राजकीय नेत्‍यांनीही धरला मिरवणुकीत ठेका

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 सप्टेंबर 2017

लेझीम, झांजपथकासह ढाल-काठीही घेतली हातात

कोल्हापूर - कोल्हापुरातील गणेश विसर्जन मिरवणूक म्हणजे पारंपरिक वाद्यांचा गजर, महिलांचा उत्स्फूर्त सहभाग, तरुणांचा सळसळता उत्साह, याबरोबरच लेझीम पथक, झांजपथकात थिरकणारे राजकीय नेते हे चित्रही पाहायला मिळते. यावर्षीची विसर्जन मिरवणूकही त्याला अपवाद राहिली नाही. खासदार, आमदार, माजी आमदारांसह त्यांच्या कुटुंबीयातील सदस्य मंडळांसमोरच्या पारंपरिक वाद्यांवर चांगलेच थिरकले. 

या ना त्या कारणाने कोल्हापुरातील मिरवणूक दरवर्षी गाजते. यावर्षी मिरवणुकीत अपवाद सोडला तर डॉल्बी वाजला नाही. डॉल्बीमुक्तीने यावर्षीची मिरवणूक जशी गाजली, तशीच राजकीय नेत्यांच्या मिरवणुकीतील उत्साही सहभागानेही ती लक्षवेधी ठरली. प्रत्येकाचे पक्ष वेगळे; पण मंडळांच्या कार्यकर्त्यांनी हाक मारली की त्या ठिकाणी जाऊन कार्यकर्त्यांनी हातात लेझीम दिला की नेत्यांनाही मग फेर धरल्याशिवाय पर्याय राहिला नाही. 

मानाच्या पहिल्या गणपती मंडळासमोर ढोल वाजवून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पहिल्यांदा नेत्यांच्या मिरवणुकीतील सहभागाला सुरवात केली. दुपारी खासदार धनंजय महाडिक हे एका लेझीम पथकात लेझीम हातात घेऊन, तर झांजपथकात झांज हातात घेऊन चांगलेच थिरकले. त्यांचा डान्स मोबाईलमध्ये टिपण्यासाठी कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. 

सायंकाळी आमदार सतेज पाटील यांनीही एका मंडळाच्या लेझीम पथकात हलगीच्या तालावर फेर धरला. त्यांचे पुतणे ऋतुराज पाटील यांनी कसबा बावडा येथील अष्टविनायक मंडळाच्या ढोल पथकात सहभागी होऊन कंबरेला ढोल बांधून तो वाजवला.  माजी आमदार मालोजीराजे यांनी एका मंडळाच्या ट्रॅक्‍टरचे सारथ्य करून लोकांचे लक्ष्य वेधून घेतले. त्यांच्या पत्नी सौ. मधुरिमाराजे यांनीही एका महिला लेझीम पथकात जाऊन हातात लेझीम घेतली आणि हलगीच्या तालावर त्याही थिरकल्या. त्यांच्याभोवती महिला व तरुणींनी चांगलीच गर्दी केली होती. इतर नेत्यांनीही आपआपल्या सोयीच्यावेळी मिरवणुकीत हजेरी लावून आपल्या कार्यकर्त्यांना खूश करण्याचा प्रयत्न केला. शिरोळमध्ये आमदार उल्हास पाटील यांनी हलगीच्या तालावर लेझीमचा फेर धरला. कागलमध्ये ‘म्हाडा’चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी गळ्यात ढोल बांधून तो वाजवला. 

असा धरला ठेका...
पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी वाजवला ढोल
खासदार संभाजीराजे यांनी खेळली लेझिम
खासदार धनंजय महाडिक यांनी धरला ढोलावर ठेका
आमदार राजेश क्षीरसागर थिरकले वाद्याच्‍या तालावर
मधुरिमाराजे छत्रपती यांनी लेझिम पथकात धरला फेर
ऋतुराज पाटील यांनी वाजवला ढोल

Web Title: kolhapur news political leader involve in ganpati visarjan miravnuk