सरकारकडून एफआरपीमध्येही फसवणूक - राजू शेट्टी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 जुलै 2018

कोल्हापूर - सरकारने दूध आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला; पण दूध उत्पादकांच्या आंदोलकांनी दूध दराच्या प्रश्‍नात सरकारला गुडघे टेकावयास लावले. यावर्षी जाहीर झालेल्या एफआरपीमध्येही सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. त्यामुळे यावर्षी सरकार म्हणत असेल की शेतकऱ्यांना २०० रुपयांची वाढ केली, हे चुकीचे आहे. त्यामुळे यावर्षीही ऊस दराचे आंदोलन तीव्र करणार असल्याची घोषणा खासदार राजू शेट्टी यांनी केली. ​

कोल्हापूर - सरकारने दूध आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला; पण दूध उत्पादकांच्या आंदोलकांनी दूध दराच्या प्रश्‍नात सरकारला गुडघे टेकावयास लावले. यावर्षी जाहीर झालेल्या एफआरपीमध्येही सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. त्यामुळे यावर्षी सरकार म्हणत असेल की शेतकऱ्यांना २०० रुपयांची वाढ केली, हे चुकीचे आहे. त्यामुळे यावर्षीही ऊस दराचे आंदोलन तीव्र करणार असल्याची घोषणा खासदार राजू शेट्टी यांनी केली. 

‘सकाळ’च्या मुख्य कार्यालयात ‘कॉफी वुथ एडिटर’मध्ये ‘दूध दर आणि यावर्षीच्या ऊस दराबाबत ते बोलत होते. ‘सकाळ माध्यम समूहा’चे संपादक संचालक श्रीराम पवार, निवासी संपादक श्रीरंग गायकवाड, प्रा. जालंदर पाटील, भगवान काटे उपस्थित होते.

शेट्टी म्हणाले, ‘‘सरकारने दूध दराबाबत शेतकऱ्यांची फसवणूक केली होती. गायीच्या प्रतिलिटर दुधासाठी २७ रुपये दर ठरवून दिला होता. मात्र, हाच दर १७ ते १८ रुपयांपर्यंत खाली आला होता. शासनाकडे वारंवार मागणी करूनही दूध दरात वाढ दिली जात नव्हती. त्यामुळे दूध दरवाढीसाठी चक्का जाम आंदोलनाची मोहीम राबविण्यात आली. सरकारला आंदोलन दडपायचे होते. त्यादृष्टीने प्रयत्नही झाले. तरीही अन्यायाने पेटलेल्या दूध उत्पादकांनी सरकारला धडा शिकवला. पाच दिवस आंदोलन सुरू ठेवण्याची ग्वाही दिली होती. पाच दिवसांत यावर तोडगा निघेल, असा अंदाज होता. पाच दिवसांनंतर सरकारने निर्णय घेतला नसता तर मात्र आंदोलनाला स्थगिती दिली जाणार होती. शेतकऱ्यांचा उद्रेक पाहून शासनाने निर्णय घेतला नसता तर आंदोलन वेगळ्या वळणावर गेले असते. असे झाले नाही.’’

ते म्हणाले, ‘‘शासनाने निर्णय घेऊन हा प्रश्‍न सोडविण्याचा प्रयत्न केला. यामध्येही शासनाने खेळी केली. तरीही शेतकऱ्यांसमोर त्यांना गुडघे टेकावे लागले. याचे सर्व श्रेय दूध उत्पादक शेतकरी आणि महिलांना द्यावे लागेल.’’ 

उसाच्या एफआरपीबाबत शेट्टी म्हणाले, ‘‘माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी एफआरपीचे सूत्र बदलले होते. नऊ रिकव्हरीचा पाया असताना त्यांनी ९.५ केला. त्यामुळे त्यांना शेतकरी संघटनेने विरोध केला होता. आता मात्र हाच पाया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बदलून १० रिकव्हरी केला आहे. यामुळे प्रतिटन उसाला २०० रुपये वाढ दिली असली म्हणून सांगत असले तरी २०० पैकी केवळ ५० रुपयेच शेतकऱ्यांना मिळणार आहेत. याविरुध्द निश्‍चितपणे आवाज उठविला जाणार आहे. शेतकऱ्यांच्या उसाला चांगला दर मिळाला पाहिजे, यासाठी यावर्षीच्या गळीत हंगामात जोरदार आंदोलन करणार आहोत.’’

श्री. शेट्टी म्हणाले, ‘‘कोल्हापूर, सांगलीमध्ये उसाचे क्षेत्र वाढलेले नाही. या ठिकाणी उसाला चांगला दर मिळाला पाहिजे, अशीच भूमिका घेतली जाईल. त्यामुळे साखर कारखान्यांना आणि सरकारला या ऊस दर आंदोलनालाही सामोरे जावे लागणार आहे.

जानकर म्हणत, सांभाळून घ्या!
दूध दर आंदोलन चिघळत असतानाच दुग्धविकास मंत्री महादेवराव जानकर वारंवार दूरध्वनी करत होते. हा दूरध्वनी दूध दरावर तोडगा काढण्यासाठी नव्हता तर तो ‘सांभाळून घ्या’ हे सांगण्यासाठी असायचा, असेही खासदार शेट्टी यांनी सांगितले. 

Web Title: Kolhapur News Raju Shetty comment