खासगी ड्रेनेजलाईनसाठी राबली महापालिकेची यंत्रणा

युवराज पाटील
गुरुवार, 5 जुलै 2018

कोल्हापूर - खासगी ड्रेनेजलाईनच्या कामासाठी महापालिकेची यंत्रणा वापरण्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. आरोग्य निरीक्षकाने परस्पर केलेल्या प्रकाराची गंभीर दखल प्रशासनाने घेतली आहे. याकामी जेसीबी मशीन चालकाला नोटीस बजावली गेली आहे. त्याने खुलाशात संबंधित आरोग्य निरीक्षकाच्या सांगण्यावरून मशीन दिल्याचे म्हटले आहे.

कोल्हापूर - खासगी ड्रेनेजलाईनच्या कामासाठी महापालिकेची यंत्रणा वापरण्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. आरोग्य निरीक्षकाने परस्पर केलेल्या प्रकाराची गंभीर दखल प्रशासनाने घेतली आहे. याकामी जेसीबी मशीन चालकाला नोटीस बजावली गेली आहे. त्याने खुलाशात संबंधित आरोग्य निरीक्षकाच्या सांगण्यावरून मशीन दिल्याचे म्हटले आहे.

हॉकी स्टेडियम परिसरात ड्रेनेजलाईन जोडली जाणार होती. यासाठी रात्री नऊनंतर जेसीबी, तसेच डंपरची यंत्रणा वापरली गेली. खोदाईत पाईपलाईनचे नुकसान झाल्यानंतर स्थानिक नागरिकांनी रात्री थेट आयुक्तांकडे तक्रार केली. संबंधित हॉटेल मालकाला महापालिकेच्या यंत्रणेने विचारणा केल्यानंतर आरोग्य निरीक्षकाने काम दिल्याचे सांगितले गेले. 

अलीकडेच झालेल्या या प्रकाराची तातडीने दखल घेतली गेली. जेसीबी चालकाला नोटीस बजावली गेली. त्याने संबंधित आरोग्य निरीक्षकांनी ऑनलाईन तक्रार आली आहे, असे सांगितले. त्या आधारे जेसीबी दिल्याचा खुलासा केला आहे. कागदपत्रांच्या आधारे प्रकार रेकॉर्डवर आणण्याचा प्रयत्न प्रशासन करत आहे. आयुक्त यासंबंधी कोणता निर्णय घेतात, याकडे लक्ष लागून राहिले आहे.

आरोग्य विभागाकडे अपुरे मनुष्यबळ असल्याची तक्रार होते. ८१ प्रभागांत पुरेसे कर्मचारी नसल्याने स्वच्छता होत नसल्याची सदस्यांची तक्रार असते. आरोग्य विभागात आरोग्य निरीक्षक महत्त्वाचा घटक समजला जातो. प्रत्येक प्रभागाची नाळ या निरीक्षकाला ठाऊक असते. मुकादम आणि आरोग्य निरीक्षक (सॅनिटरी इन्स्पेक्‍टर) जबाबदारीची पदे आहेत. पाच आरोग्य निरीक्षकांची अलीकडेच नियुक्ती झाली आहे. ७८ जणांनी ठोक मानधनावरील पदासाठी अर्ज केला होती. पैकी पाचजणांची निवड झाली आहे; मात्र जे अनुभवी आरोग्य निरीक्षक आहेत, ते परस्पर कोणता उद्योग करू शकतात, याची प्रचीती या निमित्ताने आली आहे. 

नागरिकांच्या जागरुकतेमुळे प्रकार उघड
ड्रेनेजलाइनच्या परवानगीचा विषय हा ड्रेनेज आणि पाणीपुरवठ्याशी संबंधित आहे. अस्तित्वात असलेल्या ड्रेनेजलाइनला घरातील ड्रेनेज जोडायचे म्हटले तरी परवानगी मिळेपर्यंत संबंधिताला घाम फुटतो. खासगी ड्रेनेजलाइनचे दर फुटाला निश्‍चित आहेत. कागदोपत्री कोणतीही प्रक्रिया न करता आरोग्य निरीक्षकाला परस्पर खोदाईचे आमंत्रण दिले गेले. त्यांनी ते स्वीकारले आणि वर्कशॉपची यंत्रणा या कामी वापरली. आश्‍चर्याची बाब अशी, की रात्रीच ही ड्रेनेजलाइन जोडली जाणार होती; मात्र काही नागरिकांच्या जागरुकतेमुळे हा डाव फसला गेला.

Web Title: Kolhapur News Private drainage line done by corporation workers