शाहू मिलच्या उरल्या फक्‍त भिंती

सुधाकर काशीद
मंगळवार, 26 जून 2018

कोल्हापूर - शाहू जन्मस्थळाच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण होणार, हे ऐकत ऐकत कोल्हापुरातील एक पिढी म्हातारी झाली आहे. अजूनही काम ‘चालूच’ आहे आणि शाहू मिलच्या जागी शाहू स्मारक उभारण्याचा जंगी समारंभ २०१२ ला होऊन आज २०१८ उजाडले तरी एक इंचाचे काम झालेले नाही, अशी परिस्थिती आहे. 

कोल्हापूर - शाहू जन्मस्थळाच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण होणार, हे ऐकत ऐकत कोल्हापुरातील एक पिढी म्हातारी झाली आहे. अजूनही काम ‘चालूच’ आहे आणि शाहू मिलच्या जागी शाहू स्मारक उभारण्याचा जंगी समारंभ २०१२ ला होऊन आज २०१८ उजाडले तरी एक इंचाचे काम झालेले नाही, अशी परिस्थिती आहे. 

दरवर्षी शाहू जयंतीला या स्मारक स्थळाचे काम आता पुढच्या जयंतीला पूर्णच होणार, असे सांगायची एक पद्धत ठरली आहे आणि याच पार्श्‍वभूमीवर मंगळवारी (ता. २६) शाहू जयंतीचा सोहळा कोल्हापुरात होणार आहे. शाहू जयंतीला हौसेने दरवर्षी नवी घोषणा करायची आणि जयंतीचा दिवस संपला, की ती घोषणा विसरून जायची, यामुळे शाहूंच्या नावाने केल्या जाणाऱ्या या घोषणांचा अवमान होण्याची वेळ आली आहे.

शाहू मिलच्या जागी ‘शाहू स्मारक’ ही मोठी गाजावाजा झालेली घोषणा आहे. ज्या शाहू छत्रपती मिलवर ११०० कुटुंबांचा उदरनिर्वाह सुरू होता, ती मिल वेळोवेळी आधुनिक तांत्रिक बदल न केल्याने बंद पडली आणि एक दिवस त्यातील सगळे साहित्य हलवून कुलूप लागले. वास्तविक या शाहू मिलच्या आधुनिकीकरणासाठी वेळोवेळी मदत करून ही मिल अद्ययावत ठेवायला हवी होती; पण तसे झाले नाही. ११०० कुटुंबांचा 
उदरनिर्वाह तर संपलाच; पण खुद्द शाहू महाराजांनी रोजगार निर्मितीसाठी उभारलेली मिल आपण भग्नावस्थेत नेऊन सोडली.

भग्नावस्थेत असलेल्या या मिलची २६ एकर जागा मध्यवर्ती ठिकाणी आहे. त्यामुळे या जागेवर अनेकांचा डोळा गेला. पण इथे घेतलेली जागा सहजासहजी लपून राहणार नाही आणि कोल्हापूरकरांना ते पचणार नाही म्हणून त्यांनी नाद सोडला. येथे गारमेंट पार्क व लॅंड स्केपिंगच्या साह्याने स्मारक उभारण्याचा निर्णय झाला. २०१२ ला तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते पायाभरणीही झाली.

आज सहा वर्षे झाली तरीही काम सुरू नाहीच; पण शाहू मिलच्या जागेत एकही अधिकारी, राजकीय नेता पुन्हा कधी गेला नाही. तीन पाळीतील तीन वॉचमन सोडता कोणी शाहूप्रेमी तिकडे फिरकलेला नाही. आज या क्षणी शाहू मिलही नाही आणि तिथे स्मारकही नाही. फक्त शाहू मिलची दगडी भिंत, शाहू मिलचे भग्नावशेष व फाटकावर एक वॉचमन आहे. येथे गारमेंट पार्क व शाहू स्मारक होणार आहे, हे बहुतेक सर्वजण विसरून गेले आहेत आणि पुन्हा उद्या ‘शाहू महाराज की जय...’ म्हणायला सारे तयार आहेत. 

भागधारकांचा भरपाईचा मुद्दा
शाहू मिलच्या जागी शाहू स्मारक गारमेंट पार्क उभारण्याचा निर्णय होण्यापूर्वी शाहू मिलच्या मूळ भागधारकांचा भरपाई मुद्दाही अडचणीचा ठरला आहे. शाहू मिलचे शंभर रुपयांचे शेअर्स असलेले अनेक भागधारक आहेत. आमच्या शेअर्सची डिव्हिडंडची रक्कम द्या, अशी त्यांची मागणी आहे. त्यासाठी त्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे भागधारकांचा प्रश्‍न सोडवण्याआधीच स्मारकाची घोषणा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

Web Title: Kolhapur News Shahu Mill memory special