शाळा बंद करण्याच्या निर्णया विरोधात विद्यार्थी रस्त्यावर

युवराज पाटील
मंगळवार, 13 मार्च 2018

कोल्हापूर - पोलिसांचे बंधन झुगारून शाळांतील विद्यार्थी आज रस्त्यावर उतरले. कमी पट संख्येच्या शाळा बंद करण्याच्या निर्णया विरोधात विद्यार्थ्यानी संताप व्यक्त केला. 

कोल्हापूर - पोलिसांचे बंधन झुगारून शाळाशाळांतील विद्यार्थी आज रस्त्यावर उतरले. कमी पट संख्येच्या शाळा बंद करण्याच्या निर्णया विरोधात विद्यार्थ्यानी संताप व्यक्त केला.

विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरण्यास पोलिस प्रशासनाने मनाई केली होती. काल मुख्याध्यापकांना तशा आशयाच्या नोटिसा बजावण्यात आल्या. आज सकाळी अकरानंतर शाळांच्या दारात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. काही शाळांनी इमारतीतच प्रार्थना आणि राष्ट्रगीत सादर करून शिक्षण बचाव कृती समितीच्या आंदोलनास अप्रत्यक्षरित्या पाठिंबा दिला.

एकीकडे शिक्षणाधिकारी तसेच पोलिसांची नोटिस तर दूसऱ्या बाजूला शाळा बंद करण्याच्या निर्णयाविरोधातील संताप असे संमिश्र वातावरण होते. शाळेच्या वेळेत विद्यार्थ्याना बाहेर सोडता येणार नाही, अशी शिक्षणाधिकाऱ्यांची भुमिका होती. सध्या दहावी बारावीच्या परीक्षेमुळे शाळा सकाळच्या सत्रात भरत आहेत. सकाळी अकराला शाळा सुटल्यानंतर शाळेच्या कामकाजात हस्तक्षेप होत नाही. शेवटी पालक आणि विद्यार्थी आंदोलनात सहभागी होत आहेत, अशी कृती समितीची भुमिका आहे.

मुक्त सैनिक वसाहतीतील वालावलकर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी सैनिक उद्यान मध्ये पालकांची बैठक झाली. कृती समितीचे अशोक पोवार, राजेश वरक, भरत रसाळे यांनी पालकमंत्र्यांनी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी काल रोखून धरले. या चळवळीत विद्यार्थ्याना घेऊ नका, अशी भुमिका घेतली होती.

हा प्रश्‍न शिक्षण व्यवस्थेशी संबंधित आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना सहभागी करावी लागतील. अनेकवेळा काही नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त रॅलीच्या नावाखाली उन्हा-तान्हात फिरविले जाते ,असा प्रकार आम्ही करत नाही. एका गंभीर प्रश्‍नावर विद्यार्थ्यांना सहभागी करू शकत असेल तर आमचा दोष कसा? असा प्रश्‍न पोवार यांनी उपस्थित केला. नंतर विद्यार्थ्यासह पालक रस्त्यावर आले. त्यांनी प्रतिज्ञा आणि राष्ट्रगीत म्हणून शाळा बंदच्या निर्णयाचा प्रतिकात्मक निषेध नोंदविला. 

मुस्लीम बोर्डिगच्या बाहेरही बंदोबस्त होता. अकराच्या सुमारास नेहरू हायस्कूलच्या विद्यार्थ्यानी एकत्रित येऊन शासनाच्या निर्णयाचा निषेध केला. महाराष्ट्र हायस्कूलचे विद्यार्थीही सकाळी अकरानंतर मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. कसबा बावडा येथील राजाराम हायस्कूलच्या विद्यार्थ्यानी निषेध नोंदविला. मार्केट यार्डमध्ये जाधववाडी येथील श्री प्रिन्स शिवाजी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आंदोलनात भाग घेतला. रस्त्यावर प्रार्थना केल्याने काही काळ रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती.

दहा पटाखालील शाळा बंद करण्याच्या निर्णयाविरोधात गेल्या दोन महिन्यापासून आंदोलन सुरू आहे. जिल्ह्यातील 24 शाळांना या निर्णयाची झळ बसणार आहे. शिक्षण बचाव नागरी कृती समितीतर्फे जनजागृती सुरू आहे. थेट विद्यार्थ्याना रस्त्यावर उतरण्याची भुमिका समितीने घेतल्याने प्रशासनाने त्यांच्या विरोधात जोरदार मोर्चेबांधणी केली. शाळा बंद करण्याचा विषय जिव्हाळ्याचा असल्याने पोलिस प्रशासन आणि शिक्षणाधिकाऱ्यांचे बंधन झुगारून विद्यार्थ्यांनी अप्रत्यक्षरित्या निर्णयाचा निषेध नोंदविला.

Web Title: Kolhapur News school students agitation