रेसिडेन्सी क्‍लबची सत्ता प्रोग्रेसिव्ह ग्रुप १९९२ कडे

रेसिडेन्सी क्‍लबची सत्ता प्रोग्रेसिव्ह ग्रुप १९९२ कडे

कोल्हापूर -  बहुचर्चित ‘रेसिडेन्सी क्‍लब’च्या त्रैवार्षिक निवडणुकीत सतीश घाटगे यांच्या प्रोग्रेसिव्ह ग्रुप १९९२ने १५ पैकी १३ जागांवर विजय मिळवून क्‍लबवर एकतर्फी सत्ता मिळवली. विरोधी प्रोग्रेसिव्ह ग्रुप ओरिजनलचे प्रमुख दिलीप मोहिते आणि अभिजित मगदूम हे विजयी झाले. माजी राज्यपाल, आमदार, खासदार यांच्यासह जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक सभासद असलेल्या या क्‍लबसाठी ८५ टक्के अर्थात १४५३ मतदारांनी मतदान केले. 

सतीश घाटगे, अमर गांधी, नीलकान्त पंडित, बी.व्ही.खोबरे, सचिन झंवर, केदार हसबनीस, आर.बी.संघवी, शितल भोसले, मानसिंग जाधव, अभिजित मगदूम, नरेश चंदवाणी, विक्रांत कदम, डी.डी.आंबर्डेकर, दिलीप मोहिते आणि समीर काळे हे विजयी झाले. दिलीप मोहिते आणि अभिजित मगदूम हे ओरिजनल प्रोग्रेसिव्ह ग्रुप पॅनेलचे तर उर्वरित सर्व उमेदवार प्रोग्रेसिव्ह ग्रुप १९९२ पॅनेलचे आहेत.

दिवसभर क्‍लबच्या परिसरात अलीशान गाड्यांसह उद्योगपती, डॉक्‍टर, सी.ए. अशा मातब्बरांची गर्दी होती. सायंकाळी सहाच्या सुमारास प्रत्यक्षात मतमोजणीला सुरवात झाली. रात्री अकरा वाजता अंतिम निकाल जाहीर झाला. यानंतर क्‍लबच्या बाहेर गुलालाची उधळण करीत उमेदवार आणि त्यांच्या मित्रमंडळींनी जल्लोष झाला.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अपर जिल्हाधिकारी अशोक पाटील, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नायब तहसिलदार प्रकाश दगडे यांनी काम पाहिले.
भ्रष्टाचार, जातीभेद, एकाधिकारशाही अशा वेगवेगळ्या पद्धतीने दोन्ही पॅनेलकडून झालेल्या प्रचारामुळे क्‍लबची निवडणुक जिल्ह्यात चांगलीच चर्चेत आली.

१५ जागांसाठी दोन्ही पॅनेलचे ३० उमेदवार रिंगणात होते. सकाळी आठपासून क्‍लबमध्ये मतदान प्रक्रीया सुरू झाली. साधारण दुपारी बारापर्यंत ४५ टक्‍क्‍यांहून अधिक मतदान झाले. चार केंद्रावर झालेल्या मतदानासाठी अनेकजण रांगेत उभे होते. खासदार धनंजय महाडिक मतदान केंद्रावर थांबून होते. क्‍लबचे पदसिद्ध अध्यक्ष जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, जिल्हा पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनीही रांगेतून मतदान केले. माजी राज्यपाल डी. वाय. पाटील, आमदार सतेज पाटील, संजय पाटील, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार अमल महाडिक, माजी आमदार पी. एन. पाटील यांनीही मतदानाचा हक्क बजावला.

क्‍लबच्या बाहेर सकाळी साडेसातपासूनच गर्दी झाली होती. वेगवेगळ्या उंची मॉडेलच्या कारची रांग परिसरात लागली होती. क्‍लबच्या प्रवेशद्वारापासून आत येणाऱ्या अनेकांना उमेदवार स्वतःची ओळख सांगून मतदान करण्याचे आवाहन करत होते. मतदार नसणाऱ्यांनाही अनेकांनी हात जोडून आम्हालाच मतदान करण्याचे आवाहन केले. हा विषय परिसरात चर्चेचा ठरला. क्‍लब परिसरात पोलिस बंदोबस्तही होता.

