शालेय विद्यार्थी बनवणार 'रोबोट 

सुयोग घाटगे
गुरुवार, 7 जून 2018

शाळांत रोबोट बनवण्याची प्रयोगशाळा व त्याचे तंत्रशुद्ध शिक्षण देण्याची व्यवस्था पूर्ण झाली आहे. नीती आयोगाच्या अटल इनोव्हेशन मिशन अंतर्गत 'अटल टिंकरिंग लॅब ' या देशातील 1500 शाळांत मंजूर झाल्या आहेत.

कोल्हापूर - लहान मुलांची स्वप्ने मोठी असतात. भविष्यात कोण होणार ? असे विचारले असता अनेक पर्याय सांगतात. यातील एक वैज्ञानिक होणार असा पर्याय नक्कीच असतो. आता मात्र ते शक्‍य होणार आहे. शाळांत रोबोट बनवण्याची प्रयोगशाळा व त्याचे तंत्रशुद्ध शिक्षण देण्याची व्यवस्था पूर्ण झाली आहे. नीती आयोगाच्या अटल इनोव्हेशन मिशन अंतर्गत 'अटल टिंकरिंग लॅब ' या देशातील 1500 शाळांत मंजूर झाल्या आहेत.

विद्यार्थी दशेतच विज्ञानाची गोडी लागावी आणि वैज्ञानिक बनण्यासाठी चालना मिळावी या उद्देशाने ह्या 'अटल टिंकरिंग लॅब ' प्रयोग शाळांची निर्मिती केली आहे. देशातील 1500 शाळांची निवड झाली आहे. यात राज्यात 116 तर जिल्ह्यातील 6 शाळांचा समावेश आहे. शहरातील शाहूपुरी येथील वि.स. खांडेकर प्रशालाच्या प्रयोगशाळेचे काम पूर्ण झाले आहे.

सोमवारी (ता 11) प्रयोगशाळेचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील, इस्त्रो वैज्ञानिक बी. एच. पाटील, आमदार अमल महाडिक यांच्या हस्ते होणार आहे. या प्रयोग शाळेसाठी 20 लाखांचा निधी मंजूर झाला आहे. प्रयोग शाळेत 5 वी ते 10 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना रोबोटिक तंत्रज्ञान व थ्रीडी प्रिंटिंग विषयीचे शिक्षण देण्यात येईल. यात आर्डिनोकिट, रासबेरी किट व मोबाईल चिप या सारख्या उच्च गुणवत्तायुक्त आधुनिक तंत्रज्ञानाचा अभ्यास व ड्रोनची कार्यप्रणाली व जोडणीचे शिक्षण मिळणार आहे. 

निवडलेल्या शाळा अशा: 

 • देशातील 1500 शाळांची निवड
 • राज्यातील 116 शाळा 
 •  जिल्ह्यातील 6 शाळांचा समावेश
 • शहरातील 1 शाळा 

प्रयोग शाळेत हे बनणार 

 • इंडस्ट्रियल वापरासाठीच रोबोट 
 • अॅग्रीकल्चर वापरासाठीच सेन्सर डिव्हाईस 
 • शाळांसाठी उपयोगी रोबोट 
 • सामाजिक स्वास्त्य जपणारे रोबोट 

अशी असेल प्रयोगशाळा - 

 • सर्वसुविधायुक्त प्रयोगशाळा 
 • आधुनिक सॉफ्टवेअरयुक्त संगणक 
 • थ्रीडी प्रिंटर *टूल किट 
 • सर्किट डायग्राम्स
 • डिजिटल प्रोजेकशन सिस्टम 

बदलत्या काळानुसार शिक्षणात बदल होणे अपेक्षित आहे. याचाच एक भाग म्हणजे 'अटल टिंकरिंग लॅब', विद्यार्थीदशेपासून जर विज्ञान आणि तंत्रज्ञाची गोडी लागली तर भारताचे भविष्य उज्वल बनेल. 
- वंदना काशीद,

इन्चार्ज, अटल टिंकरिंग लॅब, 

सामाजिक कार्यात रोबोचा सहभाग वाढवण्यासाठी रोबोट महत्वाची भूमिका बजावू शकतात, शेताला पाणी सोडणे, शेताची देखरेख, रस्त्यावरील स्वच्छता अशा गोष्टी हे रोबोट सहज करू शकतात. याचे मुलांनी अधिकाधिक फायदा घ्यावा. यामूळे पुढील पिढी वेगळे काही तरी करेल. 
- भरत अलगौडर,

शिक्षक 
 

Web Title: Kolhapur News Robot making by school student