सात-बारातील त्रुटी दूर करण्यासाठी कसरत

सुनील पाटील
सोमवार, 7 मे 2018

कोल्हापूर - ऑनलाईन सात-बारावर जमिनीची नोंद कमी, अनेकांची नावे, सर्व्हे नंबर गायब, आठ ‘अ’मध्ये जमीन नोंदीत तफावत, अशा एक ना अनेक त्रुटी राहिल्या आहेत. महाराष्ट्र दिनानिमित्त महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केलेल्या ऑनलाईन सात-बारामधील त्रुटी दुरुस्त करण्यासाठी खातेदारांना तहसील कार्यालयाच्या पायऱ्या झीजवाव्या लागणार आहेत.

कोल्हापूर - ऑनलाईन सात-बारावर जमिनीची नोंद कमी, अनेकांची नावे, सर्व्हे नंबर गायब, आठ ‘अ’मध्ये जमीन नोंदीत तफावत, अशा एक ना अनेक त्रुटी राहिल्या आहेत. महाराष्ट्र दिनानिमित्त महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केलेल्या ऑनलाईन सात-बारामधील त्रुटी दुरुस्त करण्यासाठी खातेदारांना तहसील कार्यालयाच्या पायऱ्या झीजवाव्या लागणार आहेत.

ऑनलाईन नोंदणी करताना पीकपाहणीच्या कॉलममधील शेतकऱ्यांची नावे कमी केल्याने संताप व्यक्त केला. तरीही, दुर्लक्ष करून ऑनलाईन सातबाराचे काम पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेतला. राज्यातील ४३ हजार गावांतील १ कोटी २७ लाख शेतकरी खातेदारांना गुढीपाडव्याला ऑनलाईन सात-बारा दिला जाणार होता. मात्र, प्रत्यक्षातील काम आणि केलेली घोषणा यात फरक होता.

शासनाने महाराष्ट्र दिनाचा मुहूर्त साधून ऑनलाईन सात-बारा एका क्‍लिकवर घोषणा केली. मात्र, ज्या गावची माहिती ऑनलाईन आहे, त्यातील त्रुटी दूर करण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. जिल्ह्यात सुमारे ५ लाख खातेदार आहेत. सध्या आजरा, गगनबावडा आणि भुदरगड तालुक्‍यातील शेतकऱ्यांना ऑनलाईन सात-बारा मिळू शकणार आहे. उर्वरित शेतकऱ्यांना मे अखेरीस मिळतील, असा शासनाचा अंदाज आहे. मात्र, जेथे काम पूर्ण झाले, त्यातील त्रुटी सुधारण्याची शासनाची सोय शेतकऱ्यांना त्रासदायक ठरत आहे. तलाठी किंवा संबंधित अधिकाऱ्यांकडे तीन ते चार महिन्यांपूर्वी कागदपत्रे देऊनही चुकीची नावे व क्षेत्र दिसून येत असल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यात  चांगले काम झाले आहे. अनेकांच्या पडताळणीतून नोंदी केल्या आहेत. डिजिटल सात-बारा आणि हस्तलिखित सात-बारा पाहूनच सही केली जाईल. एखाद्या सात-बारात काही त्रुटी असतील त्या दुरुस्त करून दिल्या जाणार आहेत. 
- अविनाश सुभेदार, 

   जिल्हाधिकारी, कोल्हापूर

त्रुटी दूर करण्यासाठी सुविधा आहे, मात्र सातबारावरील दुरुस्ती करण्यासाठी तहसीलदार किंवा तलाठी कार्यालयातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून आर्थिक लूट होऊ नये, याची काळजी घ्यावी. 
-अविनाश पाटील, 

शेतकरी, वाकरे

दुरुस्तीसाठी १५५ अर्ज
हस्तलिखित सात-बारा उताऱ्यावर एक आणि ऑनलाईन उताऱ्यावर एक अशी वेगवेगळी माहिती असल्यास ती बदलता येणार आहे. तहसीलदारांकडून १५५ चा दुरुस्ती आदेश घेऊन नावात बदल करता येणार आहे.

दृष्टिक्षेपात...

  •  जिल्ह्यात खातेदार : ५ लाख  
  •  कागदपत्रे देऊनही चुकीची नावे
  •  आजरा, गगनबावडा, भुदरगडला प्राधान्य
Web Title: Kolhapur News Sat Bara land paper errors issue