अखेरच्या श्‍वासापर्यंत शेतकऱ्यांच्यासाठी लढणार - सदाभाऊ खोत

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 जानेवारी 2018

शिरोळ -  ऊस दरासाठी आंदोलन करणाऱ्यांनी साखर कारखानदारांशी युती केल्यामुळे ऊस दराचे आंदोलन झाले नाही, अशी टीका कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी खासदार राजू शेट्टी यांचे नाव न घेता केली.

शिरोळ -  ऊस दरासाठी आंदोलन करणाऱ्यांनी साखर कारखानदारांशी युती केल्यामुळे ऊस दराचे आंदोलन झाले नाही, अशी टीका कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी खासदार राजू शेट्टी यांचे नाव न घेता केली. तसेच भविष्यातही मी कारखानदारांच्या बाजूने राहूणार नाही. अखेरच्या श्‍वासापर्यंत शेतकऱ्यांच्यासाठी लढणार आहे, असेही खोत म्हणाले. 

श्री. खोत म्हणाले, पुढील वर्षी उसाचे आंदोलन होणार नाही. झाले तरी लुटू पुटुचे आंदोलन असेल. कारण उसाच्या एफआरपीची रक्कम वाढविली जाणार आहे. त्यामुळे एफआरपीसाठी आंदोलन होणार नाही. हातकणंगले मतदारसंघात परिवरर्तनासाठी शेतकरी व शेतमजुरांना संघटीत करत असून, अंगणातील लढाई ऐतिहासिक आणि ही लढाई होणारच, असा इशाराही श्री. खोत यांनी दिला. 

येथील शिवाजी चौकात शेतकरी, शेतमजुरांचा संवाद मेळावा झाला. खासदार शेट्टींच्या होम पिचवरती मंत्री सदाभाऊ खोत यांनी तुफानी बॅटिंग केली. श्री. शेट्टींचे नाव न घेता त्यांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या आरोपांचा खरपूस समाचार घेतला. 

ते म्हणाले, ‘‘मी मंत्री झाल्यानंतर याच स्टेजवरती खासदार शेट्टी यांनी माझा सत्कार केला. त्यानंतर मी आठ महिने आजारी पडलो. आजारानंतर शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळात राहून काम करण्यास सुरुवात केली. डाळी व कडधान्यावरती आयात कर वाढवून घेतला. पिण्याच्या पाण्याच्या योजनेसाठी निधी वाढविला. ठिबक अनुदानासाठी वर्षभर ऑनलाईन सुविधा सुरू ठेवली. बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना मताचा अधिकार दिला. यासह अनेक विकासकामे करत होतो; पण हे काम खासदार शेट्टी यांना दिसले नाही.

...मग मी ही निवृत्ती घेतो 
मंत्री खोत म्हणाले, ‘‘मला सत्ता सुंदरीचा मोह असल्याचा आरोप केला जात आहे. तसेच घराणेशाहीचाही आरोप केला जात आहे. हाडाच्या प्रामाणिक कार्यकर्त्याला राजकारणात संधी देण्यासाठी खासदार शेट्टी यांनी राजकारणातून निवृत्ती घ्यावी, मीही राजकारणातून निवृत्त होतो आणि हे आव्हान या ऐतिहासिक शिवाजी चौकातून देत आहे.

स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी दिल्लीतून झाली पाहिजे. दिल्लीत शेट्टी गप्प बसतात आणि मला राजीनामा दे म्हणून सांगतात. मला मिळालेले मंत्रिपद हे ३२ वर्षे शेतकऱ्यांसाठी केलेल्या संघर्षाचे फळ आहे. ते काढून घेणेचा अधिकार शेतकऱ्यांना आहे. अन्य कोणाला नाही. असे सांगत २९ लाख शेतकऱ्यांना १३ हजार कोटीची कर्जमाफी आजअखेर दिली आहे. शेतकऱ्यांची कर्जखाती तपासून यापुढेही कर्जमाफी दिली जाणार आहे. आणि या ऐतिहासिक कर्जमाफीचा मी साक्षीदार आहे. खोत पुढे म्हणाले, ‘‘ज्यांच्या विरोधात बोलून, ज्यांनी खासदारकी मिळविली तीच मंडळी त्यांच्याबरोबर युती करत आहेत.’’ रयत संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुरेश पाटील, संतोष कांदेकर उपस्थित होते.

Web Title: Kolhapur News Sadabhau Khot comment