संगीतातून माणसांचे मनोबल वाढते - पं. हृदयनाथ मंगेशकर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 जानेवारी 2018

कुरुंदवाड - संगीत केवळ गायन, वादनापुरते मर्यादित नसून प्रत्येकाच्या मनापर्यंत भिडण्याचे, माणसाचे मनोबल वाढविण्याचे काम संगीतातून होते, असे मत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी दत्तवाड येथे व्यक्त केले.

कुरुंदवाड - संगीत केवळ गायन, वादनापुरते मर्यादित नसून प्रत्येकाच्या मनापर्यंत भिडण्याचे, माणसाचे मनोबल वाढविण्याचे काम संगीतातून होते, असे मत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी दत्तवाड येथे व्यक्त केले.

दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दत्तवाड (ता. शिरोळ) येथील श्री दत्त भजनी मंडळातर्फे आयोजित राज्यस्तरीय संगीत गायन स्पर्धेच्या समारोपप्रसंगी पं. मंगेशकर बोलत होते. अध्यक्षस्थानी खासदार राजू शेट्टी होते.

पं. मंगेशकर म्हणाले, ‘‘संगीत कलेला मोठी परंपरा आहे. जगातील प्रत्येक देशात त्यांच्या त्यांच्या परंपरेनुसार संगीताची व्याख्या बदलणारी असली तरी त्याची परिणामकारकता समान आहे. दत्तवाडसारख्या ग्रामीण भागातील या भजनी मंडळाने नवोदितांसाठी मोठे व्यासपीठ उभारले असून आपण त्यांच्या पाठीशी राहू. त्यांनी संगीत साधना कायम ठेवावी.’’

गणपतरावांचे कौतुक
दत्तवाडसारख्या ग्रामीण भागातील दत्त भजनी मंडळ अनेक वर्षांपासून गायन स्पर्धा घेते. स्व. सा. रे. पाटील यांचे त्यांना मोठे पाठबळ होते. त्यांच्या पश्‍चात दत्त उद्योगसमूहाचे प्रमुख गणपतराव पाटील यांनी स्वत: पुढाकार घेत ही परंपरा कायम ठेवली. शेती, सहकार, राजकारण, समाजकारणाचा व्याप सांभाळत गणपतराव संगीत गायनाला पाठबळ देत आवड जोपासली आहे, असे गौरवोद्‌गार पं. मंगेशकर यांनी काढले.

या वेळी खासदार शेट्टी, गणपतराव पाटील यांची भाषणे झाली. दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेत कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, पुणे, गोवा येथील उदयोन्मुख गायक सहभागी झाले. या संगीत गायन स्पर्धेने रसिकांना चिंब केले. विजेत्यांना हृदयनाथ मंगेशकर, खासदार राजू शेट्टी, पोलिस उपअधीक्षक विनायक नरळे यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले. जि. प. सदस्य बंडा माने, सिदगोंडा पाटील, कर्णसिंह घोरपडे, प्रसाद धर्माधिकारी, संजय पाटील आदी उपस्थित होते.

भारती वैशंपायन, विनोद ठाकूर, महेश हिरेमठ यांनी पंच म्हणून तर संगीततज्ज्ञ दिलीप शेंडे, बी. ए. जुगळे, के. एन. पाटील यांनी स्पर्धा प्रमुख म्हणून काम पाहिले. सतीश कदम यांना मंगेशकर यांच्या हस्ते समाजभूषण पुरस्कार देण्यात आला. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अशोक सुतार, लक्ष्मण कलगी, अनिल रेळेकर, बाबासाहेब नागराळे, संदीप गुमठे, प्रभाकर पाटील यांनी विशेष प्रयत्न केले. राजू पाटील यांनी स्वागत केले. चंद्रशेखर कलगी यांनी आभार मानले.

स्पर्धेतील विजेते असे, लहान गट - सानिया भुंगारे, अर्णव बुवा, अथर्व गणमुखी, मोठा गट - अमोल मोहिते, गायत्री कुलकर्णी, ओंकार पाटील, अमृता पेडणेकर.

Web Title: Kolhapur News Pandit Rudaynath Mangeshkar comment