दुर्गराज रायगड शिवमय...

संदीप खांडेकर
बुधवार, 6 जून 2018

रायगड - ढोल ताशाचा ठेका, फडफडणारे भगवे ध्वज, शिवभक्तांचा सळसळता उत्साह व शिवछत्रपतींचा अखंड जयघोष अशा वातावरणाने दुर्गराज रायगड आज दुमदुमला. निमित्त होते अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे आयोजित शिवराज्याभिषेक सोहळ्याचे.

रायगड - ढोल ताशाचा ठेका, फडफडणारे भगवे ध्वज, शिवभक्तांचा सळसळता उत्साह व शिवछत्रपतींचा अखंड जयघोष अशा वातावरणाने दुर्गराज रायगड आज दुमदुमला. निमित्त होते अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे आयोजित शिवराज्याभिषेक सोहळ्याचे.

दरम्यान, समितीचे मार्गदर्शक, खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते शिवछत्रपतींच्या मूर्तीस सुवर्ण नाण्यांचा अभिषेक घालण्यात आला. यावेळी राजदरबार जय भवानी जय शिवराय घोषणेने दणाणून गेला.

छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय जिजाऊ जय शिवराय या घोषणा देत देशभरातून शिवभक्त काल रायगडावर दाखल झाले होते. आज पहाटेपर्यंत शिवभक्त गडावर येत होते. गडावर जेथे जागा मिळेल तिथे त्यांनी मुक्काम ठोकला. सकाळी 
ढोल ताशाचा सुरू होताच गड दुमदुमण्यास सुरवात झाली.

टकमक टोक, बाजारपेठ, होळीचा माळ, राजदरबार, हत्ती तलाव, गंगासागर तलाव शिवभक्तांच्या गर्दीने अक्षरशः फुलला. भगवे ‌फेटे, ऐतिहासिक वेशभूषेतील मावळे, नऊवारी साडीतील महिलांच्या उत्साहास भरते आले. गडाचा कोपरा न कोपरा इतिहासाच्या पाऊलखुणा शोधण्यात दंग झाला. 

नऊ वाजता जिल्हा परिषदेच्या शेडमधून शिवछत्रपतींची पालखी ढोल ताशाच्या ठेक्यात शिरकाई देवीच्या मंदिराकडे मार्गस्थ होताच शिवरायांचा जयघोष सुरू झाला. होळीच्या माळावर पालखीची छायाचित्रे, व्हीडिओ घेण्यास चढाओढ सुरू झाली. राजदरबारात पालखीचे जल्लोषी स्वागत झाले.

याचवेळी युवराज संभाजीराजे, शहाजीराजे यांचे दरबारात आगमन झाले. पोलिस बॅडने त्यांचे स्वागत केले. शाहीर राजेंद्र कांबळे यांनी 'रयतेचा हा राजा झाला संभाजीराजा' हे स्वागतगीत गायिले.

संभाजीराजे यांच्या हस्ते शिवछत्रपतींच्या मूर्तीस सुवर्ण नाण्यांचा अभिषेक करण्यात आला. संभाजीराजे व यौवराज शहाजीराजे यांनी मूर्तीचे पूजन केले. यावेळी शाहीर आझाद नायकवडी, शाहीर सुरेश जाधव, राजेंद्र कांबळे यांनी शिवराज्याभिषेक गीत सादर झाले.

त्यानंतर पालखी होळीचा माळ, बाजारपेठेतून जगदीश्वर मंदिराकडे रवाना झाली. शिवछत्रपतींच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर पालखी मिरवणुकीची सांगता झाली. 

शिवरायांचा जयघोष...

नगारखान्यासमोर शिवभक्तांच्या उत्साहास उधाण आले होते. ढोल ताशाच्या ठेक्यावर ते शिवरायांचा जयघोष करत नाचत होते.

गोसावींनी जागवला इतिहास..

यशवंत गोसावी यांनी इतिहासातील घटना ओघवत्या भाषेत सांगून शिवभक्तांना खिळवून ठेवले. त्यांच्या अफलातून वक्तृत्व कौशल्याला शिवभक्तांनी टाळ्यांची दाद दिली.

Web Title: Kolhapur News Raigad ShivRajyabhishekh Sohala