पेरणोलीत आजरा घनसाळचा गुंठ्याला 70 किलोचा उतारा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 नोव्हेंबर 2017

पेरणोली (ता. आजरा) येथे हिंदूराव दत्तात्रय कालेकर यांच्या शेतातील गट नंबर 86 मध्ये आजरा घनसाळचे प्रतिगुंठा 70 किलो इतके विक्रमी उत्पादन मिळाले. एकरी हे उत्पादन सरासरी 28 क्विंटल इतके जाते.

आजरा - पेरणोली (ता. आजरा) येथे हिंदूराव दत्तात्रय कालेकर यांच्या शेतातील गट नंबर 86 मध्ये आजरा घनसाळचे प्रतिगुंठा 70 किलो इतके विक्रमी उत्पादन मिळाले. एकरी हे उत्पादन सरासरी 28 क्विंटल इतके जाते. यामुळे यंदा घनसाळ पिकाचे विक्रमी उत्पादन असल्याचे कृषी विभागाकडून व महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्प (एम.ए.सी.पी.) व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्याकडून सांगण्यात आले. 

हा प्रकल्प आजरा ऍग्रो प्रोड्युसर कंपनी लि. आजरा यांच्यातर्फे तालुक्‍यातील 50 एकर क्षेत्रावर प्रात्यक्षिक राबविले होते. यामध्ये तालुक्‍यातील घनसाळ उत्पादक मसोली, पेरणोली, पोळगाव, देवर्डे, दर्डेवाडी या पाच गावांतील 50 शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता. या शेतकऱ्यांना सेंद्रिय खते, निर्माक, झिंक, फेरस, हिरवळीचे खते व तज्ज्ञांच्याकडून वेळोवेळी मार्गदर्शन केले. यामध्ये सर्व शेतकऱ्यांचा भाताचा उतारा रॅंडम पद्धतीने काढला. यामध्ये श्री. कालेकर यांच्या शेतामध्ये विक्रमी उत्पादन मिळाले. 

श्री. कालेकर यांनी सात गुंठे क्षेत्रात घनसाळची लागवड केली होती. यातील रॅंडम पद्धतीने मापे टाकून एक गुंठ्याचे क्षेत्रातील भाताची कापणी करून काढलेल्या धान्याचे वजन केल्यावर ते 76.50 किलो इतके भरले. यामध्ये वाळवून वजन 70 किलो इतके भरले. तसेच लोंबीतील दाण्यांची संख्या सरासरी 265 ते 305 इतकी होती. दाणे वजनदार असल्यामुळे त्यांचे वजन 70 किलो इतके आल्याचे कृषी विभागाने सांगितले. यानंतर मसोली येथील आप्पा कृष्णा पावले यांच्या शेतात प्रतिगुंठा 48 किलो इतके घनसाळचे उत्पादन मिळाले. एकरी 19.20 क्विंटल इतके उत्पादन मिळाले.

पोळगाव येथील जयसिंग नार्वेकर यांचे घनसाळ पिकाचे उत्पादन प्रति गुंठा 29.20 किलो मिळाले. म्हणजेच एकरी 11 क्विंटल 68 किलो मिळाले. यासाठी एम.ए.सी.पी.चे प्रकल्प उपसंचालक जालिंदर पांगरे, कृषी पणन तज्ज्ञ धनराज पाटील, तालुका कृषी अधिकारी एस. जी. निकम, मंडल कृषी अधिकारी सी. डी. सरदेसाई, गोरखनाथ गोरे व सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक (आत्मा) अमित यमगेकर, आजरा ऍग्रो प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष संभाजीराव सावंत यांचे मार्गदर्शन लाभले. 

घनसाळचे सरासरी उत्पादन एकरी 19.60 क्विंटल 
आजरा तालुक्‍यात यंदा घनसाळीचे उत्पादन एकरी सरासरी 19.60 क्विंटल इतके निघाले आहे. 20-25 वर्षांपूर्वी घनसाळ भाताचे प्रति गुंठा 60 किलो उत्पादन मिळत होते. पण बदलते हवामान, कमी झालेला पाऊस, असमतोल खतांच्या वापर व कीड व रोगाच्यामुळे उत्पादन घटले होते. त्यामुळे या पिकाखालील क्षेत्र घटत होते. पण यंदा या पिकाचे उत्पादन चांगले मिळाल्यामुळे शेतकरी या पिकाकडे वळेल असे चित्र आहे. 

यंदा पावसाचे प्रमाण चांगले राहिले. हवामानही अनुकूल होते. कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन पुरविले. भातावर कीड रोग पडले होते. पण वेळीच फवारणी केल्यामुळे कीड रोग नियंत्रित राहिले. इतर इंद्रायणी, भोगावी सारख्या भात पिकांचेही उत्पादन वाढले आहे. यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक उंचावण्यास मदत होणार आहे. 
- श्रीकांत निकम,
तालुका कृषी अधिकारी, आजरा 

Web Title: Kolhapur News in Pernoli Ajara Ghansal have highest production