दोन्ही पॅनेलकडून झालेल्या जोरदार प्रचारामुळे मतदान केंद्रावरही चुरस दिसून येत होती. सकाळी दहापासून दुपारी तीनपर्यंत मतदानाचा वेग कायम होता. सायंकाळी सहानंतर प्रत्यक्षात मतमोजणी प्रक्रीया सुरू झाली. सर्व मतपत्रिका एकत्रित करण्यात आल्या. यानंतर उमेदवार आणि त्यांच्या मित्रमंडळींसह दैनिकांच्या कार्यालयात निकालाबाबत फोनाफोनी सुरू होती. निकालाची उत्सुकता जिल्ह्याला लागून राहिली होती.

उमेदवार आणि मिळालेली मते -
प्रोग्रेसिव्ह ग्रुप - १९९२
सतीश घाटगे ९६०, अमर गांधी ८६१, बसवराज खोबरे ८२२, मानसिंग जाधव ७६७, नीलकान्त पंडित-बावडेकर ८४१ , सचिन झंवर ८०८ , विक्रांत कदम ७४७, शीतल भोसले ७७७, डॉ.दीपक आंबर्डेकर ७४३, मनोज वाधवाणी ७१२ , केदार हसबनीस ८०१, समीर काळे ७२६, नरेश चंदवाणी ७४७, गिरीश कर्नावट ६८५ , रवी संघवी ७८२

मतदारयादी अन्‌ डॉ. कुणाल खेमणार
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार आज पहाटे कोल्हापुरात दाखल झाले. दुपारी बाराच्या सुमारास ते मतदानासाठी केंद्रावर दाखल झाले; मात्र त्यांचे  नावच यादीत मिळाले नाही. खुद्द खेमणार यांनी यादी हातात घेवून नाव पाहिले. त्यांच्या नावापुढे डॉ. असा उल्लेख असल्यामुळे त्यांचे नाव ‘डी’ ओळीत होते. थोड्यावेळानंतर ही चूक लक्षात आली. त्यांचे नाव यादीत मिळाले. त्यांनी मतदानाचा हक्क बजावला.

प्रोग्रेसिव्ह ग्रुप - ओरिजिनल
दिलीप मोहिते ७४२, दिलीप चिटणीस ६०३,  आनंद माने ६३८, अभिजित मगदूम ७६१, रवींद्र पाटील ५४०, रणजित शहा ५३३, प्रशांत काळे ६२५, डॉ. सत्यव्रत सबनीस ५८७, चंद्रकांत राठोड ५४९, अभय देशपांडे ५७९, दिलीप जाधव ५०८, श्रीकांत मोरे ४५६, सचिन घाटगे ५७९, सुशील चंदवाणी ५२०,  गिरीश रायबागे ६३५

आणि दिलीप मोहिते विजयी...
मतमोजणी केंद्रात झालेल्या सहा फेऱ्यांत पहिल्यापासून प्रोग्रेसिव्ह ग्रुप - १९९२चे उमेदवार पुढे होते. ओरिजन पॅनेलचे दिलीप मोहिते आणि अभिजित मगदूम  हे विजयापर्यंत पोचत होते; मात्र सहाव्या फेरीत समीर काळे ६०३, दिलीप मोहिते 
६०३ तर मनोज वाघवाणी ६०१ मते मिळाली. त्यानंतर सातव्या फेरीत मोहिते यांनी आघाडी घेवून थेट ७४२ मते मिळवून विजय मिळवला. या वेळी मतमोजणी केंद्रात शांतता पसरली होती. मोहिते प्रोग्रेसिव्ह ग्रुप अरिजनलचे प्रमुख असल्यामुळे त्यांच्या विजयाकडे सर्वांचे लक्ष लागून  राहिले होते.

सभासदांचा विजय ः सतीश घाटगे
क्‍लबमध्ये लोकशाही आहे. आमची भूमिका ही सभासदांची भूमिका होती. त्यांना ती मान्य केली आहे हे मतदानांतून दाखवून दिले. त्यामुळे हा विजय आमचा नसून सभासदांचा आहे. पुढील तीन वर्षांसाठी सभासदांचा विश्‍वास आम्ही सार्थ ठरवू. आम्ही केवळ सभासदांचे प्रतिनिधी आहोत. आम्ही सभासदांचे आभार मानतो. आमच्या विरोधात जे लढले त्यांनीही चांगली टक्कर दिली. त्यांचेही अभिनंदन करतो, अशी प्रतिक्रिया प्रोग्रेसिव्ह ग्रुप - १९९२चे प्रमुख सतीश घाटगे यांनी दिली.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com