दुर्मिळ वस्तू अन लक्षवेधी वारसास्थळे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑगस्ट 2017

‘सकाळ’तर्फे प्रदर्शन - गुरूवारपर्यंत सुरू राहणार सर्वांसाठी खुले

‘सकाळ’तर्फे प्रदर्शन - गुरूवारपर्यंत सुरू राहणार सर्वांसाठी खुले

कोल्हापूर - जुने ते नुसतेच सोने नाही, तर ते शाश्‍वतही आहे. त्यात तंत्र व कौशल्य आहे. पिढ्यान्‌ पिढ्यांनी हाताळूनही त्याचा मजबूतपणा व सौंदर्यता टिकून आहे. अशा दुर्मीळ वस्तुरूपांची परंपरा, ओळख तितक्‍याच्या गांभीर्याने, काळजीपूर्वक ज्येष्ठ वस्तुसंग्राहक रवींद्र उबेरॉय यांनी टिकवून ठेवली आहे. त्यांच्याच संग्रहातील दुर्मीळ वस्तू, तसेच कोल्हापूरच्या चित्रकारांनी रेखाटलेल्या शहरातील वारसास्थळांच्या चित्रांच्या  प्रदर्शनाला आजपासून प्रारंभ झाला. गुरूवार (ता. ३) पर्यंत सकाळी दहा ते रात्री आठ या वेळेत प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहिल. ‘सकाळ’च्या ३७ व्या वर्धापनदिनानिमित्त संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहातील नटश्रेष्ठ बाबूराव पेंढारकर कलादालनात हे प्रदर्शन भरवले आहे. महापौर हसीना फरास यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्‌घाटन झाले. सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार, भारती प्रतापराव पवार, रविंद्र उबेरॉय, यशोधरा उबेरॉय, सकाळ माध्यम समूहाचे संचालक (ऑपरेशन) भाऊसाहेब पाटील, सकाळ माध्यम समूहाचे मुख्य संपादक श्रीराम पवार, कार्यकारी संपादक मनोज साळुंखे, उपसरव्यवस्थापक रवींद्र रायकर आदी यावेळी प्रमुख उपस्थित होते.   
प्रदर्शनातील दुर्मीळ वस्तू व रंगसंगतीच्या अनुपम सौंदर्याने नटलेल्या, सजलेल्या वस्तू शतकातील दैनंदिन व्यवहार व संस्कृतीची ओळख देतात. तत्कालीन बांधणीपासून वापरापर्यंतचे कौशल्य, संस्कृतीच्या लहान-मोठ्या छटा या वस्तू दर्शवित आहेत. पाहणाऱ्याला आजोबा, पणजोबाच्या काळातील लोकजीवनाचे दर्शन घडते. हेच या प्रदर्शनाचे बलस्थान आहे. उद्‌घाटन होताच प्रदर्शनद्वार खुले झाले. नेटक्‍या मांडणीत बसविलेल्या एकेक वस्तूवर नजर फिरवत गर्दी पुढे सरकू लागली. 

प्रदर्शनात पहिल्यांदा ऑलिम्पियाचा टाईपरायटर भेटतो. पश्‍चिम जर्मनी तंत्रज्ञानातील सफाईदारपणा दाखवतो. त्यासोबत एचएमव्हीचा ग्रामोफोन दिसतो. आजवर विविध सांगीतिक लेखात वाचून माहीत असलेला ग्रामोफोन १०२ हा १९३६ मधील आहे. तशीच प्रचिती हॉलंडचे फिलिप्स स्पू टेपरेकॉर्डर देतो. इलेक्‍ट्रॉनिक्‍स तंत्रज्ञानाची झलक दाखविणारा बॉक्‍स कॅमेरा व रोल फिल्म, तर कोडॅक कंपनीचा बेलोटाईप रोल फिल्म कॅमेराही त्याकाळच्या दृश्‍य परंपरेचे प्रतीक दाखवितो.

संस्थानकाळातील राजवाडे प्रकाशाने उजळून निघायचे ते कंदिलाच्या प्रकाशात, असा औंध संस्थानातील १९४४ चा पितळी कंदील येथे आहे. चंदनाची पेटी १९५२ ची असूनही लाकूड किती टिकाऊ आहे, त्याची प्रचिती देते.    

