गुजरातच्या धर्तीवर ४५० कोटी द्या - खासदार शेट्टी

गणेश शिंदे
शुक्रवार, 29 जून 2018

जयसिंगपूर - गुजरात सरकारने ‘अमूल’ला ३०० कोटींचे अनुदान देऊन दुग्ध व्यवसाय करणाऱ्यांना सावरण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे गायीच्या दुधाला प्रतिलिटर पाच रुपये, तर दूध पावडरला किलोमागे ५० रुपये जादा मिळून उत्पादकांचे हित साधले जाईल. याच धर्तीवर राज्य सरकारने ४५० कोटींचे पॅकेज द्यावे, पॅकेज मिळाल्यास थेट उत्पादकांना याचा लाभ होणार असल्याची माहिती खासदार राजू शेट्टी यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.

खासदार शेट्टी म्हणाले, ‘‘थकीत एफआरपी आणि गायीच्या दूध दरप्रश्‍नी सरकारने तोडगा काढावा, या मागणीसाठी पुण्यात साखर आणि दूध आयुक्तालयावर मोर्चा काढला जाणार आहे. गायीच्या दुधाचे वाढते उत्पादन, मागणी, दिला जाणारा दर आणि दूध पावडर निर्मिती प्रक्रियेत येणारा खर्च यात ताळमेळ बसत नसल्याने आज दूध संस्था समस्यांच्या चक्रव्युहात आहेत. गुजरात सरकारने ३०० कोटींचे अनुदान देऊन दूध उत्पादक आणि संस्थांना दिलासा दिला आहे.’’

राज्य सरकारनेही ४५० कोटीचे पॅकेज दिल्यास उत्पादक आणि संस्थांना दिलासा मिळेल. गायीच्या प्रतिलिटर दुधाला पाच रुपयांचे अनुदान मागणार आहे. ही मागणी रास्त आहे. दोन-तीन महिन्यांत दुधाचे भाव तीन ते सहा रुपयांनी घसरले आहेत. पॅकेजशिवाय उत्पादकांना न्याय मिळणे शक्‍य नाही. ४५० कोटींची तरतूद करणे सरकारला कठीणही नाही. यामुळे थेट दूध उत्पादकांच्या घरी पैसे जातील. विशेषत: ऊस आणि दूध पट्ट्यातील उत्पादकांच्या मागणीसाठी हे आंदोलन असून, यात कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, नगर, सोलापूर आदी जिल्ह्यातील उत्पादक आणि ‘स्वाभिमानी’चे हजारो कार्यकर्ते सहभागी होणार असल्याचेही शेट्टी यांनी सांगितले.

प्रतिक्विंटल २९०० ते ३००० रुपयांपर्यंत साखरेचे दर स्थिरावले आहेत. त्यामुळे उसाची एफआरपी देणे शक्‍य आहे. पेरणीपूर्वी शेतकऱ्यांच्या हातात पैसे पडले पाहिजेत. आतापर्यंत तोंडी सांगून झाले आहे. एफआरपीसाठी आता आरपारचा संघर्ष करावा लागेल. रजेवरील साखर आयुक्तांना मोर्चासमोर येण्याचे कळविले आहे. त्यांना मोर्चासमोर यावेच लागेल.
- राजू शेट्टी,
खासदार
 
Web Title: Kolhapur News Raju Shetty comment