पाणीदार रामनवाडीची कथा

सुधाकर काशीद
मंगळवार, 27 मार्च 2018

एका झऱ्याचे पाणी त्यांनी सायफन पद्धतीने अडवले. आज गावातली जमीन बारमाही त्या पाण्याखाली आहे. प्यायला झऱ्याचे झुळझुळू पाणी आहे. एवढा पाण्याचा वापर; पण वीज बिल शून्य आहे. राज्य सरकारने वाडीला ऊर्जाबचत पुरस्कार दिला.

कोल्हापूर - राधानगरी तालुक्‍यातल्या रामनवाडी गावात दरवर्षी तुफान म्हणजे पाच हजार मिलिमीटर पाऊस; पण नोव्हेंबरनंतर वाडीत शेतीला पाणी नाही आणि मार्चनंतर प्यायला पाणी नाही, अशी स्थिती; पण दोन-तीन वर्षांत गावानेच वेणू माधुरी या संस्थेच्या मदतीने प्रयत्न केले.

एका झऱ्याचे पाणी त्यांनी सायफन पद्धतीने अडवले. आज गावातली जमीन बारमाही त्या पाण्याखाली आहे. प्यायला झऱ्याचे झुळझुळू पाणी आहे. एवढा पाण्याचा वापर; पण वीज बिल शून्य आहे. राज्य सरकारने वाडीला ऊर्जाबचत पुरस्कार दिला. आणि त्याहून अभिमानाची बाब म्हणजे देशाच्या उन्नत भारत अभियानचे अध्यक्ष पद्मभूषण विजय भटकर यांच्या हस्ते रामनवाडी विकासाच्या लघुपटाचे सादरीकरण होणार आहे. गाव करेल ते राव करेल काय, या म्हणीची प्रचिती रामनवाडीने कृतीतून दिली.

लवकरच विजय भटकर, पालकमंत्री चंद्रकांत पाटील व वेणू माधुरी ट्रस्टचे संस्थापक भक्ती रसमित्रा स्वामी यांच्या उपस्थितीत हा सोहळा होत आहे. रामनवाडी हे राधानगरी तालुक्‍यातले छोटे गाव. निसर्गाचे वरदान या गावाला जरूर लाभले; पण पडणारा पाऊस साठवण्याची कोणतीही योजना नसल्याने पावसाचे पाणी वाहून जायचे व शेती, पिण्याच्या पाण्यासाठी लोकांना वणवण करायला लागायचे. वेणू माधुरी ट्रस्टने या गावाची माहिती घेतली व पाणी हा गावाच्या जिव्हाळ्याचा प्रश्‍न आहे, हे ओळखून पाण्याचे नियोजन केले. डोंगरातून वाहणाऱ्या झऱ्याचे पाणी सायफन पद्धतीने गावात आणले.

ग्रामीण विकासाचे मॉडेल म्हणून आयआयटी, आयआयएम, एनआयटी या संस्थांनी या गावाचे उदाहरण द्यावे, अशी प्रतिक्रिया विजय भटकर यांनी त्यांच्या पुढे सादर झालेल्या कामावरून दिली. प्रोजेक्‍ट को-ऑर्डिनेटर राहुल देशपांडे यांनी या विकास कामाची मांडणी केली.

लवकरच त्यांच्या उपस्थितीत ‘‘रामनवाडी ग्रामश्री’ या विकास लघुपटाचे सादरीकरण होणार आहे. छोटे गाव किती मोठे काम उभा करू शकते, याचेच ते उदाहरण ठरणार आहे.

आदर्श वाटचालीचा पायंडा..
शेती पाण्याखाली आणली. पिण्याच्या पाण्याची सोय केली. गोमुत्राला आयुर्वेदात असलेली मागणी विचारात घेऊन गावात गोमुत्र डेअरी सुरू केली. गायीच्या शेणापासून धुपबत्ती बनवण्याचे काम घरोघरी महिलांना दिले. प्रत्येक घरात गोबर गॅस प्लॅंट बसवला. गावातील वाद पोलिसात नेण्याऐवजी एकत्रित बसून मिटवण्यावर भर दिला. नऊ वर्षांत एखदाही गावात पोलिस यायची वेळ आली नाही. निरोगी पिढी तयार व्हावी म्हणून अन्न अमृत हा शाळेतील मुलांना पोषण आहार देण्याचा उपक्रम सुरू केला.

विकासाची केस स्टडी..
गावाचा असा विकास झाल्याने रोजगारासाठी बाहेर गेलेले तरुण परत आले. शेतीत व कुटिरोद्योगात रमले. या कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाने गावाला ऊर्जाबचत पुरस्कार दिला. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबाद या आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकिक असलेल्या संस्थेत या गावाच्या विकासाची केस स्टडी केली.

Web Title: Kolhapur News Panidar Ramwadi Special Story