कोल्हापूर ‘सकाळ’चा बुधवारी ३८ वा वर्धापन दिन

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 जुलै 2018

कोल्हापूर - बदलत्या काळाबरोबर डिजिटल क्रांतीवर स्वार होताना तळागाळातील सामान्य माणसांच्या न्याय्य हक्कासाठीही तेवढ्याच खमकेपणाने लेखणी परजणाऱ्या ‘सकाळ’चा ३८ वा वर्धापन दिन येत्या बुधवारी (ता. १) दिमाखात साजरा होणार आहे.

कोल्हापूर - बदलत्या काळाबरोबर डिजिटल क्रांतीवर स्वार होताना तळागाळातील सामान्य माणसांच्या न्याय्य हक्कासाठीही तेवढ्याच खमकेपणाने लेखणी परजणाऱ्या ‘सकाळ’चा ३८ वा वर्धापन दिन येत्या बुधवारी (ता. १) दिमाखात साजरा होणार आहे.

ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. राम पुनियानी यंदाच्या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे आहेत. ते ‘लोकशाहीसमोरील आव्हाने’ या विषयावर संवाद साधतील. संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात सायंकाळी पाच वाजता मुख्य सोहळ्याला 
प्रारंभ होईल. वर्धापन दिनानिमित्त वैशिष्ट्यपूर्ण प्रदर्शनाची परंपरा यंदाही जपली जाणार आहे. ‘पोलिटिकली करेक्‍ट’ हे राजकीय व्यंगचित्र प्रदर्शन यंदा होईल.

गेली ३८ वर्षे ‘सकाळ’ने वर्धापन दिनाचे आगळेपण जपले आहे. वर्धापन दिनानिमित्तच्या व्याख्यानांतून विविध विषयांवर मंथन घडवताना आजवर अनेक नामवंत वक्‍त्यांची प्रभावळ लाभली. यंदा तीच परंपरा प्रा. डॉ. पुनियानी पुढे नेणार आहेत. बहुविविधतेने नटलेल्या देशातील एकोपा आणि सलोखा कायम राहावा, यासाठी ते सतत आग्रही राहिले आहेत. पवईच्या ‘आयआयटी’मधून स्वेच्छानिवृत्ती घेऊन त्यांनी असहिष्णुताविरोधी लढ्याला वाहून घेतले आणि ‘सामाजिक सलोख्याचे दूत’ म्हणून त्यांची ओळख दृढ झाली. मानवी हक्क चळवळीत ते सक्रिय असून अल्पसंख्याकांचा मानवाधिकार हा त्यांच्या विशेष अभ्यासाचा विषय आहे.

वयाच्या बहात्तरीनंतरही तितक्‍याच सळसळत्या ऊर्जेने ते आजही देशभर भ्रमंती करतात आणि कार्यशाळा व व्याख्यानांना उपस्थिती लावतात. आजवर त्यांनी चाळीसहून अधिक पुस्तके लिहिली असून ‘ऑल इंडिया सेक्‍युलर फोरम’, ‘सेंटर फॉर स्टडी ऑफ सोसायटी अँड सेक्‍युलॅरिझम’ आदी संस्था, संघटनांच्या माध्यमातून ते कार्यरत आहेत. राष्ट्रीय एकात्मतेसाठी देण्यात येणाऱ्या इंदिरा गांधी पुरस्कारासह विविध पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे. दरम्यान, वर्धापन दिनानिमित्त ‘लोकशाही आणि निवडणुका’ या विषयावरील विशेषांकही प्रसिद्ध होणार आहे. विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय काम केलेल्या सात कर्तृत्ववंतांचा गौरवही मुख्य सोहळ्यात होणार आहे.

‘पोलिटिकली करेक्‍ट’ प्रदर्शन
वर्धापन दिनानिमित्त वैशिष्ट्यपूर्ण प्रदर्शनाची परंपरा यंदाही जपली जाणार आहे. ‘पोलिटिकली करेक्‍ट’ हे राजकीय व्यंगचित्र प्रदर्शन यंदा होईल. वर्तमान राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर तिरकसपणे भाष्य करणाऱ्या पन्नास व्यंगचित्रकारांची व्यंगचित्रे प्रदर्शनात पाहायला मिळणार आहेत. नटश्रेष्ठ बाबूराव पेंढारकर कलादालनात सलग तीन दिवस सकाळी दहा ते सायंकाळी सात या वेळेत प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहील. 

Web Title: Kolhapur News Sakal Anniversary