राशिवडेतील बिरदेव यात्रेची उत्साहात सांगता (व्हिडिआे)

राजू पाटील, राजू कुलकर्णी
मंगळवार, 30 जानेवारी 2018

राशिवडे बुद्रुक - बिरोबाच्या नावानं चांगभलं.... च्या गजराच येथील ग्रामदैवत बिरदेवाच्या यात्रेची उत्साहात आज सांगता झाली.

राशिवडे बुद्रुक - बिरोबाच्या नावानं चांगभलं.... च्या गजराच येथील ग्रामदैवत बिरदेवाच्या यात्रेची उत्साहात आज सांगता झाली. गेली पाच दिवस धनगरी ढोलांच्या निनादाने आसमंत दणाणून निघाला आणि भंडाऱ्यात मंदिर परिसर न्हाऊन गेला होता. भाविकांनीही मोठ्या संख्येने हजेरी लागली होती.

शुक्रवारपासून यात्रेला सुरवात झाली. पहिल्या दिवशी गावातील देव भानूस मंदिरातून पश्चिमेकडील टेकडीवर असलेल्या मुख्य मंदिरात पालखीने नेण्यात आले. यानंतर मानाच्या सासणकाठ्या आणि मानाचे नैव्यद्य झाल्यानंतर यात्रेला सुरवात झाली. यात्रेसाठी मंदिराच्या पायथ्यापासून नामानंद महाराज चौक ते बाजारपेठेपर्यंत खेळणी आणि मिठाई व खाद्यपदार्थांचे मोठमोठे स्टॉल लागले होते. रस्त्याच्या दूतर्फा गर्दी असल्याने येथून वाहतूक बंद करण्यात आली होती. चार दिवस याचा भाविकांनी लाभ घेतला. 

शनिवारपासून गर्दी वाढत गेली. या सायंकाळपासून पुढे तीन दिवस धनगरी ढोलवादन सुरु होते. रविवारी व सोमवारी यात्रेचा मुख्य दिवस असल्याने मंदिरातील मूर्तीला अभिषेक व पारंपारीक पूजा बांधण्यात आली होती. सायंकाळी भंडाऱ्याच्या उधळणीत हेडामाचा खेळ झाला व भाकनूक सांगण्यात आली. ढोलवादनाचा नाद दूरवरच्या गावामध्ये पोहोचत होता आणि यासाठी उधळलेल्या भंडाऱ्याचा सडा मंदिराभोवती पडला होता. सोमवारीही हे कार्यक्रम झाले. यासाठी मंदिर आकर्षक रोषणाईने सजवले होते. रात्री आतषबाजीने यात्रा आणखीनच खुलवण्यात आली. आज मंगळवारी सकाळी अभिषेक व पूजा करून देव पालखीने भानूस मंदिराकडे आणण्यात आले. दुपारी ग्रामपंचायतीच्या मांडावर ढोलवादन केले व यात्रेची सांगता झाली. 

Web Title: Kolhapur News Rashivade Birdev Yatra