दिंडनेर्ली सिंचन योजनेस मंजुरी द्या - अमल महाडिक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 जुलै 2017

कोल्हापूर - करवीर तालुक्‍यातील दिंडनेर्ली उपसासिंचन योजनेच्या कामास मंजुरी द्यावी, अशा मागणीचे निवेदन आमदार अमल महाडिक यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना दिले.

कोल्हापूर - करवीर तालुक्‍यातील दिंडनेर्ली उपसासिंचन योजनेच्या कामास मंजुरी द्यावी, अशा मागणीचे निवेदन आमदार अमल महाडिक यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना दिले.

निवेदनात म्हटले आहे की, दक्षिण विधानसभा मतदारसंघातील दिंडनेर्ली, हणबरवाडी, नंदवाळ, कळंबे, गिरगाव भागातील मोठे क्षेत्र डोंगराळ असल्याने हा भाग पाण्यापासून वंचित आहे. त्यामुळे या गावांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागते. या गावांपासून साधारणपणे सात किलोमीटरवरून दूधगंगा नदी वाहते, तीन ते चार किलोमीटरवर इस्पुर्ली येथून दूधगंगा डावा कालवा जातो. दूधगंगा प्रकल्पाच्या प्रशासकीय मान्यतेमध्ये दिंडनेर्ली उपसासिंचन योजनेचा समावेश होता. नंतर मात्र या योजनेची मान्यता रद्द झाली. तथापि या योजनेसाठी लागणारे पाणी इतर कोठेही न वापरता बचत झाल्याचे दिसते. त्यामुळे पाणी उपलब्ध असूनही साधारण चार हजार हेक्‍टरचा मोठा भाग पाण्यापासून वंचित राहतो. सध्या राज्यात व इतर बऱ्याच राज्यात ईपीसीद्वारे उपसासिंचन योजनेची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. त्याच धर्तीवर दिंडनेर्ली योजनेच्या कामाला पूर्ववत मंजुरी दिल्यास परिसरातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावेल. तसेच ही योजनाही किफायतशीर ठरणार आहेत. कालव्यामधून एकाच टप्प्यात पाणी उपसा करून सभोवतीच्या दिंडनेर्ली, नंदवाळ, कळंबा, हणबरवाडी, गिरगाव तलावात पाणी सोडणे शक्‍य होणार आहे. त्यामुळे साधारणपणे चार हजार हेक्‍टर भाग सिंचनाखाली येणार आहे. कळंबा तलावात पाणी आणणेही शक्‍य होणार असल्याने पाचगाव, कळंबासह जवळपासच्या गावांचा पाण्याचा प्रश्‍न कायमस्वरूपी निकाली निघणार आहे.

Web Title: kolhapur news Sanction of Dindnerli Irrigation Scheme