कबुतरांची भरारी ‘लाख’मोलाची!

सुधाकर काशीद
सोमवार, 21 मे 2018

कोल्हापूर - एका कबुतराने आकाशात भरारी घेतली आणि ते आकाशात सलग ११ तास २१ मिनिटे फिरत राहिले. दिवस मावळता मावळता ते जमिनीवर उतरले आणि पटणार नाही ते एक लाख एक हजार एकशे अकरा रुपयाचे मानकरी ठरले. दुसऱ्या कबुतरानेही अशीच भरारी घेतली. ते सलग १० तास ४७ मिनीटे आकाशात फिरत राहिले.

कोल्हापूर - एका कबुतराने आकाशात भरारी घेतली आणि ते आकाशात सलग ११ तास २१ मिनिटे फिरत राहिले. दिवस मावळता मावळता ते जमिनीवर उतरले आणि पटणार नाही ते एक लाख एक हजार एकशे अकरा रुपयाचे मानकरी ठरले. दुसऱ्या कबुतरानेही अशीच भरारी घेतली. ते सलग १० तास ४७ मिनीटे आकाशात फिरत राहिले. खाली जमिनीवर उतरले आणि ५० हजार रुपये बक्षिसाचे मानकरी ठरले. असे कोठे घडले असेल, असा प्रश्‍न मनात येईल, पण हे कबूतरप्रेम कोल्हापुरात उघड झाले. बैलगाडीची शर्यत, म्हशींची शर्यत, बकऱ्यांच्या टकरी असले शौक मनापासून जपणाऱ्या कोल्हापुरात कबूतर शौकिनांनीही आपले कबूतरप्रेम असे लाख मोलाच्या बक्षिसातून दाखवून दिले.

पाळीव कबूतर आकाशात जास्तीत जास्त किती काळ भरारी मारत राहते, हे पाहणारी ही कबुतरांची स्पर्धा कोल्हापुरात झाली. साठ कबुतरांची या स्पर्धेसाठी नोंद झाली. एक दिवस नव्हे, दोन दिवस नव्हे महिनाभर ही स्पर्धा चालली आणि आज सगळ्या कबुतरांच्या वेळांची नोंद घेत पहिल्या पाच कबुतरांच्या वाट्याला कौतुकाची भरारी लाभली. 

कोल्हापुरात कबुतराचा शौक बाळगणारे चारशे जण आहेत. त्यांनी आपल्या खुराड्यात कबुतरे पाळली आहेत. ही कबुतरे त्यांच्या कुटुंबाचा एक घटकच झाली आहेत. कबूतर आणि त्याच्या मालकाचे नाते असेकी आकाशात उंच उंच भरारी मारणारे व जमिनीवरून आकाशात ठिपक्‍याएवढे दिसणारे कबूतर आपले आहे की नाही, हे बरोबर ओळखण्याएवढी जवळीक त्यांच्यात झाली आहे. 

अशी घ्यावी लागते खबरदारी
जशी स्पर्धेतील खेळाडूंची उत्तेजक द्रव्य चाचणी असते तशी खबरदारी कबुतरांच्या स्पर्धेत घ्यावी लागते. स्पर्धेच्या आदल्या दिवसांपासून त्या कबुतरांना या स्पर्धेपूर्वी दिल्या जाणाऱ्या कडधान्याला सीलबंद कपाटात ठेवले जाते. पंचासमोर त्यांना खायाला घालून पाणी देऊन उडवले जाते. 

अशाप्रकारे गंगावेस चौक कबूतर शौकिनांनी जास्तीत जास्त काळ भरारी मारणाऱ्या कबुतरासाठी स्पर्धा भरवली. स्पर्धेपूर्वी बदाम, खारीक, गूळ, मणुके, कडधान्ये, शक्‍तीवर्धक औषधांनी स्पर्धेतील कबुतरांची तयारी करून घेण्यात आली आणि रोज सकाळी स्पर्धेतल्या एका कबुतराला उडवायचे व ते परत कधी येते, याची नोंद घेत स्पर्धा पूर्ण झाली. स्पर्धेचे पंच इतके चतूर की कबूतर पूर्णवेळ आकाशातच भरारी मारत आहे की नाही, याच्यावर त्यांची नजर राहिली.

पंचाच्या नजरेतून  सुटत नाही कबूतर 
पाळीव कबुतराचे वैशिष्ट्ये असे की ते उडवल्यानंतर जेथून ते उडवले त्याच परिसरात आकाशात भरारी मारत राहते. ते क्वचितच आपला परिसर सोडून लांब जाते. त्यामुळे जे कबूतर स्पर्धेसाठी उडवले जाते. त्याच्यावर एखाद्या इमारतीच्या टेरेसवर उभे राहून लक्ष ठेवता येते. पंचाची नजर इतकी तीक्ष्ण असते की त्यांच्या नजरेतून उंच आकाशातले कबूतर सुटत नाही.

कबुतरांना सुका मेवाही 
कबुतरांच्या प्रेमापोटी काही कबूतर शौकिनांनी कबुतरांच्या पायात घुंगरू बांधले आहेत. कडधान्याबरोबरच बदाम, काजू, गूळ, मणुके असले खाद्य देऊनही त्यांची तैनात ठेवली जात आहे. 

विजेत्या कबुतरांचे मालक 
१. रिदा पटवेगार
२. अभय शिंदे
३. सॅम मायकेल 
४. कै. आण्णा मोगणे
५. अल्ताफ गणेश सूरज

Web Title: Kolhapur News Pigeon keeping special story