पंचगंगा नदीला वाचवूया रे

गणेश शिंदे
सोमवार, 30 एप्रिल 2018

जयसिंगपूर - गावात नदी असूनही पिण्यासाठी टॅंकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ पंचगंगा नदीकाठावरील गावावर आली आहे. पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी आंदोलने होऊनदेखील प्रशासनला मात्र याप्रश्‍नी अद्याप गांभीर्य नाही. रासायनिक पाण्याने लोकांसह जनावरांचा आक्रोश सुरू असताना बाटलीबंद पाणी पिणाऱ्या अधिकाऱ्यांना याचे वास्तव समजणार तरी कधी, अशी विचारणा हतबल ग्रामस्थांमधून होऊ लागली आहे.

जयसिंगपूर - गावात नदी असूनही पिण्यासाठी टॅंकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ पंचगंगा नदीकाठावरील गावावर आली आहे. पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी आंदोलने होऊनदेखील प्रशासनला मात्र याप्रश्‍नी अद्याप गांभीर्य नाही. रासायनिक पाण्याने लोकांसह जनावरांचा आक्रोश सुरू असताना बाटलीबंद पाणी पिणाऱ्या अधिकाऱ्यांना याचे वास्तव समजणार तरी कधी, अशी विचारणा हतबल ग्रामस्थांमधून होऊ लागली आहे. पंचगंगा प्रदूषणमुक्तीसाठीच्या आराखड्याच्या कार्यवाहीलादेखील अद्याप मुहूर्त मिळालेला नाही.

३३ वर्षांपासून पंचगंगा प्रदूषणमुक्त करण्यासाठी लढा अखंडितपणे सुरू आहे. कोल्हापुरातील बारा नाले तसेच मार्गावरील गावागावातील गावांचे सांडपाणी थेट पंचगंगेत मिसळते. त्यामुळे पंचगंगेची गटारगंगा बनली आहे.

नदीकाठावरील लोकांमध्ये जागृती केली जात आहे, मात्र याला म्हणावा तसा प्रतिसाद मिळू शकला नाही. नदी प्रदूषण रोखण्यासाठी कोल्हापूर शहरानेही प्रयत्न केले आहेत. प्रदूषण नियंत्रण मंडळाने साडेचारशे कोटी रुपयांचा आराखडा तयार केला होता. 

पंचगंगा नदी खोऱ्याचा अहवाल तयार केला. नेमके प्रदूषण करणाऱ्या घटकांची इत्यंभूत माहिती सादर केली. दीर्घ आणि लघुकालीन असे वर्गीकरण झाले. मात्र, यानंतर काहीच हालचाली नाहीत.

कोल्हापूर, इचलकरंजी शहरातील सांडपाणी, औद्योगिक वसाहतींचे रासायनिक पाणी थेट पंचगंगेत सोडले जात आहे. यावर प्रशासनाचा अंकुश नसल्याने मोठा विरोध होऊनही 
नदी प्रदूषण करणाऱ्यांवर जरब बसली नाही. ८४ गावांपैकी ३९ गावांचे सर्वाधिक प्रदूषण पंचगंगेला मारक ठरत आहे.

अधिकाऱ्यांकडून याप्रश्‍न सकारात्मक पावले उचलली जात नाहीत. प्रदूषण करणाऱ्या घटकांवर कारवाईची गरज आहे. 
- विजय भोजे,
जिल्हा परिषद सदस्य

पंचगंगा प्रदूषणमुक्त व्हावी, यासाठी लोकचळवळ उभी करणार आहे. प्रदूषणमुक्त पंचगंगेसाठी काम करू या.
- उल्हास पाटील,
आमदार

Web Title: Kolhapur News Panchagang River Pollution Issue