तिसंगी, गगनबावड्याच्या  पेट्रोल पंपांवर कारवाई

तिसंगी, गगनबावड्याच्या  पेट्रोल पंपांवर कारवाई

साळवण / असळज - गगनबावडा येथील महाराष्ट्र स्टेट को-ऑप. टोबॅको फेडरेशन लि. (कोल्हापूर) यांच्या मालकीचा पेट्रोल पंप आणि तिसंगी (ता. गगनबावडा) पैकी वेतवडे फाटा येथील पंपावर ठाणे येथील क्राईम ब्रॅंचच्या पथकाने आज छापा टाकला.  तिसंगी पैकी वेतवडे फाटा येथील ओम तत्‌ सत्‌ पेट्रोल पंप रूपाली सागर जामदार यांच्या मालकीचा आहे. इंडियन ऑईल कंपनीचा हा पंप आहे. तपासणीत दोषी  आढळल्याने कारवाई करण्यात आली. येथे केलेल्या तपासणीमध्ये पेट्रोलमध्ये ५ लिटरमागे ३५ मिलीलिटरची तर डिझेलमध्ये ४५ मिलीलिटरची तफावत असल्याचे आढळले. ही कारवाई रात्री साडेआठच्या सुमारास सुरू करण्यात आली ती रात्री उशिरापर्यंत सुरू होती. क्राईम ब्रॅचचे पोलिस निरीक्षक विकास घोडके यांनी तपासणीवेळी पेट्रोल व डिझेल मशिनमधील चार पल्सर कार्ड, दोन कंट्रोल पॅनेल, चार की पॅड जप्त केले. या वेळी पेट्रोल व डिझेल मशिनमध्ये हुबेहुब वैधमापन विभागाच्या सील सारखे सील तयार करून मापामध्ये फेरफार करत असल्याचे दिसून आले.

गगनबावडा पंपामधील तपासणीत चार पैकी तीन नोझलमधून पाच लिटरमागे १० ते २२ मिलिलिटर पेट्रोल व डिझेल कमी मिळत असल्याचे आढळले. त्यामुळे संबंधित पेट्रोल पंप चालकास विधीग्राह्य त्रुटी आढळून आल्याने रि स्टॅंपिंगची नोटीस बजावण्यात आली आहे.

पथकातील पोलिस निरीक्षक विकास घोडके यांनी दिलेली माहिती अशी ः या पेट्रोल पंपावर डिझेल व पेट्रोलचे प्रत्येकी दोन नोझल आहेत. पथकाने चारही नोझलची तपासणी केली. डिझेलच्या एका नोझलमधून तंतोतंत तर अन्य तीनमधून पाच लिटर मागे १० ते २२ मिलिलिटरपर्यंत पेट्रोल व डिझेल कमी मिळाले. पाच लिटरमागे तीस मिलिलिटरच्या आत कमी पेट्रोल व डिझेल ग्राहकांना मिळत असल्याने ही बाब विधीग्राह्य त्रुटीमध्ये येते. त्यामुळे पंप चालकास रि स्टॅंपिंग करण्याची नोटीस बजावली आहे. कारवाईत अन्य कोणत्याही आक्षेपार्ह बाबी आढळून आल्या नाहीत.

ठाण्याचे पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांच्या आदेशानुसार करण्यात आली. कारवाईत ठाणे जिल्हा गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विकास घोडके, उपनिरीक्षक अविनाश महाजन, हवालदार अंकुश भोसले, सुरेश यादव, संतोष सुर्वे, प्रशांत भुर्के, कोल्हापूर गुन्हे अन्वेशण शाखेचे एस. डी. चव्हाण, झेड. आर. पाटील, गगनबावड्याचे शिपाई प्रवीण पाटील, कोल्हापूर वैधमापनशास्त्र निरीक्षक के. डी. बिराजदार, कागल वैधमापनशास्त्र विभागाचे निरीक्षक ल. अ. कुटे, गडहिंग्लज वैधमापनशास्त्र विभागाचे निरीक्षक अ. अ. शिंगाडी यांनी कारवाईत भाग घेतला. 

दोषी आढळल्यास पंपाच्या मालकांवर कारवाई
गांधीनगर ः पेट्रोल आणि डिझेलच्या मापामध्ये फेरफार करून ग्राहकांची फसवणूक केल्याप्रकरणी उचगाव (ता. करवीर) येथे कोल्हापूर-हुपरी मार्गावर असलेला साई एजन्सीज पेट्रोल पंप काल सील करण्यात आला होता. पेट्रोल पंपामध्ये सापडलेली पल्सार चीप तपासणीसाठी पाठविली आहे. त्यामध्ये दोषी आढळल्यास मालक सत्यजित कदम यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे विशेष पथकातील पोलिस निरीक्षक विकास घोडके यांनी सांगितले.

ठाण्याचे पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. घोडके यांच्या नेतृत्वाखालील पथकाने हा पेट्रोल पंप काल रात्री सील केला. पेट्रोल आणि डिझेल सोडणाऱ्या मशीनमध्ये पल्सार कार्डच्या मदतीने मापामध्ये तफावत करून ग्राहकांची फसवणूक केली जात होती. या ठिकाणी पाच लिटर पेट्रोलमागे १४० ते १६० मिलिलिटर पेट्रोल कमी सोडले जात होते. याप्रकरणी पेट्रोल पंप सील केला होता. या पंपावरील चारही मशीनमधील पल्सार कार्ड जप्त करून तपासणीसाठी पाठविली आहेत. या प्रकरणी ते म्हणाले, ‘‘दोषी असणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. अशा प्रकारे फेरफार केलेल्या जिल्ह्यातील पेट्रोल, डिझेल पंपांवर आणखीन दोन दिवस कारवाई होणार आहे.’’

कर्मचाऱ्यांची धावपळ
गगनबावडा येथील पंपावर तपासणी करण्यासाठी अचानक आलेल्या १०-१२ जणांच्या पथकामुळे कर्मचारी वर्गाची धावपळ उडाली होती. दुपारी दोनला आलेल्या पथकाने तपासणीनंतर साडेपाचच्या दरम्यान नोटीस बजावली. जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी कारवाई झाल्याने पंपचालकांत खळबळ उडाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com