लोकसहभागातून रामलिंग डोंगर झाला प्लास्टीकमुक्त

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 जून 2017

इचलकरंजी - प्राचीन धार्मिक परंपरा असलेल्या आणि विविध जीवसृष्टीने नटलेला रामलिंग डोंगर परिसराने आज प्लास्टिक मुक्त होऊन मोकळा श्‍वास घेतला. सकाळ माध्यम समूह आणि संवाद सामाजिक मंडळ यांच्या वतीने आयोजित केलेल्या प्लास्टिक मुक्त रामलिंग परिसर या मोहिमेला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला. तब्बल सहाशेहून अधिक नागरिकांनी या मोहिमेत सहभागी होऊन रामलिंग परिसराचा चेहरामोहरा बदलून टाकला.

इचलकरंजी - प्राचीन धार्मिक परंपरा असलेल्या आणि विविध जीवसृष्टीने नटलेला रामलिंग डोंगर परिसराने आज प्लास्टिक मुक्त होऊन मोकळा श्‍वास घेतला. सकाळ माध्यम समूह आणि संवाद सामाजिक मंडळ यांच्या वतीने आयोजित केलेल्या प्लास्टिक मुक्त रामलिंग परिसर या मोहिमेला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला. तब्बल सहाशेहून अधिक नागरिकांनी या मोहिमेत सहभागी होऊन रामलिंग परिसराचा चेहरामोहरा बदलून टाकला.

विविध प्रकारची झाडे, पक्षी आणि प्राणी व भगवान श्रीरामचंद्र प्रभू यांच्या पदस्पर्शाने पावन असलेली भूमी अशी आख्यायिका रामलिंग परिसराची आहे. या ठिकाणावर संपूर्ण महाराष्ट्र आणि कर्नाटकाची श्रद्धा आहे. हा रामलिंग परिसर वन खात्याच्या प्रयत्नामुळे आता नवे रूप घेऊ लागले आहे, मात्र मानवनिर्मित प्लास्टिक कचऱ्यामुळे परिसरातील जीवसृष्टी धोक्‍यात येऊ लागली आहे. त्यामुळे सकाळ माध्यम समूह आणि संवाद सामाजिक मंडळाने हा परिसर प्लास्टिक मुक्त करण्याचा निर्धार केला होता. आज सकाळी आलेल्या उच्चांकी कार्यकर्त्यामुळे संपूर्ण परिसर अवघ्या तीन तासांतच प्लास्टिक मुक्त करून नागरिकांनी पर्यावरण प्रेम दाखवून दिले.

स्वयंसेवकांना कोणत्या भागामध्ये कामाची जबाबदारी द्यावयाची याचे नियोजन वीर सेवा दल जिल्हा समितीचे पदाधिकारी विजय बरगाले, शीतल पाटील, जलद पाटील, नितीन चौगुले, उदय पवार आणि सन्मती मतिमंद विद्यालयाच्या जनसंपर्क अधिकारी अर्चना बनगे यांनी केले. आजच्या या मोहिमेत आमदार सुजित मिणचेकर, पोलिस उपअधीक्षक विनायक नरळे, शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सतीश पवार यांचा सहभाग लक्षणीय होता. वन खात्याचे अधिकारी श्री. ढेरे व त्यांच्या सहकाऱ्यांचे सहकार्य मिळाले. सामाजिक कार्यकर्ते अल्पेश गोगड यांनी ध्वनीक्षेपकावरून सूचना दिल्या.

चार ट्रॅक्‍टर ट्रॉलीहून अधिक कचरा
आळते ग्रामपंचायतीने दोन ट्रॅक्‍टर ट्रॉलीद्वारे कचरा उचलण्याची सोय केली होती. तब्बल चार ट्रॅक्‍टर ट्रॉली कचरा निघाला.

सिद्धी फाउंडेशनतर्फे अल्पोपहार
हातकणंगले येथील सिद्धी फाउंडेशनचे राजू गोरे व सुभाष गोरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आलेल्या सर्वांसाठी चहा, नाष्टा व पाण्याची सोय केली होती. सिद्धी फाउंडेशनने रामलिंगच्या बालोद्यान परिसरात अल्पोपहार श्रमदान केल्यानंतर दिला.

‘सकाळ’चा उपक्रम कौतुकास्पद ः डॉ. मिणचेकर
सकाळ नेहमीच विविध सामाजिक कार्यात अग्रेसर असते. रामलिंग परिसर प्लास्टिकमुक्त करण्यासाठी सकाळ माध्यम समूहाने घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे. आजच्या या मोहिमेत मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद नागरिकांच्या मनातील पर्यावरणाची भावना जागृत झाल्याचे दिसते. या पुढील काळात हा परिसर स्वच्छ व सुंदर राहावा, यासाठी सामूहिक प्रयत्न करू या, असे उद्‌गार आमदार सुजित मिणचेकर यांनी काढले.

Web Title: kolhapur news plastic Ramaling Dongar