दगड निखळल्यास पंचगंगेवरील शिवाजी पूल कोसळण्याचा धोका

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 मार्च 2018

कोल्हापूर - वशिष्ठी नदीवरील पुलाची दुर्घटना झाल्यानंतर राज्यातील जुन्या पुलांचे स्ट्रक्‍चरल ऑडिट करण्याचे आदेश काढण्यात आले. त्यानुसार पंचगंगा नदीवरील शिवाजी पुलाचे ऑडिट करण्यात आले. धुव्र कन्सल्टन्सीने सार्वजनिक बांधकामचे कार्यकारी अभियंता विजय कांडगावे यांनी त्याबाबतचा अहवाल दिला.

कोल्हापूर - वशिष्ठी नदीवरील पुलाची दुर्घटना झाल्यानंतर राज्यातील जुन्या पुलांचे स्ट्रक्‍चरल ऑडिट करण्याचे आदेश काढण्यात आले. त्यानुसार पंचगंगा नदीवरील शिवाजी पुलाचे ऑडिट करण्यात आले. धुव्र कन्सल्टन्सीने सार्वजनिक बांधकामचे कार्यकारी अभियंता विजय कांडगावे यांनी त्याबाबतचा अहवाल दिला.

अहवालात पुलाची कमान, पुलावरील रस्ता व कमान यांच्यातील भराव, पुलाचे सांधे, पुलासाठी वापरलेल्या दगडी बांधकामातील दर्जा, वजन पेलण्याची क्षमता आदी बाबींचा बारकाईने अभ्यास करण्यात आला. त्यानंतर सहा वेगवेगळ्या मुद्‌द्‌यांवर पुलासंबंधी अंतिम अहवाल देण्यात आला.

अहवालात म्हटले आहे, की पुलाच्या कमानीची या क्षणी कोणतीही हानी झालेली माही; मात्र पुलाच्या आयुर्मर्यादेचा विचार करता पुलावरून अवजड वाहतूक होत राहिल्यास पुलास धोका उत्पन्न होऊ शकतो. पुलावरून अवजड वाहने जाताना जर धक्के बसत (जर्क) राहिले व त्यामुळे दगड निखळल्यास पूल अचानक कोसळूही शकतो. त्यामुळे पुलावरून अवजड वाहनांची वाहतूक बंद करावी. अन्य सर्व वाहनांचा वेगही पुलावरून जाताना कमी ठेवला जावा.

या पुलाची जी. पी. आर. चाचणीही केली असून त्यात काही ठिकाणी दर्जा निघाल्याचे व पूल, कमान यांच्यातील भरावात काही ठिकाणी पोकळपणा जाणवला आहे. पुलाच्या एंडोस्कोपी चाचणीतही काही ठिकाणी दगडाच्या जोडकामातील दर्जा निघाल्याचे स्पष्ट झाले आहे. अर्थात पुलाचा रस्ता आणि कमान यांतील काही भागात असलेल्या पोकळपणामुळेच पुलावरून अवजड वाहनांची वाहतूक बंद ठेवण्याची शिफारस केली आहे.

नवा पूल भक्कम
पंचगंगा नदीवरील जुन्या पुलाबरोबरच नवीन बांधलेल्या अर्धवट पुलाचेही स्ट्रक्‍चरल ऑडिट करण्यात आले. त्यात अर्धवट नवीन पूल सर्व निकषांवर भक्कम असल्याचा अहवाल दिला आहे.

अहवालातील निर्देशांनुसार पुलाची दर्जाभरणी, रस्त्यातील काही ठिकाणचा पोकळपणा भरून काढण्यासाठी व कमानीवरील झाडेझुडपे काढण्यासाठी तातडीने एस्टिमेट तयार करण्यात येत आहे.
- विजय कांडगावे,
कार्यकारी अभियंता

Web Title: Kolhapur News Panchaganga Shivaji Bridge issue