अर्भक विकत घेणाऱ्या दोन दांपत्यांना घेतले ताब्यात

राजेंद्र होळकर
शनिवार, 10 फेब्रुवारी 2018

हॉस्पिटलमधून विक्री केलेल्या अर्भकप्रकरणी पोलिसांनी नेरुळ वेस्ट (मुंबई)मधील एक डॉक्‍टर व त्याच्या पत्नीला, तर नवरगाव (ता. शिंदेवाडी, जि. चंद्रपूर) येथील एक अभियंता व त्याच्या पत्नीला अर्भकासह ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.​

इचलकरंजी - येथील जवाहरनगरातील होमिओपॅथी डॉक्‍टर अरुण भूपाल पाटील (वय ५७) याला कुमारी मातांच्या आणि विधवा महिलांच्या अर्भकांची तस्करी केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली. त्याने हॉस्पिटलमधून विक्री केलेल्या अर्भकप्रकरणी पोलिसांनी नेरुळ वेस्ट (मुंबई)मधील एक डॉक्‍टर व त्याच्या पत्नीला, तर नवरगाव (ता. शिंदेवाडी, जि. चंद्रपूर) येथील एक अभियंता व त्याच्या पत्नीला अर्भकासह ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.

चौकशीत नवरगाव येथील अनिल दशरथ चहांदे (वय ४२), त्यांच्या पत्नी प्रेरणा चहांदे (३९) या दाम्पत्याने बेकायदेशीरपणे अर्भकाला विकत घेतल्याचे पोलिस तपासात उघड झाले. त्यामुळे चहांदे दाम्पत्याला पोलिसांनी रात्री उशिरा अटक केली. 
नेरूळ पश्‍चिम (मुंबई) येथील अमोल अशोक सवाई (३९), त्यांच्या पत्नी आरती सवाई (३६) या दाम्पत्याने अर्भक घेताना याबाबत रजिस्टर कागदपत्रे तयार केल्याचे निष्पन्न झाले. तरीही पोलिसांनी या रजिस्टर कागदपत्रांची रात्री उशिरापर्यंत छाननी केली. अमोल सवाई डॉक्‍टर आहेत. त्यांनी अर्भक घेताना मुंबई येथील एका वकिलाने कागदपत्रे तयार केली आहेत. संबंधित वकिलाला चौकशीसाठी बोलावून घेतले आहे.

पोलिसांनी सवाई व चहांदे दाम्पत्यांकडून ताब्यात घेतलेली दोन्ही अर्भके कोल्हापूर येथील बाल विकास समितीकडे पाठवून दिली आहेत. या अर्भकांचा आणि ती घेणाऱ्या दाम्पत्यांना पकडण्याची कारवाई कोल्हापूर स्थानिक गुन्हे प्रकटीकरण 
शाखेच्या पथकाने आणि इचलकरंजी येथील शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या पथकाने केली.

नवी दिल्ली येथील केंद्रीय दत्तक प्राधिकरण विभागाच्या (कारा) पथकाला आरोपी डॉ. पाटीलच्या हॉस्पिटलमध्ये अल्पवयीन कुमारी मातांच्या आणि विधवा महिलांच्या अर्भकांची विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून ‘कारा’च्या पथकाने येथील स्थानिक जिल्हा महिला व बालविकास समितीच्या अध्यक्षा, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, स्त्रीरोग डॉक्‍टर, पोलिस अधिकाऱ्यांच्या मदतीने डॉ. पाटीलच्या हॉस्पिटलवर छापा टाकला. या वेळी हॉस्पिटलमध्ये एक अल्पवयीन कुमारी माता मिळून आली. तिच्याकडे चौकशी केली असता तिचे चार दिवसांचे अर्भक चंद्रपूर जिल्ह्यात विकल्याचे उघड झाले.

त्याचबरोबर एका विधवा महिलेचे अर्भक नेरूळ पश्‍चिम (मुंबई) येथे विकल्याचे समोर आले. यावरून डॉ. पाटील याला अटक करण्यात आली. त्याचबरोबर डॉ. पाटीलने नवरगाव (जि. चंद्रपूर) येथे विकलेले अर्भक इचलकरंजी व्हाया मुंबई येथे गेल्याचे सांगितले. तसेच, यात येथील एका महिला स्त्रीरोगतज्ज्ञाने मध्यस्थी केल्याचे समोर आले. दुसरे अर्भक मुंबईत विकल्याची बाब पोलिस तपासात समोर आल्याने जिल्हा पोलिस अधीक्षक संजय मोहिते, अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. दिनेश बारी, पोलिस उपअधीक्षक विनायक नरळे या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी पोलिसांची दोन वेगवेगळी पथके तयार केली. ही पथके कोल्हापूर स्थानिक गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस निरीक्षक दिनकर मोहिते आणि शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सतीश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई आणि नागपूर या ठिकाणी पाठवून दिली होती.