ब्रिटिशकालीन टर्नर कंपनीचा मायक्रोफोन १९६१ मधील आहे. पंडित जवाहरलाल नेहरू जेव्हा कोल्हापुरात आले, तेव्हा त्यांचे भाषण याच मायक्रोफोनवर झाले. बुश कंपनीचा ३ बॅण्ड व्हॉल्व्हचा रेडिओ होता, असे आजोबांकडून ऐकले होते. तोच रेडिओ तत्कालीन लोकप्रिय; पण आजच्या जमान्यातील दुर्मीळ मनोरंजन माध्यमाची ओळख देतो. 

कामगार, मजुरांपासून शेतकऱ्यांपर्यंत प्रत्येकाला रात्री-अपरात्रीचा प्रवास सायकलने घडायचा. सायकल आदळली तरी कंदिलातील ज्योत विझणार नाही, अशी वैशिष्ट्यपूर्ण रचनेची झलक दाखवणारा, अंधाऱ्या वाटेचा प्रवास सुखकर करणारा सायकलचा रॉकेल कंदील आहे. रेल्वे रुळावर सिग्नल देण्यासाठी टॉर्च तत्कालीन दळणवळणाच्या सुरक्षिततेची उपाययोजना दर्शवतो. 

दुर्मीळ; पण लक्षवेधी 
प्रदर्शनात मांडलेल्या प्रत्येक वस्तूचे रचना कौशल्य, वापरातील सहजता आणि त्यासाठी वापरलेले धातू किंवा लाकडाचा टिकावूपणा निर्मितीपासून सुरू होता. यात मातीचा गोळा, चंद्रोबा गोविंदराव नरके यांचे सावकारी लायसन्स, ड्रायव्हिंग लायसन्स, पांडवप्रताप पोथी (प्रत १८ ऑगस्ट १८७९), दळपासाठीचे लहान जाते, हेअर ट्रीमर (झीरो मशीन), जेवणावेळी हात धुण्यासाठी पाटावर देण्याचे भांडे, वेताची टोपली, गॅसबत्ती, सोनी कॅसेट प्लेअर, कृष्णधवल टी.व्ही. आदी वस्तू या प्रदर्शनात लक्षवेधी ठरल्या आहेत.  
सहभागी चित्रकार
विजय टिपुगडे, मनोज दरेकर, शैलेश राऊत, विलास बकरे, शिवाजी मस्के, महंमदअली मुजावर, धीरज सुतार, सुनील पंडित, बबन माने, अरुण सुतार, मिलिंद शिंदे, राम मेस्त्री, सूरज शेलार, अक्षय प्रजापती, मिथुन सरमळकर, विवेक कवाळे, विजय उपाध्ये, स्वप्नील शेटे, प्रकाश पाटील, चेतन चौगुले, पूनम राऊत, अभिजित कांबळे, मनिपद्म हर्षवर्धन, प्रवीण वाघमारे, सुरेश पोतदार, इंद्रजित बंदसोडे, संतोष पोवार, मंगेश शिंदे, दीपक कांबळे, गजेंद्र वाघमारे आदींची प्रदर्शनात चित्रे आहेत.
 

‘सकाळ’वरील शुभेच्छांनी सोशल मीडिया फुल्ल

कोल्हापूर - ‘सकाळ’च्या वर्धापन दिनानिमित्त नेटिझन्सनी आज शुभेच्छांचा वर्षाव केला. फेसबुक, व्हॉट्‌स ॲप, ट्विटरच्या माध्यमातून जगभरातील नेटिझन्सनी ‘सकाळ’ला शुभेच्छा दिल्या. वर्धापन दिनानिमित्त आज प्रसिद्ध केलेल्या ‘परंपरा’ या खास पुरवणीचेही वाचकांनी जोरदार स्वागत केले. सकाळ माध्यम समूहाची फेसबुक, व्हॉट्‌स ॲप, ट्विटरचे अकाउंट शुभेच्छांनी भरून गेले. दिवसभर कॉमेंट, लाईकच्या माध्यमातून ‘सकाळ’बद्दल आपुलकी व्यक्त करण्यात आली. सकारात्मक बातम्यांबद्दल ‘सकाळ’चे खास अभिनंदन केले. ‘सकाळ’च्या ३७ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून आज प्रकाशित केलेल्या विविध प्रकारच्या परंपरा असणारे लेख वाचकांचे खास आकर्षण ठरले. कला, सांस्कृतिक, क्रीडा, सण, कुटुंबपद्धती आदींबाबतचे लेख माहितीपूर्ण असल्याच्या कॉमेंट्‌स जगभरातील वाचकांनी शेअर केल्या.

Web Title: kolhapur news sakal anniversary