे आवाहन केले. त्यासाठी काही सुविधाही देऊ केल्या. दळवीज आर्टस्‌चे अजय दळवी यांनीही नवोदित पण नवे काही प्रयोग करू पाहणाऱ्या कलावंतांना एकत्र केले व सूरज शेलार या वेगळ्या जाणिवेच्या कलावंताच्या नेतृत्वाखाली १६ तरुण कलावंतांचे हात अगदी पायाड बांधण्यापासून ते रेखाटन करण्यात गुंतून गेले.

कोल्हापूर हे मॉडेल रेल्वे स्थानक होणार आहे. धार्मिक, सामाजिक, ऐतिहासिक व सांस्कृतिक अशा या गावात रेल्वेतून प्रवाशाने उतरल्या क्षणी त्याला रेल्वे स्थानकाचे स्वच्छ, सुंदर रूपडे पाहायला मिळणार आहे. त्याची चांगली सुरवात झाली.
- कृष्णात पाटील, 

रेल्वे वरिष्ठ वाणिज्य विभागीय व्यवस्थापक

पहिल्या टप्प्यात मुख्य प्रवेशद्वाराजवळच छत्रपती शिवाजी, महाराणी ताराबाई, राजर्षी शाहू महाराज, पन्हाळगड, महालक्ष्मी मंदिर, टाऊन हॉल, नवीन राजवाडा, रंकाळा, जुना राजवाडा याची रेखाटने केली. दुसऱ्या टप्प्यात दोन प्लॅटफॉर्मच्या मध्ये असलेल्या कट्ट्यावर सलग एकाच प्रकारचे रेखाटन केले जाणार आहे; जेणेकरून हे रेखाटन म्हणजे कोल्हापूर रेल्वे स्थानकाचा परिसर हे ठसवले जाणार आहे. रेल्वे स्थानकाची इमारत १०० वर्षांपूर्वीची आहे. काळानुरूप  त्यात जरूर बदल झाले आहेत; तरीही वेगळी प्रकाश योजना करून स्थानकाचा मूळ चेहरा नव्या पिढीसमोर येईल, अशी रचना केली जाणार आहे.

या कलावंतांनी घेतले परिश्रम
सूरज शेलार, गणेश राऊळ, पंकज गवंडी, आकाश झेंडे, पुष्पक पांढरबळे, विजय उपाध्ये, प्रीतम कुंभार, विनायक पाटील, प्रसाद राऊत, विशाल मेणे, शुभम चेचर, दुर्गा आजगावकर, अनिशा पिसाळ, प्रतीक्षा व्हनबट्टे, भूषण म्हापणकर, कृष्णा म्हेतर या तरुण कलावंतांचे हात रेल्वे स्थानकाचे रूप पालटण्यासाठी एकवटले आहेत.

Web Title: Kolhapur News paintings on Railway Station