या पथकात नेरूळ वेस्ट (मुंबई)मधील अर्भक घेणाऱ्या डॉक्‍टर सवाई यांचा पत्ता मिळाल्याने या दाम्पत्याला ताब्यात घेण्यात आले. पण, नवरगाव येथील इंजिनिअर चहांदे यांचा फक्त मोबाईल क्रमांक माहीत असल्याने पोलिसांनी त्याचा मोबाईल लोकेशनवरून शोध सुरू केला. याच दरम्यान त्याला पोलिस आपल्याला पकडण्यासाठी आल्याची माहिती समजताच तो आणि त्याची पत्नी अर्भकाला घेऊन भंडाऱ्याला गेले. पोलिसांनी अटकेत असलेल्या आरोपी डॉ. पाटीलला त्याच्या मोबाईलवर संपर्क साधून ‘पोलिसांनी मला अटक केली नाही. त्यामुळे तू चर्चा करण्यासाठी सोलापूर येथे ये’ असे बोलण्यास सांगितले. त्या पद्धतीने डॉ. पाटील बोलल्याने चहांदे दाम्पत्याने आपण सोलापूर येत असल्याचे सांगितले. हे दाम्पत्य सोलापुरात येताच पोलिसांनी त्यांना अर्भकासह ताब्यात घेतले.

नवजात अर्भके विकत घेणाऱ्या या दोन्ही दाम्पत्यांना पोलिसांनी आज दुपारी इचलकरंजीत आणले. त्यांच्याकडे कसून चौकशी सुरू केली. तसेच, यांची माहिती जिल्हा महिला व बालविकास समितीच्या अध्यक्षा प्रियदर्शनी चोरगे यांना दिली. त्या त्वरित शिवाजीनगर पोलिस ठाण्यात आल्या. त्यांनीही या दोन दाम्पत्यांकडे चौकशी केली. चौकशीअंती आरोपी डॉ. पाटील यांच्या हॉस्पिटलमधून विक्री केलेल्या दोन्ही अर्भकांना ती घेणाऱ्या सवाई आणि चहांदे दाम्पत्यांना बाल विकास समितीच्या ताब्यात दिले. चौकशीत चहांदे दाम्पत्याने अर्भक दोन लाखांना विकत घेतल्याचे उघड झाले.

पोलिस कोठडीत असलेला डॉ. पाटील यांच्याकडे पोलिसांनी पीडित अल्पवयीन मुलींशिवाय आणखी कोणा मुलीचे व विधवा महिलाच्या अर्भकांची विक्री केली आहे का? ही विक्री कोणामार्फत केली आहे. नवजात अर्भकांची विक्री करून मिळविलेल्या लाखो रुपयांचे काय केले? याबरोबर मानवी तस्करी रॅकेटमध्ये आणखीन कोणा-कोणाचा सहभाग आहे, याचा तपास सुरू केला आहे.

एक नऊ महिन्यांचे, दुसरे दोन महिन्यांचे अर्भक
नेरूळ पश्‍चिम (मुंबई) येथील डॉ. अमोल अशोक सवाई व त्यांच्या पत्नी आरती या दाम्पत्याने डॉ. पाटीलकडून एका विधवा महिलेचे चार दिवसांचे अर्भक २०१७ मध्ये घेतले आहे. ते नऊ महिन्यांचे आहे; तर नवरगाव (ता. शिंदेवाडी, जि. चंद्रपूर) येथील अनिल दशरथ चहांदे, त्यांच्या पत्नी प्रेरणा या दाम्पत्याने ३ डिसेंबर २०१७ ला एका अल्पवयीन कुमारी मातेच्या अर्भकाला बेकायदेशीरपणे विशेषत: दोन लाखांना विकत घेतल्याचे पोलिस तपासात उघड झाले.

कारवाईची मागणी
डॉ. अरुण पाटीलच्या या कृत्याबद्दल तो व त्याच्या साथीदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी रयत क्रांती संघटनेच्या शहर शाखेतर्फे प्रांताधिकारी समीर शिंगटे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनावर शहराध्यक्ष विनायक कलढोणे, संदीप भातमारे, सचिन आठवले, सचिन पाटील, सतीश शिंदे, विजय कुरणे आदींच्या सह्या आहेत.

Web Title: Kolhapur News Raid On Dr Arun Patil Hospital followup