मैदान मारल्याचा शेट्टींना राग - सदाभाऊ खोत

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 मार्च 2018

पन्हाळा - आताचे जग हे बंदुकीच्या नळीवर चालत नाही, तर बौद्धिकतेवर चालते. राजू शेट्टींना आपल्या मैदानात येऊन सदाभाऊने मैदान मारल्याचे रुचले नाही. खासदार शेट्टी दिल्लीत गेले नि साखरेचे दर पडले. गल्लीत येऊन मात्र ते वेगळेच सांगू लागले, अशी टोलेबाजी रयत क्रांती संघटनेचे संस्थापक कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी येथे केली.

पन्हाळा - आताचे जग हे बंदुकीच्या नळीवर चालत नाही, तर बौद्धिकतेवर चालते. राजू शेट्टींना आपल्या मैदानात येऊन सदाभाऊने मैदान मारल्याचे रुचले नाही. खासदार शेट्टी दिल्लीत गेले नि साखरेचे दर पडले. गल्लीत येऊन मात्र ते वेगळेच सांगू लागले, अशी टोलेबाजी रयत क्रांती संघटनेचे संस्थापक कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी येथे केली. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला.

येथील पन्हाळा क्‍लब मैदानावर आजची राजकीय परिस्थिती, रयत क्रांती संघटनेची भूमिका आणि आगामी राजकीय वाटचाल या विषयांवर विचारमंथनासाठी दोन दिवसीय कार्यकर्त्यांचे शिबिर कालपासून सुरू झाले. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, ‘‘आजच्या नेत्यांना सर्वसामान्यांचे प्रश्‍न मिटविण्यात स्वारस्य नाही. आपले कार्यकर्ते तोकडे आहेत; पण ते आशावादी आहेत.’’

मूठभर बियाण्यांतूनच शेतकरी पोत्याने धान्य काढतो. त्यानुसारच तुम्ही संघटनेचे बियाणे आहात, यातूनच संघटनेचे शिवार फुलणार आहे. हे लक्षात ठेवून कामाला लागा, असा सल्लाही त्यांनी आपल्या बीजभाषणातून कार्यकर्त्यांना दिला. शिबिरासाठी राज्यभरातून पक्षाचे विभागीय संघटक, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष असे सुमारे चारशे कार्यकर्ते उपस्थित आहेत.

दीपप्रज्वलनानंतर श्री. खोत म्हणाले, ‘‘संघटनेतून आपल्याला काढून टाकल्यानंतर पुढे काय करायचे, हा कार्यकर्त्यांसमोर प्रश्‍न होता. जुन्या संघटनेत राहिलो तर काहीच करता येणार नाही, ही चलबिचल होती. त्यातूनच दसऱ्याच्या मुहूर्तावर संघटना स्थापन केली. ज्या पन्हाळगडावर शिवछत्रपतींनी रयतेच्या जिवावर राज्य निर्माण केले, त्याच गडावर शिबिर घ्यायचे, त्यांना प्रशिक्षित करायचे असे ठरविले. त्यानुसार शिबिर होत असल्याचे सांगितले.

प्रदेशाध्यक्ष सुरेशदादा पाटील यांनी स्वागत केले. या वेळी युवा प्रदेशाध्यक्ष शार्दुल जाधवर, जिल्हा संपर्कप्रमुख संतोष कांदेकर, माजी नगरसेवक रवींद्र धडेल उपस्थित होते.

लोकांच्या उन्नतीसाठीच...
राजकारणाच्या मायानगरीत प्रत्येकजण आपली जादू दाखवून लोकांना भुलवत आहे. त्यांना सामान्यांच्या प्रश्‍नांशी कर्तव्य नाही. आपल्यावर अन्याय झाला म्हणून कोणावर सूड उगवण्यासाठी रयत क्रांती निर्माण केलेली नाही, तर तळागाळातील माणसाच्या उन्नतीसाठी, त्यांच्या जीवनात समाधान आणण्यासाठी एकत्रित आलो आहोत, असेही खोत यांनी सांगितले.

Web Title: Kolhapur News Rayat farmers organisation conference