मंडलिकांना म्हातारा म्हणताना काय वाटले नाही का? - समरजितसिंह घाटगे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 फेब्रुवारी 2018

आमदार मुश्रीफांना दिवंगत मंडलिकांना म्हातारा म्हणताना काय वाटले नाही का? अशी घणाघाती टीका भारतीय जनता पक्षाचे नेते ‘म्हाडा’-पुणेचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी केली.

म्हाकवे - शाहू, फुले, आंबेडकरांच्या नावाप्रमाणेच दिवंगत राजे विक्रमसिंह घाटगे व लोकनेते सदाशिवराव मंडलिकांच्या नावांचा वापर केला. सदाशिवराव मंडलिकांनी मला घडवलं, आज जे काय आहे ते मंडलिकांमुळेच आहे, असे रडून सांगणाऱ्या आमदार मुश्रीफांना दिवंगत मंडलिकांना म्हातारा म्हणताना काय वाटले नाही का? अशी घणाघाती टीका भारतीय जनता पक्षाचे नेते ‘म्हाडा’-पुणेचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी केली.

येथे शेतकरी युवक मेळावा व युवक कार्यकर्त्यांच्या भाजप प्रवेश कार्यक्रमात ते बोलत होते. शाहू साखर कारखान्याचे संचालक पी. डी. चौगुले अध्यक्षस्थानी होते. बाजार समितीच्या संचालिका आशालता पाटील, आनंदराव पाटील, सुहास लटोरे, कोल्हापूरचे माजी महापौर सुनील कदम, नामदेव बल्लाळ, दिनकर वाडकर, चंद्रकांत कांबळे, प्रवीण पाटील आदी उपस्थित होते.

त्यांची प्रगती पाहा
कोल्हापूरच्या कार्यक्रमात आमदार मुश्रीफांनी दिवंगत मंडलिक व शरद पवार यांच्यात भांडणे लावल्याची जाहीर कबुली दिली. त्यांनी भांडणे लावण्याशिवाय काही केले आहे का? तुमचा-आमचा वापर करून घेतला. वीस वर्षांपूर्वीची त्यांची प्रगती आणि आपली प्रगती पाहा, असा घणाघात अशोक सातुसे यांनी केला.

श्री. घाटगे म्हणाले, ‘‘दिवंगत मंडलिक व राजे विक्रमसिंह घाटगे या दोन्ही नेत्यांच्या विचारांचे पाईक होऊन कागलमधील नकारात्मक राजकारण संपवायची मला घाई आहे. मला पदाची, आमदारकीची हौस नाही. कर्तृत्वाच्या ताकदीवर मी बोलत आहे. तालुक्‍यातील नकारात्मक राजकारण खड्यासारखे बाजूला करण्याची गरज आहे. एक वर्षापूर्वी जे बोललो, ते करून दाखविले आहे.’’

महावीर पाटील यांनी स्वागत केले. आनंदराव पाटील, अशोक सातुसे, चंद्रकांत कांबळे, प्रवीण पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. केरबा पाटील, काकासाहेब गंगाधरे, प्रवीण पाटील, चंद्रकांत कांबळे, विकास पाटील, बाळासाहेब डाफळे, संग्राम कांबळे, सात्तापा कांबळे, चेतन पाटील, विश्‍वजीत पाटील, स्वप्नील पाटील, सुनील कुंभार, ऋषीकेश पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. रावसाहेब पाटील यांनी आभार मानले.

 

Web Title: Kolhapur News Samarjeet Ghatge comment