रिक्षा परमिट आजपासून स्थगित - डॉ. डी. टी. पवार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 ऑगस्ट 2017

कोल्हापूर - राज्यातील रिक्षा परमिट दीड-दोन महिन्यांपूर्वी खुले करण्यात आले होते. याबाबत शासनस्तरावर झालेल्या निर्णयानुसार हे परमिट उद्या (शुक्रवार) पासून परिवहन आयुक्त कार्यालयाकडून स्थगित करण्यात आले आहे. पण कालपर्यंत कार्यालयात दाखल झालेले परमिट मागणीचे अर्जदार यातून वगळण्यात आल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. डी. टी. पवार यांनी सांगितले. 

रिक्षा परमिट खुले करा, ही अनेक वर्षांपासून रिक्षा संघटनांची मागणी होती. २०१२ मध्ये हे परमिट परिवहन विभागाकडून खुले करण्यात आले होते. कोल्हापूर जिल्ह्याच्या वाट्याला साडेचार हजार परमिट आले होते. ऑनलाईन पद्धतीने राबविलेल्या या पद्धतीमध्ये फक्त बाराशेहून अधिक रिक्षाचालकांनी परमिटची मागणी केली. त्यांना परमिट मिळाले. दिलेल्या कोट्यापेक्षा अधिक परमिट शिल्लक राहिले. त्यानंतही परमिट मागणी होऊ लागली. त्यात अवैध प्रवासी वाहतुकीचा प्रश्‍न रिक्षा संघटनांकडून उचलण्यात आला.  याची दखल घेत शासनाने दीड महिन्यापूर्वी रिक्षाचे परमिट खुले केले. ज्याच्याकडे रिक्षा चालविण्याचा परवाना आणि बॅच आहे, त्याला परमिट मागण्याचा हक्क देण्यात आला. 

गेल्या दीड ते दोन महिन्यांत अवघे ७० ते ८० अर्जच परमिटसाठी दाखल झाले. याबाबत शासनस्तरावर विचार करण्यात आला. याबाबत आजपासून परिवहन कार्यालयाने खुले केले रिक्षा परमिट स्थगित केल्याचे डॉ. पवार यांनी सांगितले. पुढील निर्णय होईपर्यंत इच्छुकांना आता प्रतीक्षा करावी लागणार आहे. मात्र यापूर्वी केलेल्या अर्जदारांनी निश्‍चिंत राहावे, असेही ते म्हणाले.

रिक्षात विमा पॉलिसी बाळगा...
रिक्षाची विमा पॉलिसी चालकांनी रिक्षात बाळगावी. प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून रिक्षांची तपासणी करण्यात येणार आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार रिक्षाचा विमा नसेल अगर त्याची मुदत संपली असेल तर अशा रिक्षा जप्त करण्यात येतील. विमा पॉलिसी घेईपर्यंत गाडी सोडली जाणार नाही. याबाबत रिक्षाचालकांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. डी. टी. पवार यांनी केले आहे.

Web Title: kolhapur news rickshaw permit stop