दोन गावठी पिस्तुलांसह काडतुसे जप्त

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 मे 2018

कोल्हापूर - जरगनगरातील प्रतीक पोवारच्या खून प्रकरणातील संशयित प्रतीक सरनाईककडून आणखी दोन गावठी पिस्तुलांसह सहा जिवंत काडतुसे पोलिसांनी जप्त केली. कंदलगाव परिसरातील खड्ड्यात त्याने ती लपवून ठेवली होती. पुण्यात नोकरी करताना त्याने ही शस्त्रे वाराणसीतून खरेदी केल्याचे तपासात पुढे आले आहे.

कोल्हापूर - जरगनगरातील प्रतीक पोवारच्या खून प्रकरणातील संशयित प्रतीक सरनाईककडून आणखी दोन गावठी पिस्तुलांसह सहा जिवंत काडतुसे पोलिसांनी जप्त केली. कंदलगाव परिसरातील खड्ड्यात त्याने ती लपवून ठेवली होती. पुण्यात नोकरी करताना त्याने ही शस्त्रे वाराणसीतून खरेदी केल्याचे तपासात पुढे आले आहे. चार वर्षांपूर्वी झालेल्या मारहाणीचा राग मनात ठेवूनच त्याने हे कृत्य केल्याची माहिती करवीर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दिलीप जाधव यांनी पत्रकारांना दिली. 

प्रतीक ऊर्फ चिंटू पोवारच्या डोक्‍यात गोळ्या झाडून खून केल्याप्रकरणी प्रतीक सरनाईकला पोलिसांनी अटक केली. यापूर्वी त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेले पिस्तूलही जप्त केले. काल त्याला घटनास्थळी फिरवले होते. चौकशीदरम्यान काल करवीर पोलिसांना त्याने आपल्याकडे आणखी दोन गावठी पिस्तुले आणि सहा काडतुसे आहेत, ती पाचगाव ते कंदलगाव रस्त्यावरील ओढ्याच्या पुलाखाली खड्डा खोदून त्यात लपवून ठेवल्याचे पोलिसांना सांगितले. काल रात्री उशिरा पोलिस तेथे घेऊन गेले. त्याने पिस्तूल लपवलेले ठिकाण दाखवले. तेथून पोलिस कर्मचारी प्रशांत माने, प्रथमेश पाटील, सागर कांडगावे, युक्ती ठोंबरे, सुमित पाटील आदींनी एका प्लास्टिक पिशवीत ठेवलेली दोन गावठी पिस्तुले आणि सहा जिवंत काडतुसे जप्त केली. 

पुणे-वाराणसी कनेक्‍शन
पाचगाव येथील एका मंडळात प्रतीक पोवार, रणजित गवळीसह प्रतीक सरनाईक सक्रिय होते. चार वर्षांपूर्वी नवरात्रोत्सवात प्रतीक पोवारसह इतरांनी प्रतीक सरनाईकला मारहाण केली. त्या अपमानाचा बदला त्याला घ्यायचा होता. मारहाणीनंतर तो पुण्याला गेला. तेथे एका रबर कारखान्यात तो चालक म्हणून काम करू लागला. तेथे मित्राच्या मदतीने त्याने वाराणसीतून एक लाख रुपयांना चार पिस्तुले आणि काडतुसे खरेदी केली. ती घेऊन तो कोल्हापूरला आला. 

इचलकरंजीत केला हवेत गोळीबार 
खरेदी केलेले पिस्तूल घेऊन सरनाईक २०१६ ला इचलकरंजीत गेला. तेथे त्याने हवेत गोळीबार करून दहशत माजवण्याचा प्रयत्नही केला. त्यावेळी त्या पिस्तुलाची स्प्रिंग तुटली. त्यामुळे ती त्याने दुरुस्तीस टाकली. ती इचलकरंजी पोलिसांनी जप्त केली. याप्रकरणी त्याच्यावर गुन्हाही दाखल झाल्याचे जाधव यांनी सांगितले.

पाचगाव-कंदलगाव रस्त्यावर अड्डा 
पाचगाव ते कंदलगाव रस्त्यावर जेथे दोन गावठी पिस्तुले पोलिसांनी जप्त केली, तो भाग सरनाईकचा दारू पिण्याचा नेहमीचा अड्डा होता. खून केल्यानंतर तो तेथेच अंधारात लपून बसला होता.

पिस्तूल विक्रीचा संशय
वाराणसीतून चार पिस्तुले आणि काडतुसे सरनाईकने खरेदी केली होती. पंधरा हजार रुपये पगार असताना एक लाख रुपये कोठून आणले, तो छुप्या पद्धतीने पिस्तूल विक्री करत होता का, या दिशेनेही पोलिस तपास करत आहेत.

विद्यापीठात बदलले कपडे
खून केल्यानंतर सरनाईक शहरात वेगवेगळ्या ठिकाणी फिरला. मित्राकडून त्याने कपडे मागवून घेतले. ते कपडे त्याने शिवाजी विद्यापीठात बदलल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे.

Web Title: Kolhapur News Pistol and Cartridges seized