छत्रपती ग्रुपचा प्रमोद पाटील अटकेत

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 जून 2018

जयसिंगपूर - उदगाव (ता. शिरोळ) येथील भूमाता ब्रिगेडच्या जिल्हा उपाध्यक्षा व छत्रपती ग्रुपच्या माजी सदस्या माधुरी शिंदे यांच्या खूनप्रकरणी छत्रपती ग्रुपचा संस्थापक अध्यक्ष प्रमोद पाटील (रा. राजापूरवाडी, ता. शिरोळ) याच्यासह कार्यकर्ता संतोष माने (घालवाडे) यांना जयसिंगपूर पोलिसांनी अटक केली. 

जयसिंगपूर - उदगाव (ता. शिरोळ) येथील भूमाता ब्रिगेडच्या जिल्हा उपाध्यक्षा व छत्रपती ग्रुपच्या माजी सदस्या माधुरी शिंदे यांच्या खूनप्रकरणी छत्रपती ग्रुपचा संस्थापक अध्यक्ष प्रमोद पाटील (रा. राजापूरवाडी, ता. शिरोळ) याच्यासह कार्यकर्ता संतोष माने (घालवाडे) यांना जयसिंगपूर पोलिसांनी अटक केली. 

मृत माधुरी शिंदेचा पती सूर्यकांत शिंदे याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी कारवाई केली. माधुरी शिंदे हिचा शनिवारी दुपारी पती सूर्यकांत याने कुऱ्हाडीने घाव घालून खून केला. या वेळी त्याच्यासह तिचा प्रियकर संतोष माने याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. दरम्यान, फिर्यादी सूर्यकांत शिंदेच्या फिर्यादीनुसार माधुरी व संतोष यांच्यातील अनैतिक संबंध पाहिले. 

या वेळी दरवाजा वाजवून त्यांना बाहेर येण्याचा इशारा केला असता माधुरीने शिवीगाळ केली. तर संतोष घराबाहेर येऊन आज तुला जीवंत ठेवणार नाही म्हणून मारहाण करू लागला. तू नेहमीच माझ्या, प्रमोद दादांच्या व माधुरीच्या संबंधामध्ये येतोस, कालच प्रमोद दादाने तुला कायमचे संपवण्यासाठी सांगितले आहे असे म्हणून संतोषने घरातील कुऱ्हाड घेऊन सूर्यकांतच्या अंगावर धावला. मानेवर वार करत असताना त्याला ढकलून देत वार चुकवला. तो वार त्याच्या डाव्या हातावर लागल्याने सूर्यकांत जखमी झाला. तशाच अवस्थेत तो पळून जाऊन जीव वाचवण्यासाठी खोलीत लपून बसला. त्यावेळीही संतोषने तुला जीवंत ठेवणार नाही अशी धमकी दिली. प्रमोद पाटील व संतोष माने याने संगनमताने त्रास दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. 

उपविभागीय पोलिस अधिकारी कृष्णात पिंगळे म्हणाले, ‘‘माधुरी शिंदे हत्येप्रकरणी सूर्यकांत यांच्या फिर्यादीनुसार प्रमोद पाटील व संतोष माने यांना अटक करण्यात आली आहे. उद्या त्यांना न्यायालयात उभे केले जाणार आहे.’’ 

विधानसभेची तयारी
संशयित आरोपी प्रमोद पाटील यांनी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीसाठी शिरोळ मतदारसंघातून उमेदवारी दाखल केली होती. पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचीही तो तयारी करत होता.

चारित्र्यावरून पत्नीची हत्या

जयसिंगपूर - उदगाव (ता. शिरोळ) येथे चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची कुऱ्हाडीने निर्घृण हत्या केल्याची घटना आज दुपारी घडली. सौ. माधुरी सूर्यकांत शिंदे (वय ३८) असे मृत महिलेचे नाव आहे. हत्येनंतर पती सूर्यकांत महादेव शिंदे (वय ४३) जयसिंगपूर पोलिसात हजर झाला. प्रत्यक्षदर्शी संतोष कृष्णा माने-घालवाडे यालाही ताब्यात घेतले आहे. मृत माधुरी या भूमाता ब्रिगेडच्या जिल्हा उपाध्यक्षा होत्या.

उदगाव-चिंचवाड मार्गावर कृष्णामाई सेवा सोसायटीलगत शिंदे रहातात. मृत माधुरी व सूर्यकांत यांचा सतरा वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला आहे. त्यांना मुलगा व मुलगी अशी अपत्ये आहेत. दहा वर्षांपासून त्यांच्यात वाद आहे. याआधीही हा वाद पोलिस ठाण्यापर्यंत आला होता. वर्षभरापूर्वी सूर्यकांतने माधुरीच्या डोकीत लोखंडी पार घालून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी सूर्यकांतवर गुन्हा दाखल झाला होता.

पोलिसांनी सांगितलेल्या माहितीनुसार आज दुपारी माधुरीकडे संतोष माने आला होता. त्यामुळे चारित्र्याच्या संशयावरून सूर्यकांत व संतोष यांच्यात वाद झाला. रागाच्या भरात सूर्यकांतने पत्नी माधुरीवर कुऱ्हाडीने हल्ला चढवला. पाठीवर, हातावर, गळा व डोकीवर सपासप आठ वार केल्याने रक्ताच्या थरोळ्यात ती गतप्राण झाली. घटनेनंतर सूर्यकांतने मुलगा शिवराज याला घेऊन पोलिस ठाणे गाठले. या वेळी खूनाची कबुली दिल्यानंतर पोलिसही चक्रावले.

वर्षभरापासून आपण माधुरीला संतोषबरोबर बोलू नकोस असे सांगूनही ती ऐकत नव्हती. त्यांच्या घटस्फोटासाठी सुनावणी सुरू आहे. अद्याप घटस्फोट झाला नसल्याने संतोष येत असल्याने मला चीड आली. त्यामुळेच आपण तिची हत्या केल्याची कबुली त्याने दिली. पोलिस निरीक्षक शहाजी निकम, शिरोळचे सहायक निरीक्षक समीर गायकवाड यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी पंचनामा केला. मृतदेहालगत हत्येसाठी वापरलेली कुऱ्हाड आढळली. ठसेतज्ज्ञांनाही या ठिकाणी पाचारण केले. याबाबतची फिर्याद मुलगी रेवती सूर्यकांत शिंदे हिने दिली आहे. हत्येचा प्रकार उघडकीस आल्यानंतर ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली.

वाद नित्याचा
माधुरी चार वर्षांपासून सूर्यकांतपासून विभक्त रहात होती. शिलाई काम, फॅशन डिझायनिंग व किराणा मालाचे दुकान चालवून ती उदरनिर्वाह करत होती. घर व घटस्फोटासाठी न्यायालयात वाद सुरू होता. अखेर चारित्र्याच्या संशयावरुन सूर्यकांतने पत्नीची हत्या करू वादाला मूठमाती दिली.

साक्षीदारांची पाठ
 पंचनाम्यासाठी दोन ग्रामस्थ व शासकीय अधिकाऱ्याची उपस्थिती लागते. घटना पाहण्यासाठी शेकडो ग्रामस्थांनी गर्दी केली होती. मात्र, पंचनाम्यासाठी एकही पुढे आला नाही. उदगावच्या पोलिसपाटलाने राजीनामा दिल्याने स्थानिक अधिकारीही आपण बाहेर सांगत हात झटकले. अखेर चिंचवाडचा तलाठी पंचनाम्याचा साक्षीदार झाला.

Web Title: Kolhapur News Pramoad Patil arrested