लोकराजांच्या जयंतीसाठी करवीर नगरी सज्ज 

लोकराजांच्या जयंतीसाठी करवीर नगरी सज्ज 

कोल्हापूर - लोककल्याणकारी राजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीसाठी कोल्हापूरवासीय सज्ज झाले आहेत. दसरा चौकातील राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्यास विद्युत रोषणाई केली असून, उद्या (ता. 26) मिरवणुका, व्याख्याने, प्रतिमा पूजनासह पोवाड्यांच्या ललकारीत शाहू जयंती साजरी होत आहे. 

जिल्हा प्रशासनातर्फे कसबा बावडामधील लक्ष्मी विलास पॅलेस येथे राजर्षी छत्रपती शाहू राजांना सकाळी आठ वाजता अभिवादन करण्यात येणार आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील व श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम होणार आहे. दसरा चौकातील शाहूंच्या पुतळ्याचे पूजन झाल्यानंतर शाहू शिक्षण संस्था, मुख्याध्यापक संघ व संस्था-संघटनांतर्फे मिरवणूक काढण्यात येणार आहे. शहरातील शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थी-विद्यार्थिनी शाहूंच्या कार्याविषयीचे फलक हातात घेऊन मिरवणुकीत सहभागी होतील. त्याचबरोबर सजीव देखावे, झांजपथकाचा त्यात समावेश असणार आहे. 

राजर्षी शाहू मेमोरियल ट्रस्टतर्फे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांना "राजर्षी शाहू पुरस्कार' देण्यात येणार आहे. राजर्षी छत्रपती शाहू स्मारक भवनमध्ये सायंकाळी सहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे. श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होईल. पालकमंत्री चंद्रकांत पाटील अध्यक्षस्थानी असतील. एक लाख रुपये, सन्मानचिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. 

राजर्षी शाहू छत्रपती महाराज जयंती उत्सव समितीतर्फे कसबा बावडा येथील राजर्षी शाहू जन्मस्थळ येथे सकाळी साडेदहा वाजता प्रबोधन सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. जे. बी. शिंदे यांचे "राजर्षी शाहूंचे विचार आणि आजचा युवक' या विषयावर व्याख्यान होणार आहे. कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे महासचिव नामदेव कांबळे प्रमुख म्हणून उपस्थित असतील. यावेळी राजर्षी शाहू गौरव पुरस्काराने निसर्गवेध परिवार व परिवर्तनवादी सामाजिक चळवळीतील योगदानाबद्दल रूपेश पाटील यांना गौरविले जाणार आहे. गुणवंत विद्यार्थ्यांना ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले पुरस्कार दिला जाईल. 

मंगळवार पेठेतील मिरजकर तिकटी येथून राजर्षी शाहू महाराज प्रतिष्ठानतर्फे दुपारी चार वाजता मिरवणुकीस सुरवात होणार आहे. शाहू छत्रपती महाराज, महापौर हसीना फरास, पैलवान बाबा महाडिक यांच्या उपस्थितीत मिरवणुकीस प्रारंभ होईल. मिरवणुकीत पारंपरिक लवाजम्यासह करवीर नाद ढोल पथक, जय हनुमान लेझीम व मर्दानी पथक, बारा बैलगाड्या, दहा घोडे, सणगर-बोडके तालीम व मर्दानी खेळ विशारद आनंदराव पोवार आखाडा, तसेच राजर्षी शाहू जीवन विकास चॅरिटेबल ट्रस्टची बग्गी असेल. सजीव देखाव्यासह शहरातील 78 तालमींचे पदाधिकारी, कार्यकर्ते मिरवणुकीत असतील. मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटी, महापालिका चौक, सीपीआर चौक, दसरा चौक, बिंदू चौक, शिवाजी चौक असा मिरवणुकीचा मार्ग असेल. शिवाजी पेठेतील परिवर्तन फाऊंडेशनतर्फे शाहू परिवर्तन पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. 

शाहूंच्या पुतळ्याचे पूजन होणार 
शाहू वैदिक स्कूलतर्फे तुळजा भवानी मंदिरात सकाळी नऊ वाजता शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते शाहूंच्या पुतळ्याचे पूजन होणार आहे. यावेळी छत्रपती शाहू विद्यालयातील विद्यार्थी विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम सादर करणार आहेत. दुपारी एक वाजता मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके सादर होणार असून, मर्दानी आखाड्यांनी त्यात सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे. 

ऍड. सुरेश माने यांचे व्याख्यान 
बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. सुरेश माने यांचे आयर्विन मल्टिपर्पज हॉलमध्ये दुपारी बारा वाजता मार्गदर्शन होणार आहे. या वेळी निर्मिती विचारमंचचे संदीप फणसे यांना राजर्षी शाहू जीवन गौरव, तर आनंद पाटील, सुनील पोवार, सुशीलकुमार कोल्हटकर, सुनील कारंजकर, शरद गाडे, तानाजी सावर्डेकर, रघुनाथ मांडरे, मच्छिंद्र कांबळे, सर्जेराव वडणगेकर, शाहू म्हेत्रे यांना राजर्षी शाहू समाजरत्न पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. छत्रपती शाहू राजे फाऊंडेशनतर्फे दुपारी बारा वाजून दहा मिनिटांनी पांजरपोळ संस्थेत दहा फुटी शाहू राजांच्या स्मारकाचे अनावरण होणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com